LIVE UPDATES

संकटग्रस्तांच्या मदतीसाठी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा संवेदनशील पुढाकार

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ११ लाख रुपयांची मदत
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 27, 2026 08:00 PM
views 25  views

चिपळूण : दुष्काळासारख्या नैसर्गिक संकटाचा सामना करणाऱ्या बांधवांना मदतीचा हात देणे, ही केवळ सामाजिक जबाबदारी नसून माणुसकीच्या नात्याने जपलेले कर्तव्य आहे. याच भावनेतून रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ११ लाख रुपयांची मदत देण्यात आली. या मदतीचा धनादेश राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

नैसर्गिक संकटाच्या काळात अडचणीत सापडलेल्या नागरिकांना आधार देणे, त्यांच्या दुःखात सहभागी होणे आणि त्यांना पुन्हा उभे राहण्यासाठी बळ देणे, हीच खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी आहे. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने दिलेल्या या योगदानातून सहकार क्षेत्रातील सामाजिक जाणीव, संवेदनशीलता आणि समाजाप्रती असलेली कर्तव्यभावना अधोरेखित झाली आहे.

संकटाच्या काळात मदतीचा हात पुढे करणाऱ्या अशा उपक्रमांमुळे गरजू नागरिकांना दिलासा मिळण्यास मदत होते. समाजातील विविध घटकांनी एकत्र येऊन संकटग्रस्तांच्या पाठीशी उभे राहणे, हीच माणुसकीची खरी ओळख आहे. यावेळी आमदार शेखर निकम, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव, संचालक राजेंद्र सुर्वे, संचालक अजित यशवंतराव आदी मान्यवर उपस्थित होते.