ब्युरो न्यूज : या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण 8 नोव्हेंबर (मंगळवार) रोजी होत आहे. भारताच्या पूर्वेकडील शहरांमध्ये संपूर्ण चंद्रग्रहण आणि उर्वरित शहरांमध्ये आंशिक चंद्रग्रहण दिसेल. दुपारी 2.38 वाजता ग्रहण सुरू होईल आणि संध्याकाळी 4.23 पासून इटानगरमध्ये चंद्रोदयासह ग्रहण दिसणार आहे. संध्याकाळी 6.19 वाजता ग्रहण संपेल.
संध्याकाळी 6.19 नंतर, उपछाया चंद्रग्रहण सुरू होईल जे 7.26 पर्यंत चालेल. छायाग्रहणाची कोणतीही धार्मिक मान्यता नाही. ग्रहणामुळे देव दिवाळी आणि कार्तिक पौर्णिमेशी संबंधित शुभ कार्यांसाठी काही खास गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील.
देव दीपावलीच्या दिवशी दीपदान कसे आणि केव्हा करावे? ग्रहणाच्या दिवशी कोणती काळजी घ्यावी लागते? चंद्रग्रहणानंतर घरातील शुद्धीकरण कसे करावे, खाण्यापिण्याच्या बाबतीत कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात,हे आता पाहूया..
उज्जैनच्या जिवाजी वेधशाळेचे अधीक्षक डॉ. राजेंद्र गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात चंद्रग्रहण दुपारी 2.38 वाजता सुरू होईल. देशाच्या पूर्वेकडील भागात कोलकाता, कोहिमा, पाटणा, पुरी, रांची आणि इटानगरच्या जवळपासच्या शहरांमध्ये संपूर्ण चंद्रग्रहण दिसेल आणि उर्वरित भारतामध्ये आंशिक चंद्रग्रहण दिसेल. जेथे पूर्ण ग्रहण असेल तेथे चंद्र लाल दिसेल.
चंद्रग्रहणाचे सुतक केव्हा सुरु होईल?
सुतकाबाबत, उज्जैनचे ज्योतिषी पं. मनीष शर्मा सांगतात की, चंद्रग्रहण सुरू होण्याच्या नऊ तास आधी म्हणजे पहाटे 5.38 वाजता ग्रहणाचे सुतक सुरु होईल.
देवदिवाळी आणि कार्तिक पौर्णिमेशी संबंधित शुभ कार्य केव्हा करावे?
कार्तिक पौर्णिमा 7 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 4:40 वाजता सुरू होईल, जी दुसर्या दिवशी म्हणजेच 8 तारखेपर्यंत चालेल. यामुळे देवदिवाळीचे दोन दिवस आहेत. 7 नोव्हेंबरला संध्याकाळी दीपदान करू शकता. 8 नोव्हेंबरला दीपदान करायचे असल्यास ग्रहण संपेपर्यंत वाट पाहावी लागेल. संध्याकाळी 6.19 वाजता ग्रहण संपल्यानंतर स्नान करा आणि नंतर दीपदान करा. दोन्ही दिवशी दान-पुण्य करता येते. जर तुम्हाला भगवान सत्यनारायणाची कथा करायची असेल तर तुम्ही 7 नोव्हेंबरला करू शकता.
दीपदान कसे करावे?
सामन्यतः दीपदान नदीकाठी केले जाते. काही लोक दिवा लावून नदीत प्रवाहित करतात. यालाच दीपदान म्हणतात. दिव्याचे दान करण्यापूर्वी दिव्याची पूजा करावी आणि नंतर तो नदीच्या काठी ठेवावा. जर तुम्हाला घरामध्ये दीपदान करायचे असेल तर दिवा लावा, त्याची पूजा करा आणि घराच्या अंगणात ठेवा.
चंद्रग्रहण कसे पहावे?
वेधशाळेचे अधीक्षक डॉ.राजेंद्र गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार चंद्रग्रहण थेट उघड्या डोळ्यांनी पाहता येणार आहे. ग्रहण अधिक जवळून पाहायचे असेल तर दुर्बिणीच्या साह्याने ते पाहू शकता.
चंद्रग्रहण काळात कोणी काळजी घ्यावी?
जे लोक आजारी आहेत, वृद्ध, लहान मुले आणि गरोदर महिलांनी ग्रहणकाळात घरातच थांबावे. हे लोक त्यांच्या गरजेनुसार अन्न खाऊ शकतात, पाणी पिऊ शकतात. ग्रहणाच्या वेळी गरोदर स्त्री बाहेर गेली तर जन्मलेल्या मुलाच्या कुंडलीत चंद्र-सूर्य आणि राहू-केतूशी संबंधित दोष निर्माण होण्याची शक्यता असते. या कारणास्तव गर्भवती महिलांना ग्रहणाच्या वेळी घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.