तहानलेल्या गोयकारांचा घसा कोरडाच राहणार !

मुख्य गेट दुरुस्तीसाठी अजून एक-दोन दिवस लागणार : कार्य.अभि.विनायक जाधव
Edited by: संदीप देसाई
Published on: December 26, 2023 16:15 PM
views 139  views

सिंधुदुर्ग : तिलारी धरणाचं पाणी कालव्यात सोडण्याचं मुख्य गेट ओपन करण्याचं बॅलन्सिंग कंडिशन बिघडल्यानं तिलारीचे पाणी कालव्यात सोडण्यासाठी अजूनही एक-दोन दिवसांचा कालावधी जाऊ शकतो अशी माहिती तिलारी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता विनायक जाधव यांनी दिली आहे. उद्यापर्यंत या गेट दुरूस्तीसाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. मात्र, तूर्तास तरी तिलारी धरण कालव्याचं मुख्य गेट उघडत नसल्यानं तहानलेल्या गोव्याचा घसा कोरडाच राहणार आहे.

महिनाभरापूर्वी तिलारीच्या मुख्य कालव्याची दुरुस्ती हाती घेण्यात आली होती त्यावेळी धरणाच्या कालव्याचं मुख्य गेट बऱ्याच वर्षांनी बंद करण्यात आले होते. ही कामे पूर्ण झाल्यानंतर, गोव्याने ख्रिसमस व नववर्ष या पर्यटन हंगामासाठी पाण्याची आवश्यकता असल्यानं तिलारीच्या पाण्याची मागणी केल्याने ख्रिसमसपूर्वी कालव्यांची थोडीशी कामे शिल्लक होती. असं असतानाही त्यास्थितीत कामं बंद करून पाणी गोव्याला देण्याचे नियोजन केलं होते. मात्र, ख्रिसमसच्या आदी दोन दिवस 23 डिसेंबरपासून तिलारीच्या मुख्य धरणातून मागणीनुसार पाणी सोडण्यासाठी तिलारीच्या अधिकाऱ्यांनी बंद केलेलं मुख्य गेट उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, गेट उघडलं जाईना. त्यानंतर अधिकारी व यंत्रणेने शर्थीचे प्रयत्न केले. गेट घट्ट बसल्यानं तेथे बसविलेल्या मोटारचा उपयोग निष्फळ ठरला. त्यांनतरही गेले दोन-तीन दिवस हे प्रयत्न सुरूच आहेत. आता घट्ट झालेला आणि बॅलन्सिंग बिघडलेल्या त्या गेटचं बॅलन्सिंग कंडिशन व्यवस्थित करण्यासाठी आवश्यक यंत्रणा जलसंपदा विभागाकडून फास्ट ट्रॅकवर मागविण्यात आली आहे. तरीही उद्यापर्यंत तिलारीचे पाणी कालव्यात पोचण्याची शक्यता धूसर आहे. त्यानंतर तिलारीतुन कालव्यात सोडलेलं पाणी गोव्यात पोहाचण्यासाठी एक-दोन दिवस आणि मग पुन्हा गोव्यातील फिल्टरेशन प्लांटमध्ये प्रक्रिया करून हे पाणी गोयकारांना प्रत्यक्षात देण्यासाठी किमान हा आठवडा जाऊ शकतो.
   
दरम्यान, तिलारीच पाणी गोव्यात न पोहचल्यानं आताच गोव्यात 45 टक्के आणि पुरवठ्यात घट करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. तर ख्रिसमस आणि नवं वर्ष स्वागतासाठी गोव्यात पर्यटकांचा वाढता ओघ या पार्श्वभूमीवर गोव्यात पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता. तिलारीचे पाणी गोव्यात न सोडल्यास तेथील 'पाणीबाणी ' अधिक उग्ररूप धारण करू शकते. त्यामुळे या निर्माण झालेल्या अडचणीवर तिलारीचे अधिकारी कशी मात करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.