
मुंबई : चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष दशरथशेठ दाभोळकर यांना भारतरत्न सचिन तेंडुलकरच्या ‘टेन एक्स यू’ (Ten X You) या क्रीडा ब्रँडच्या उदघाटन कार्यक्रमास उपस्थित राहण्याचा मान मिळाला. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या बांद्रा-कुर्ला संकुलातील शरद पवार इनडोअर क्रिकेट अकॅडमी येथे सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते या ब्रँड शूज कंपनीचे उदघाटन झाले.
खेर्डी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष दशरथशेठ दाभोळकर यांनी या महत्त्वाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याबद्दल आनंद व्यक्त करताना सांगितले की, “चिपळूण व परिसरातील सीझन बॉल क्रिकेट जिवंत रहावे यासाठी मी मोहीम राबवत आहे. कोळी क्रिकेट अकॅडमीचे सचिन कोळी हे माझे जवळचे मित्र आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळेच मला भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या या उपक्रमाला सहभागी होता आले.”
तेंडुलकरच्या ‘टेन एक्स यू’ या ब्रँडमध्ये क्रिकेट स्पाइक्स, शूज, अॅथलेझर कपडे तसेच क्रिकेट प्रशिक्षणासाठी लागणारी उपकरणे उपलब्ध होणार आहेत. तेंडुलकर स्वतः या उत्पादनांचा वापर करून त्यांची कार्यक्षमता तपासत असून, डिझाईन सुधारण्यासाठी तो डिझाईन व उत्पादन संघांशी सहा महिन्यांहून अधिक काळापासून थेट जोडलेला आहे.
हा उपक्रम SRT10 अॅथलीझर प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत सुरू करण्यात आला असून, तेंडुलकरसोबत स्विगीचे माजी अधिकारी कार्तिक गुरुमूर्ती आणि करण अरोरा हे देखील सहभागी आहेत. मागील वर्षी पीक XV (पूर्वीचे सेक्वोइया) आणि व्हाईटबोर्ड कॅपिटल यांच्या पाठिंब्याने हा ब्रँड उभा करण्यात आला.
पारंपारिक सेलिब्रिटी जाहिरातींपेक्षा वेगळ्या पद्धतीने, तेंडुलकर फक्त ब्रँडचा चेहरा न राहता प्रत्यक्ष उत्पादन विकासात सक्रिय भूमिका बजावत आहे. स्थानिक उत्पादनातून प्रीमियम दर्जाच्या क्रीडा वस्तू उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे.
इंटरनॅशनल मास्टर्स लीग (IML) सामन्यांदरम्यान तेंडुलकर स्वतः या ब्रँडमधील शूज आणि कपडे परिधान करून त्यांची चाचणी घेताना दिसले. सुरुवातीच्या श्रेणीत अॅथलेझर कपडे, पादत्राणे आणि प्रशिक्षण उपकरणांचा समावेश असून, या ब्रँडमुळे भारतीय क्रीडा प्रेमींना जागतिक दर्जाची उत्पादने स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहेत.