LIVE UPDATES

सिंधुदुर्गात आंबा-काजू शेतीला मिळणार ‘AI’ची साथ

पालकमंत्री नितेश राणे यांची संकल्पना ; उत्पादनात २५ टक्क्यांनी वाढ होणार
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 02, 2026 11:37 AM
views 75  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

सिंधुदुर्ग : हवामान बदल, अवकाळी पाऊस, तापमानातील चढ-उतार, वाढती आर्द्रता आणि कीड-रोगांच्या प्रादुर्भावामुळे आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढत असताना आता सिंधुदुर्गातील फलोत्पादनाला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळणार आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून सिंधुरत्न समृद्ध योजनेंतर्गत जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता AI आधारित स्मार्ट शेतीचा दोन वर्षांचा प्रायोगिक प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यामध्ये २०० आंबा आणि २०० काजू उत्पादक अशा ४०० शेतकऱ्यांचा समावेश असून, AI, IoT, उपग्रह तंत्रज्ञान, मृदा सेन्सर्स, स्थानिक हवामान केंद्रे आणि ड्रोनच्या माध्यमातून शेतीचे डिजिटल व्यवस्थापन केले जाणार आहे.

जिल्ह्याच्या विकासातील विविध प्रश्नांसाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. शेती क्षेत्रासमोरील बदलत्या हवामानाचे आव्हान लक्षात घेऊन शेतकऱ्यांचे उत्पादन आणि उत्पन्न वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या दिशेने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण पाऊल मानला जात आहे.

कृषी विभागामार्फत कृषी विज्ञान केंद्र आणि अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती यांच्या माध्यमातून या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार आहे. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या नियोजनातून तसेच डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांच्या समन्वयाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

हवामानाची माहिती थेट मोबाईलवर

प्रकल्पांतर्गत स्थानिक हवामान केंद्रे उभारून तापमान, आर्द्रता, पर्जन्यमान आदींची प्रत्यक्ष वेळेतील माहिती संकलित केली जाणार आहे. या माहितीच्या आधारे शेतकऱ्यांना हवामानानुसार पीक व्यवस्थापनाचा सल्ला दिला जाईल. मृदा सेन्सर्स व IoT तंत्रज्ञानाद्वारे जमिनीतील ओलावा आणि तापमानाची माहिती घेऊन पाणी व खत व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले जाणार असून, हे मार्गदर्शन शेतकऱ्यांच्या मोबाईलवर मराठी भाषेत उपलब्ध होणार आहे.

AI सांगणार कीड-रोगांचा धोका

उपग्रह छायाचित्रे आणि AIच्या माध्यमातून बागांमधील पिकांची वाढ, आरोग्य आणि संभाव्य ताणाचे निरीक्षण केले जाणार आहे. कीड व रोगांचा संभाव्य प्रादुर्भाव ओळखून शेतकऱ्यांना वेळेवर पूर्वसूचना देण्याची यंत्रणा विकसित केली जाणार आहे. डोंगराळ भागातील आणि उंच झाडांच्या बागांसाठी ड्रोनद्वारे फवारणी तसेच झाडांच्या आरोग्याचे डिजिटल मॅपिंग केले जाणार आहे.

वेंगुर्ल्यात डिजिटल वॉर रूम

प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथे या प्रकल्पासाठी डिजिटल वॉर रूम उभारण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात डिजिटल डॅशबोर्ड उपलब्ध करून प्रकल्पाच्या कामकाजावर प्रभावी सनियंत्रण केले जाणार आहे.

उत्पादन वाढणार, खर्चही कमी होणार

AI आधारित हवामान अंदाज, कीड-रोगांची पूर्वसूचना आणि पीक व्यवस्थापनाच्या शिफारशींमुळे आंबा व काजू उत्पादनात २० ते २५ टक्के वाढ, तर पाणी, खते आणि कीटकनाशकांच्या वापरात २० ते ३० टक्क्यांपर्यंत बचत करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. उत्पादन खर्चात बचत होऊन शेतकऱ्यांच्या निव्वळ उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे.

४०० शेतकऱ्यांना AI प्रशिक्षण

प्रकल्पासाठी निवडण्यात येणाऱ्या ४०० शेतकऱ्यांना आधुनिक डिजिटल शेती तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रायोगिक प्रकल्प यशस्वी झाल्यास संपूर्ण कोकणातील फलोत्पादनासाठी सिंधुदुर्गचे हे स्मार्ट शेतीचे पथदर्शी मॉडेल ठरण्याची अपेक्षा आहे.