मुंबई : ज्येष्ठ कीर्तनकार ह. भ. प. बाबा महाराज सातारकर यांचं निधन झालं. ते 89 वर्षांचे होते. नवी मुंबईतील नेरूळ इथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबा महाराज सातारकर यांच्या पार्थिवावर उद्या शुक्रवारी 27 ऑक्टोबरला संध्याकाळी 5 वाजता नेरुळ (Nerul) येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. दरम्यान, बाबा माहाराज सातारकर यांचं पार्थिव आज दुपारी तीननंतर अंतिम दर्शनासाठी नेरूळ जिमखाना समोर असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदीरात ठेवण्यात येईल.
ज्येष्ठ कीर्तनकार अशी त्यांची जगभरात प्रचिती होती. त्यांनी वारकरी संप्रदायाच्या सेवेची सव्वाशे वर्षांची परंपरा जपली होती. लहानपणापासूनच बाबा महाराज त्यांचे आजोबा आणि आई-वडिलांसोबत वारी करायचे. लहानपणापासून सुरु असलेली ही त्यांची वारी वयाच्या ८३ व्या वर्षीसुद्धा त्यांनी सुरु ठेवली होती. बाबा महाराज हे लहानपणापासूनच दादा महाराजांचे लाडके होते. लहानपणापासून ते त्यांच्यापुढे बसून कीर्तन ऐकायचे. तेव्हापासून त्यांच्या कानावर जे काही पडले ते त्यांच्या संस्कारात उतरले.
बाबा महाराज सातारकर यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1936 रोजी साताऱ्यात झाला. त्यांनी त्या काळी दहावीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं आहे. बाबा महाराज सातारकर यांच्या घरी शेकडो वर्षांपासून वारकरी सांप्रदायाची परंपरा आहे. ती त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत जपली. वयाच्या चौथ्या वर्षी कीर्तनाला सुरुवातवयाच्या चौथ्या वर्षी बाबा महराजांनी दादा महाराजांच्या कीर्तनात चाल म्हटली. त्यांना दादा महाराजांच्या पायाला जखम असतानाही चिखलात उभे राहून कीर्तन करताना पाहिले. आणि हीच निष्ठा पुढे बाबा महाराजांच्या पिढीने पुढेही जपली.
दादा महाराज हे बाबा महाराजांच्या आजोबाचे नाव. एक नातू म्हणून बाबा महाराजांनी आजोबांची सगळे चांगले गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. बाबा महाराजांच्या पिढीत आजपर्यंत वारी कोणी चुकवलेली नाही. आजोबा दादा महाराज, वडील भाऊ महाराज त्यानंतर मी. माझ्या पुढची मुलगी भगवतीताई, नातू चिन्मय महाराज अशी समर्थ पिढी वारकरी संप्रदायाच्या प्रचार-प्रसाराचे कार्य करीत होते.
वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी लिहीलेल्या एका लेखात त्यांना सांगितले होते की, "माझे वय ८३ आणि माझी वारी ८४ वी. त्याचे कारण म्हणजे माझी एक वारी आईच्या पोटात झाली आहे. " त्यांच्या वयोमानाने त्यांच्याकडून वारीत चालणे होत नव्हते तरी ते चार पाऊले वारीत चालून गाडीतून वारी अनुभवायचे.