सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषद, कृषी विभाग, राज्य शासन, केंद्र शासन या सगळ्यांच्या योजना एकत्रित करून त्याला पूरक अशा योजना जिल्हा बँकेने आणल्या तसेच शेतकऱ्यांच्या समोर असलेल्या समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक ते धोरणात्मक बदल बँकेने केले, पण प्रमुख समस्या पुढे आली ती केंद्र शासन राज्य शासनाच्या योजना या जिल्हा बँकेच्या माध्यमातून केल्या जात नाहीत, जिल्हा बँक त्याला पात्र ठरत नाही. याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी चर्चा केली असता व ते या विभागाचे मंत्री असल्याने त्यांनी सदर योजना सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत राबवण्याची परवानगी देण्याची व्यवस्था करून देण्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार आता सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना, पंतप्रधान रोजगार योजना यासारख्या योजनांची एकत्रीत अंमबजावणी करणारी सिंधुदुर्ग जिल्हा बँक ही देशातील पहिली बँक ठरली आहे, असे प्रतिपादन जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी निवजे येथे केले.
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना २०२२-२३ अंतर्गत लाभ मिळवून उभारणी केलेल्या केलेल्या श्री निवजेश्वर मुरघास प्रक्रिया उद्योग युनिटचा शुभारंभ जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते कुडाळ तालुक्यातील निवजे गावी करण्यात आला. यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, बँक संचालक प्रकाश मोर्ये, भगिरथ प्रतिष्ठानचे डॉ. प्रसाद देवधर, जिल्हा कृषी अधिकारी दत्तात्रय दिवेकर, उपविभागीय कृषी अधिकारी अजित अडसुळे, गोकुळचे पशुधिकारी नितीन रेडकर,अनिल शिर्के, निवजे सरपंच महेंद्र पिंगुळकर, तालुका कृषी अधिकारी अश्विनी घाटकर, माजी जी.प. सदस्य नागेंद्र परब आदि मान्यवर या शुभारंभ सोहळ्यात उपस्थित होते.
जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी म्हणाले, दुग्धउत्पादन दृष्टीकोनातुन निवजे गाव मॉडेल गाव मानतो. हे मॉडेल विकसित झाले पाहिजे व हे मॉडेल विकसित होण्यासाठी जिल्हा बँक व भगिरथ प्रतिष्ठान आम्ही जे काही प्रयत्न करता येतील ते आम्ही करू. जिल्हा बँक म्हणून आम्ही वेगवेगळे योजना आणल्या, त्याची अंमलबजावणी आम्ही केली. गेल्या दहा वर्षात २५ लाखापर्यंत कर्ज दुधाळ जनावरांसाठी दिले जात होतं. गेल्या दहा महिन्यात दहा कोटी पेक्षा जास्त कर्ज दुधाळ जनावरांच्या खरेदीसाठी जिल्हा बँकेने वितरित केले आहे. या योजनांमध्ये बदल केल्यावर शेतकऱ्यांना पूरक असं धोरण तयार केलं. बँक दरवर्षी दोन हजार कोटीपर्यंत कर्ज वितरण करते. पण या कोट्यावधीच्या कर्ज वितरणामध्ये जे समाधान मिळत नाही, ते समाधान आज केलेल्या सहा लाख कर्ज वितरणामध्ये आम्हाला मिळत आहे.या छोट्याशा कर्ज वितरणात जी काही निर्मिती होणार आहे जे काही भविष्य उज्वल होणार आहे. त्याला शेतकऱ्यांच्या दृष्टीने फार महत्त्व आहे. दुग्ध व्यवसाय म्हणून निवजे गाव मॉडेल म्हणून पुढे आणले गेले. तसेच सायलेज निर्मितीच्या दृष्टीने गावाने उत्पादक व्हावे व जिल्ह्या समोर यावे. असे प्रतिपादन मनिष दळवी यांनी यावेळी केले.
जिल्ह्यात दुधाचे उत्पादन वाढलं तरच सिंधुदुर्ग जिल्हा आत्मनिर्भर होऊ शकेल :अतुल काळसेकर
यावेळी बोलताना जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर म्हणाले पंतप्रधान आत्मनिर्भर पॅकेज कशा पद्धतीने जिल्ह्यात राबवता येईल शेतकऱ्यांना त्याचा लाभ कसा घेता येईल यासाठी प्रयत्न जिल्हा बँक करत आहे. १०० पेक्षा जास्त प्रकल्प अण्णासाहेब पाटील, शामराव पेजे सारख्या योजना कधी यापूर्वी शेतकऱ्यापर्यंत पोहोचवता येत नव्हत्या. यातील प्रमुख अडचण होती ती राष्ट्रीयकृत बँका सदर योजना या बँका राबवण्यासाठी तयार नव्हत्या. सुदैवाने खासदार नारायण राणे या खात्याचे कँबीनट मंत्री झाले व त्यांनी या योजनेसाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँक उपलब्ध करून दिली. निवजे गावात ताकद आहे त्यांनी १५० लिटर वरून ५५० लिटर दूध उत्पादन क्षमतेवर आपले गाव नेले आहे. वीस हजार लिटर दूध कोल्हापूरहून सिंधुदुर्ग मध्ये येते हा गॅप भरून काढायचा असेल तर आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन झालं पाहिजे. तरच सिंधुदुर्ग जिल्हा आत्मनिर्भर बनू शकतो यासाठी तुम्ही केलेले प्रयोग इतरांनाही दाखवा असे शेवटी अतुल काळसेकर म्हणाले.
भगीरथ प्रतिष्ठानच्यावतीने या योजनेचे लाभार्थी दत्तात्रय सावंत यांना २५ हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य यावेळी करण्यात आले. या रकमेचा धनादेश जिल्हा बँक अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या हस्ते लाभार्थ्याला देण्यात आला. यावेळी मुरघास यंत्र (सायलेज मशीन) चे उद्घाटन मनिष दळवी यांच्या हस्ते करण्यात आले.