LIVE UPDATES

महापुरुषांच्या स्मारकांना विलंब; उपनगराध्यक्षांनी व्यक्त केली तीव्र नाराजी

पारदर्शक कारभारासाठी चित्रीकरण आवश्यक : ॲड. अनिल निरवडेकर
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 11, 2026 19:15 PM
views 30  views

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी महापुरुषांच्या स्मारकांबाबत प्रशासनाची असलेली उदासीनता लक्षात घेऊन तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. तसेच सभेचं व्हिडिओ चित्रीकरण कराव की करू नये ? यातही कामकाजात पारदर्शकता राखण्यासाठी सभेच चित्रीकरण केलं जावं, अशी भूमिका त्यांनी मांडली. 

आयत्यावेळीच्या विषयात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारका विषयीचा मुद्दा चर्चेला आला. यावेळी महापुरुषांच्या स्मारकांबाबत धोरणात्मक निर्णय होऊनही कामाला सुरुवात देखील होत नाही ही बाब गंभीर असल्याचे सांगत ॲड. निरवडेकर यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. तर नगरसेवकांच्या पत्रांना मुख्याधिकारी यांनी उत्तर न दिल्याने सभेदरम्यान उपनगराध्यक्षांनी त्यांनाही खडेबोल सुनावले. तसेच आयत्यावेळीच्या मुद्यात तालुका पत्रकार संघाकडून दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने चर्चा झाली. तालुका पत्रकार संघाकडून पत्रकारांना चित्रीकरण करण्यास द्यावे अथवा प्रशासनाकडून चित्रीकरण करून ते पत्रकारांना द्यावे अशी विनंती केली होती. यावर झालेल्या चर्चेदरम्यान उपनगराध्यक्ष ॲड. निरवडेकर यांनी लोकसभा, विधानसभा येथील कामकाजाचे लाईव्ह प्रक्षेपण होते. त्यामुळे नगरपरिषदेच्या प्रशासकीय कामात पारदर्शकता रहावी यासाठी सभेचे चित्रीकरण करण्यास परवानगी देण्यात यावी, अशी भूमिका मांडली होती.