मुलांना पुस्तक हातात घ्यायला लावणारे बाल-कुमार संमेलनासारखे साहित्यिक उपक्रम अधिक व्हावेत

कसालच्या 'घुंगुरकाठी बाल-कुमार साहित्य संमेलना'त डॉ. राजेंद्र चव्हाण यांनी व्यक्त केली अपेक्षा
Edited by: प्रतिनिधी
Published on: December 13, 2022 18:15 PM
views 199  views

सिंधुदुर्गनगरी : विशिष्ट उद्दिष्ट ठेऊन आयोजित सूत्रबद्ध रितीने आयोजित केलेल्या या बाल-कुमार साहित्य संमेलनासारखे उपक्रम क्वचितच होतात. मुलांना गोष्टीचे पुस्तक हातात घ्यायला लावणारे असे उपक्रम अधिक प्रमाणात झाले पाहिजेत, अशी अपेक्षा प्रसिद्ध लेखक व कल्पक दिग्दर्शक डॉ. राजेंद्र चव्हाण यांनी काल येथे व्यक्त केली. 'घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग' संस्थेने कसाल हायस्कुलमध्ये आयोजित केलेल्या बाल-कुमार साहित्य संमेलनात ते अध्यक्षपदावरुन बोलत होते.


    'घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग' संस्थेने आयोजित केलेल्या या बाल-कुमारसाहित्य संमेलनाचे उद्घाटन अभिनेते अभय खडपकर यांच्याहस्ते झाले. यानंतर अध्यक्षीय भाषणात डॉ. चव्हाण बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत, सचिव डॉ. सई लळीत, विद्यार्थी स्वागताध्यक्षा मुग्धा बालम, विद्यार्थी अध्यक्ष प्रणव सावंत, कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे सचिव यशवंत परब, मुख्याध्यापक गुरुदास कुसगावकर आदि मान्यवर उपस्थित होते. श्री. खडपकर यांच्याहस्ते सरस्वतीचे पुजन करुन व दीपप्रज्वलनाने संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.


    संमेलनाध्यक्ष डॉ. राजेंद्र चव्हाण म्हणाले की, आजच्या या बाल-कुमारांच्या साहित्य संमेलनात मुलांनी ज्या धिटाईने स्वरचित कविता सादर केल्या, त्या कौतुकास्पद आहेत. संमेलनाच्या व्यासपीठावरील मुलांचा वावर आश्वासक होता. साहित्य हे पुस्तकापेक्षा प्रत्येकाच्या मनात अधिक असते. या वयात मुलामुलींना अशी संधी मिळणे, खुप महत्वाचे आहे. डॉ. चव्हाण यांनी भाषणावर अधिक भर न देता ते व्यासपीठ सोडुन मुलांमध्ये मिसळले आणि त्यांनी मुलांकडून वेगवेगळी गाणी म्हणवून घेतली. मस्तपैकी चालीवर म्हटलेल्या या गाण्यांनी संमेलनात वेगळीच गंमत आणली.


    उद्घाटक म्हणून अभय खडपकर म्हणाले की, शाळा आणि शालेय जीवन हा प्रत्येकाच्या मनातील हळवा कोपरा असतो. माझ्या शालेय जीवनाच्या स्मृती आजही जिवंत आहेत आणि त्या आठवल्या की रोमांच उभे रहातात. हे क्षण आयुष्यभर लक्षात रहातात, कारण तेच आपल्या आयुष्याला दिशा देणारे असतात. बालपण खुप महत्वाचे आहे. मी आजही ते जपलेले आहे. साहित्य म्हणजे वेगळे काही नसते. तुमच्यामाझ्या आयुष्यातील गोष्टीच साहित्यात अवतरतात. मात्र त्या शब्दात मांडण्यासाठी मार्गदर्शनाची गरज असते. अशा संमेलनांच्या उपक्रमांमुळे ती तुम्हाला मिळत आहे. मोबाईल आणि टिव्हीपासुन दूर रहा. वाचनाचा, गाण्याचा आनंद घ्या, मस्ती करीत अभ्यासही करा, असा कानमंत्र त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.


    विद्यार्थी संमेलनाध्यक्ष प्रणव सावंत म्हणाला की, अघ्यक्षपदासारखा सन्मान मला मिळाला, यामुळे मी भारावून गेलो आहे. माझे विचार व्यक्त करण्याची संधी यामुळेच मला मिळाली. अशा प्रकारची संमेलने वर्षातून दोनतीनवेळा झाली पाहिजेत, अशी अपेक्षा मी अध्यक्ष म्हणून व्यक्त करतो. विद्यार्थी स्वागताध्यक्षा मुग्धा बालम म्हणाली की, हे संमेलन म्हणजे आमच्या आयुष्यातील सोनेरी पान आहे. अशा संमेलनांमुळे विद्यार्थ्यांमधील सुप्त लेखनगुणांना वाव मिळेल आणि अनेक नवे लेखक, कवींचा शोध लागेल.


