
सावंतवाडी : तालुक्यातील पडवे-माजगाव परिसरात वाघाने गाभण गाईवर हल्ला केल्याची घटना समोर आली असून त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिक अरुण भिसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास गाय चारण्यासाठी घेऊन गेले होते. काही वेळाने ते घरी परतले. दरम्यान, इतर जनावरे परत आल्याचे त्यांना समजले. त्यांनी शोध घेतला मात्र संबंधित गाभण गाय रात्रीपर्यंत सापडली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा शोध घेतला असता गाय मृतावस्थेत आढळून आली आणि तिच्यावर वाघाने हल्ला करून ती फस्त केल्याचे निदर्शनास आले.
पडवे-माजगाव परिसरात यापूर्वीही वाघ तसेच अस्वलांकडून पाळीव प्राण्यांवर हल्ल्याच्या घटना घडल्या असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे वन विभागाने तातडीने या घटनेची दखल घेऊन परिसरात पाहणी करावी आणि ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.











