सिंधुदुर्ग : महाराष्ट्राच्या यापुढील राजकीय संघर्षाचे भवितव्य जवळपास निश्चित करणारी ही विजयादशमी म्हणजे राज्याच्या वाटचालीतील ऐतिहासिक टप्पा आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या रूपाने शिवसेनेची जी मुलुखमैदान तोफ दसरा मेळाव्यात धडाडली, तोच दसरा मेळावा आज महाराष्ट्राचे पुढील राजकारण आणि अर्थातच कडवा संघर्ष अधोरेखित करणार आहे. केवळ गर्दी हा दसरा मेळाव्याचा निकष निश्चितच असणार नाही. कारण बाळासाहेबांचे सडेतोड शब्दही या दसरा मेळाव्याची एक स्वतंत्र ओळख होती. दोन्ही दसरा मेळावे यशस्वी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात यंत्रणा कामाला लागली असली तरी बाळासाहेबांच्या खणखणीत विचारांचा सोनं कोण लुटणार? याकडे राज्याचेच नव्हे तर अवघ्या देशाचे लक्ष वेधले आहे.
खरी शिवसेना तुमची की आमची, धनुष्यबाण तुमचा ही आमचा, असा संघर्ष सुरू असतानाच यात दसरा मेळावाही खेचला गेला. खरे तर दसरा मेळावा म्हणजे बाळासाहेब ठाकरे हे समीकरण महाराष्ट्राच्या इतिहासात अजरामर आहे. या इतिहासाची कोणीच बरोबरी करू शकत नाही. परंतु तरीही दसरा मेळाव्यावरून बाळासाहेबांच्याच अनुयायांमध्ये जोरदार राजकीय रस्सीखेच सुरू आहे. अर्थात महापुरुषांचे नाव घेऊन त्यांच्याच विचारांना तिलांजली देण्याची अनिष्ट आणि अघोरी प्रथाही याच महाराष्ट्रात आहे. यातून अगदी महात्मा गांधीही सुटले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. याचीही प्रचिती या निमित्ताने येत आहे.
शिंदे गटाची खरी ताकद दसरा मेळाव्यात दिसून यावी यासाठी मित्रपक्ष भाजपचे कार्यकर्ते या मेळाव्यात सहभागी होणार नसल्याचे वृत्त आहे. परंतु हा मेळावा यशस्वी करण्यासाठी आणि महाराष्ट्रात नव्हे तर देशात आपल्याला हवा तसा संदेश जावा, यासाठी निश्चितच शिंदे गटाचे मित्रपक्ष आणि संघटना कार्यरत असतील. तर उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यात संभाजी ब्रिगेडसह राष्ट्रवादी काँग्रेसची सेनाही सहभागी असणार आहे.
या दोन्ही दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मीडियात विलक्षण इंटरेस्टेड वातावरण निर्मिती झाली आहे. दोन्ही गटाकडून प्रोमो युद्ध तर सुरू आहेच, परंतु अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले अनेक नेते, मला कोणाच्या मेळाव्याला जायला आवडेल, किंवा कोणाचे विचार ऐकायला आवडतील, अशा मजेशीर प्रतिक्रिया मीडियाला देत आहेत आणि त्या सोशल मीडियावर गरागरा फिरतही आहेत. अशा बेगानी शादी मे कोणकोणते अब्दुल्ला दिवाने आहेत, हेही यातून स्पष्ट होत आहे.
या दोन्ही दसरा मेळाव्यासाठी कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या गटाचे किती शिवसैनिक रवाना झाले, याच्याही बातम्या दसरा मेळाव्याची रंगत वाढवत आहेत. अगदी काही पालकमंत्र्यांनी तर आपल्या जिल्ह्यातून किती लक्झरी आणि किती एसटी बस जाणार, याची आकडेवारीच जाहीर करून टाकली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर बाळासाहेबांचे दसरा मेळाव्यातलेच एक वाक्य आम्हालाच काय प्रत्येकाला आठवेल. समोरच्या अथांग गर्दीसमोर हात करून बाळासाहेब म्हणायचे की "ही गर्दी ट्रक, ट्रॅक्टरमधून जमवलेली नाही, शिवसेनेच्या प्रेमापोटी आलेले हे माझे सच्चे शिवसैनिक आहेत." बाळासाहेबांच्या या शब्दांचे भान या बेभान झालेल्या नेत्यांना कधी येणार, हाच प्रश्न आज सच्चा शिवसैनिकासमोर आहे.
यापूर्वी बाळासाहेब असताना दिवंगत प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे यांच्यासारखे भाजपचे दिग्गज नेते बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे सोने लुटण्यासाठी व्यासपीठावर आवर्जून उपस्थित राहायचे. अगदी कट्टर विरोधकही बाळासाहेबांच्या सडेतोड विचारांचे कौतुक करायचे. शिवसैनिकांना तर बाळासाहेबांचे शब्द म्हणजे श्वास होता. दसरा मेळाव्यात बाळासाहेबांनी दिलेली 'एनर्जी' पुढच्या दसरा मेळाव्यापर्यंत संपत नव्हती.
आजच्या या दोन्ही दसरा मेळाव्यांची पार्श्वभूमी पाहता राजकारणातला निखळपणा आणि खिलाडू वृत्ती कुठेतरी हरवल्याचे जाणवते. महाराष्ट्राच्या पुढील वाटचालीसाठी ती धोक्याची घंटा ठरू शकते. म्हणूनच गर्दी जमवून शक्ती प्रदर्शन करण्यामुळे आपण महाराष्ट्र जिंकू अशा भ्रमात असलेल्या राजकारण्यांनी एक गोष्ट निश्चितपणे लक्षात ठेवावी, सत्तेच्या साठमारीत पुढे जाण्यासाठी लक्झरी बस आणि एसटीमधून कार्यकर्ते जमवून त्या गर्दीत बाळासाहेबांचे विचार चिरूडू नका. बाळासाहेबांचे शब्द हे आजही सच्चा शिवसैनिकाचा श्वास आहेत. त्यांना जपा. त्यांच्या भावना समजून घ्या आणि मगच दसरा मेळाव्यात बाळासाहेबांचे नाव घ्या...आणि त्यांच्या खणखणीत, सडेतोड विचारांचे सोने लुटा !
मुंबईमध्ये या दोन दसरा मेळाव्याशिवाय देवीचं विसर्जनही होणार आहे, त्यामुळे मुंबईच्या कानाकोपऱ्यात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. शिवाजी पार्क आणि बीकेसी मध्ये पोलिसांनी चेन सिस्टीममध्ये बंदोबस्त केला आहे. सुरक्षा व्यवस्थेमध्ये समन्वय राहावा, यासाठी डीसीपी लेव्हलच्या अधिकाऱ्यांचा व्हॉट्सऍप ग्रुपही बनवण्यात आला आहे. प्रत्येक डीसीपीच्या अखत्यारीत 4 एसीपी असतील, या एसीपींना 10-12 पोलिसांची टीम रिपोर्ट करेल. मुंबईत ठिकठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरांच्या माध्यमातूनही नजर ठेवली जाणार आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी ठिकठिकाणी सुरक्षा स्टेशनही बनवण्यात आली आहेत. दोन्ही दसरा मेळावे आणि नवरात्र विसर्जनासाठी मुंबईत 3,200 ऑफिसर, 15,200 पोलीस, 1,500 एसआरपीएफचे जवान, 1,000 होमगार्ड, 20 क्युआरटी टीम आणि 15 बीडीडीएस टीमचा समावेश आहे. या दोन्ही दसरा मेळाव्याआधी मुंबईचे जॉईंट कमिशनर विश्वास नांगरे पाटील यांनी सुरक्षेची पाहणी केली.
राज्यातील लोकांना दसरा मेळाव्यासाठी येता यावं, यासाठी शिंदे गटाने १० कोटी रुपये खर्च केल्याचा आरोप केला जात आहे. यावर आता शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या १८०० बसेस बूक करण्यासाठी शिंदे गटाकडून १० कोटी रुपये खर्च केल्याची माहिती दीपक केसरकर यांनी दिली आहे. याबाबतचं वृत्त ‘टीव्ही ९ मराठी’ने दिलं आहे. दसरा मेळाव्याच्या माहिती देताना दीपक केसरकर म्हणाले, दसरा मेळाव्यासाठी गर्दी जमवायची नसते, ती आपोआप होत असते. जो जो महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिक आहे, त्यांना असं वाटतंय की त्यांच्या मनातला मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाला आहे. त्यामुळे असंख्य लोक मेळाव्याला येऊ इच्छित आहेत. त्यांना दसरा मेळाव्याला यायचं असेल तर त्यांच्या वाहतुकीची व्यवस्था केली आहे. प्रत्येकजण स्वत: तिकीट काढत असतो. पण दसरा मेळाव्याला येण्यासाठी संबंधित शेतकऱ्याने पैसे भरले किंवा आमच्या शिवसैनिकाने पैसे भरले तर यासाठी कुणाला वाईट वाटण्याचं काहीही कारण नाही, अशी प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी दिली आहे.