    'घुंगुरकाठी' संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत यांनी प्रास्ताविकात संमेलन घेण्यामागची भूमिका सांगितली. आजची नवी पिढी मोबाईल आणि टिव्हीच्या आहारी गेल्याची केवळ टीका करीत न रहाता या मुलांसाठी प्रत्यक्ष काही काम करावे, त्यांना पुन्हा एकदा पुस्तकांकडे वळवावे, त्यांच्यातील सूप्त गुणांना वाव द्यावा, यासाठी हे बाल-कुमार संमेलन आयोजित केले आहे. साहित्यिक आणि विद्यार्थी यांना एकत्र आणणे, हा हेतूही त्यामागे आहे. विद्यार्थ्यांना हे संमेलन आपले वाटावे, यासाठी विद्यार्थी अध्यक्ष आणि विद्यार्थी स्वागताध्यक्ष निवडण्याची अभिनव संकल्पना आम्ही राबवली. 


    संमेलनाच्या आयोजक डॉ. सई लळीत म्हणाल्या की, माझ्या शालेय वयात मला अशा प्रकारच्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आणि त्यातून माझ्यातील लेखिका, कवयित्री घडली. बाल-कुमार वय हे सर्वात जास्त संस्कारक्षम असते. त्यामुळे या मुलांमुलींसाठी साहित्य संमेलन घेण्याची कल्पना सुचली आणि आज ती प्रत्यक्षात आली. हे संमेलन यशस्वी करण्यात कसाल हायस्कुलचे मुख्याध्यापक गुरुदास कुसगावकर, भाषा विषयाचे शिक्षक निलेश महेंद्रकर यांचे योगदान महत्वाचे आहे.


    धी कसाल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक संस्थेचे विश्वस्त प्रभाकर सावंत यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, अशा प्रकारच्या दर्जेदार व सुनियोजित उपक्रमांमधुन मुलांचे भावविश्व समृद्ध होण्यास मदत होईल. या वयात त्यांना अशी संधी मिळाल्याने त्यांचे व्यक्तिमत्व घडण्यात मोठा हातभार लागेल. मुलांना साहित्यिक सहवास घडवून, त्यांचा नामवंत लेखक, कवींशी संवाद घडवूनआणणारा हा उपक्रम स्तुत्य आहे.


उद्घाटन सत्रानंतर कथांच्या अभिवाचनाचा कार्यक्रम खुप रंगतदार झाला. डॉ. सई लळीत यांच्या 'तेरा त्रिक एकोणचाळीस' या बालकथासंग्रहातील कथांचे वाचन अभिनेते निलेश पवार, अभिनेत्री मंगल राणे, पत्रकार व कवी श्रेयश शिंदे, डॉ. संदीप नाटेकर, डॉ. सई लळीत, विशाल गुरव, संदीप सडेकर यांनी केले. विद्यार्थ्यांनी याला उत्तम दाद दिली. यानंतर झालेल्या विद्यार्थी कवीसंमेलनात पुजा केदार, रोहित देशटवाड, मृणाली कासार, वैष्णवी राठोड, केतकी राणे, किमया राणे, सोनम प्रजापती, कृत्तिका हंचिनमणी, आर्या कदम, भार्गवी सोपल, श्रावणी मेस्त्री, सायली नाटेकर,अक्षता जाधव, तन्वी नांदिवडेकर यांनी स्वरचित कविता सादर केल्या. न्यु इंग्लिश स्कुलच्या शिक्षिका आर्या बागवे यांनीही एक कविता सादर केली.


समारोपाच्या सत्रात मुख्याध्यापक कुसगावकर यांनी संमेलनाच्या आयोजनाबाबत समाधान व्यक्त केले. अशा प्रकारची संमेलने दरवर्षी झाली पाहिजेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. समारोप सत्रात उद्घाटक अभय खडपकर, अध्यक्ष डॉ. राजेंद्र चव्हाण यांनी संमेलनातील सर्व कार्यक्रमांचा आढावा घेऊन समाधान व्यक्त केले. संमेलनाला श्रीमती मालन राजेंद्र चव्हाण उपस्थित होत्या. श्री. निलेश महेंद्रकर यांनी आभार प्रदर्शन आणि संपूर्ण संमेलनाचे ओघवत्या शैलीत सूत्रसंचालन केले.