नागपूर : कोकणसाद LIVEनं सिंधुदुर्गची आरोग्य परिस्थिती समोर आणल्यानंतर हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा चर्चेत आला. आमदार वैभव नाईक, सत्ताधारी आमदार नितेश राणे, मंत्री दीपक केसरकर यांच्यानंतर पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनीही याची गंभीर दखल घेत येणाऱ्या काही दिवसात चांगल्या आरोग्य सुविधा सिंधुदुर्गत उपलब्ध होतील असा विश्वास तमाम सिंधुदुर्गवासियांना दिला आहे. तर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर व आमदार नितेश राणे यांनी देखील आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच लक्ष वेधलं. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसह बैठक लावत जिल्ह्यातील आरोग्य समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालयांसह इतर रूग्णालयातील डॉक्टर व त्यांची असणारी कमतरता हा सर्वात मोठा असणारा विषय जिल्ह्यात आहे. औषध पुरवठा व उपलब्धतेबाबत जिल्हा नियोजनमधून औषध उपलब्ध करून देण आवश्यक होत त्याप्रमाणे औषध उपलब्ध आहेत. डॉक्टरशी कमतरता भरून काढण्यासाठी आमचा व शासनाचा प्रयत्न सुरु आहे. त्याबाबत आम्ही प्रयत्नशील आहोत. शासकीय रूग्णालयात डॉक्टरची कमतरता हा सरकार समोरचा मोठा प्रश्न आहे. याची मलाही कल्पना आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु झाल आहे. पुर्वीच जिल्हा रूग्णालय त्याला जोडण्यात आले आहे. त्यामुळे तिथल्या गैरसोयीबाबत बैठका घेऊन त्यात सुधारणा करण्याच्या दृष्टीने आपले प्रयत्न सुरू आहेत. आवश्यक उपाययोजना आम्ही करत असतो.
तर डॉक्टरांची कमतरता लक्षात घेता प्राथमिक आरोग्य केंद्रात वेगळ्या पद्धतीने टेलीमेडीसीनच्या माध्यमातून वेगळी यंत्रणा आपण उभारत आहेत. त्यात यशही येत आहे. टेलीमेडीसींनच्या माध्यमातून रूग्णांची तपासणी करून तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार केले जातात. चांगल्या पद्धतीने ही यंत्रणा कार्यरत आहे. त्याचा प्रचार आणि प्रसार होण हे देखील आवश्यक आहे. तर येणाऱ्या काही दिवसात चांगल्या आरोग्य सुविधा सिंधुदुर्गला उपलब्ध होतील याची मला खात्री आहे असा दावा करत पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्गच्या हेल्दी आरोग्यासाठीचा विश्वास सिंधुदुर्गकरांना दिला आहे.
दरम्यान, काल रात्री शालेय शिक्षणमंत्री सावंतावडीचे आमदार दीपक केसरकर यांनी आरोग्यमंत्री डॉ तानाजी सावंत यांची भेट घेतली. उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी, वेंगुर्ला व दोडामार्ग येथील रुग्णालयांच्या समस्यांबाबत त्यांनी लक्ष वेधलं. यावेळी आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते. या बैठकीत तिन्ही तालुक्यातील उपजिल्हा व ग्रामीण रूग्णालयातील रिक्तपद भरण्यासाठी प्रामुख्याने चर्चा झाली. विशेष तज्ञांची पद देखील भरली जाणार आहेत. तर सावंतवाडीतील भुलतज्ञांचे थकीत मानधन अदा केल जाणार आहे. तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांच मानधन देखील डिसेंबर अखेरपर्यंत काढलं जाणार आहे अशी माहिती केसरकर यांनी दिली. तर डॉक्टरांना क्वार्टर्स बांधून देण्यासाठीची चर्चा देखील या बैठकीत झाली. वेंगुर्ला, दोडामार्गात शवविच्छेदन गृहासाठी प्रस्ताव करण्याची सुचना केली. तिन्ही तालुक्यातील रूग्णालयातील समस्यांवर राज्यातील आरोग्य यंत्रणेच लक्ष वेधल गेलं.
तसेच आमदार नितेश राणे यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे आरोग्य मंत्री यांची भेट घेतली. सार्वजनिक आरोग्य विभागाचे मुख्य सचिव डॉ.म्हैसकर, कमिशनर डॉ. धीरज कुमार, डायरेक्टर डॉ.कंदेवाड, डेप्युटी डायरेक्ट डॉ.दिलीप माने,सिंधुदुर्ग जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील व या विषयाशी संबंधित इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत यावेळी बैठक झाली. याप्रसंगी कणकवली उपजिल्हा रुग्णालय, देवगड, वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात अधीक्षक आणि तज्ज्ञ डॉक्टरांची पदे लवकरच भरली जातील. मेडिकल ऑफिसर तांत्रिक आणि अ तांत्रिक कर्मचारी महिना - दीड महिन्यात नियुक्त केले जातील. काही डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांची नव्याने भरती केली जाईल. तर काही पदे बदली प्रक्रियेतून भरली जातील. कणकवली विधानसभा मतदारसंघात आरोग्याच्या संदर्भात कोणत्याच तक्रारी येणार नाहीत अशा पद्धतीची सेवा आपण देऊ असे आश्वासन राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आरोग्य विभागाच्या बैठकीत आमदार नितेश राणे यांना दिले. डॉक्टर नसल्यामुळे आरोग्य सेवेचा जो खोळंबा होत आहे तो होणार नाही. चांगली सेवा प्रत्येक रुग्णाला मिळेल अशा पद्धतीची व्यवस्था या प्रत्येक रुग्णालयात करून देण्याचा विश्वास आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आमदार नितेश राणे यांना या बैठकीत दिला.
एकंदरीत, आमदारांसह स्वतः पालकमंत्री यांनी आरोग्याच्या समस्यांकडे जातीनिहाय लक्ष घालत आरोग्य मंत्र्यांचं लक्ष वेधल्यानं सिंधुदुर्गवासियांना दिलासा मिळाला आहे. कोकणचे सुपुत्र असणाऱ्या या लोकप्रतिनिधींच्या मागण्यांना यश येऊन चांगले डॉक्टर सेवेत रूजू होऊन आरोग्यदृष्ट्या सिंधुदुर्ग आत्मनिर्भर बनो अशी भावना सिंधुदुर्गवासिय आता व्यक्त करत आहेत