
रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील मौजे कुर्धे मेर्वी येथे सुमारे ४५ फूट खोल विहिरीमध्ये पडलेल्या एका रानडुकराला वनविभागाच्या पथकाने अत्यंत शिताफीने व तातडीने बचाव मोहीम राबवून सुखरूप बाहेर काढले. २७ ऑक्टोबर २०२६ रोजी कुर्धे मेर्वी येथील रहिवासी शुभदा महेश पाध्ये यांच्या मालकीच्या विहिरीत हा वन्यप्राणी पडल्याचे स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास आले होते. गावखडी येथील कासवमित्र प्रदीप डिंगणकर यांनी या घटनेची माहिती वनविभागाला दिल्यानंतर वनअधिकाऱ्यांनी तातडीने वरिष्ठांशी संपर्क साधून घटनास्थळी धाव घेतली.
घटनास्थळाची पाहणी केली असता सुमारे १५ फूट गोलाई आणि तब्बल ४५ फूट खोल असलेल्या विहिरीमध्ये सुमारे १५ फूट पाण्याच्या पातळीवर रानडुक्कर पोहत असल्याचे दिसून आले. पाण्याचा अचूक अंदाज घेऊन वनविभागाच्या बचाव पथकाने कोणतीही दुखापत होणार नाही अशा पद्धतीने विशेष पिंजरा विहिरीतील पाण्यात सोडला. त्यानंतर अत्यंत कौशल्याने त्या रानडुकराला पिंजऱ्यात जेरबंद करून सुखरूप बाहेर काढण्यात आले.
विहिरीतून बाहेर काढल्यानंतर हरचेरी येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत त्या वन्यप्राण्याची सखोल प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणीअंती हा वन्यप्राणी पूर्णपणे तंदुरुस्त व सुस्थितीत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याला वनविभागाच्या देखरेखीखाली सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.
सदर यशस्वी बचाव मोहीम विभागीय वन अधिकारी (रत्नागिरी-चिपळूण) गिरीजा देसाई व सहायक वनसंरक्षक प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान घटनास्थळी रत्नागिरीचे परिक्षेत्र वन अधिकारी विक्रम गुरव, जाकादेवीच्या वनरक्षक शर्वरी कदम, महेश धोत्रे, कासवमित्र प्रदीप डिंगणकर, सर्पमित्र वरद हळबे तसेच इशांत खानोलकर उपस्थित होते. वनविभागाने दाखवलेली तत्परता आणि केलेल्या यशस्वी बचाव कार्याचे स्थानिक ग्रामस्थांमधून विशेष कौतुक होत आहे.









