LIVE UPDATES

मौदेतील जमीन व्यवहारांची चौकशी करा

ग्रामस्थांची तहसीलदारांकडे मागणी
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 27, 2026 08:40 PM
views 80  views

वैभववाडी : मौदे गावातील शेतजमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहारांमध्ये कथित अनियमितता होत असल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन व्यवहार होत असल्याच्या संशयासह सरकारी जमिनींवरील अतिक्रमण आणि प्रस्तावित प्रकल्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित बेकायदा कामांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

मौदे गावातील विविध भागांतील शेतजमिनींचे खरेदी-विक्री व्यवहार सध्या सुरू आहेत. या व्यवहारांमध्ये गावाबाहेरील तसेच जिल्ह्याबाहेरील व्यक्ती आणि संस्थांकडून जमिनी खरेदी केल्या जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र, या व्यवहारांची प्रक्रिया नियमानुसार सुरू आहे का, याबाबत त्यांनी शंका उपस्थित केली आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी थेट तहसील कार्यालय गाठून चौकशीची मागणी केली.

जमीन व्यवहारांसाठी सादर करण्यात आलेली प्रतिज्ञापत्रे, वारस नोंदी, महसुली अभिलेख आणि अन्य कागदपत्रांची सत्यता तपासावी. तसेच संबंधित शेतजमिनींच्या खरेदी-विक्रीसाठी आवश्यक कायदेशीर परवानग्या घेण्यात आल्या आहेत का, याची पडताळणी करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

दरम्यान, काही ठिकाणी प्रस्तावित किंवा सुरू असलेल्या प्रकल्पांच्या नावाखाली जमीनमालकांची पूर्वसंमती न घेता तसेच आवश्यक कायदेशीर हक्क आणि शासकीय परवानग्यांशिवाय जमिनीवर कामे सुरू असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे.

संबंधित जागांवर माती भराव करणे, रस्ते तयार करणे, बांधकाम करणे, कुंपण घालणे आणि जमीन सपाट करण्यासारख्या कामांद्वारे जमिनीचा ताबा मिळविण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकारांची प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

गावातील सरकारी जमीन, गायरान, सार्वजनिक रस्ते, नाले आणि सार्वजनिक वापरासाठी राखीव असलेल्या जागांवर अतिक्रमण झाले आहे का, याचीही तपासणी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अशा ठिकाणी अतिक्रमण आढळल्यास संबंधित जमिनींची अधिकृत मोजणी करून अतिक्रमण निश्चित करावे आणि नियमानुसार कारवाई करावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

याशिवाय संबंधित जमिनींचे सातबारा उतारे, आठ-अ उतारे, फेरफार नोंदी, गाव नमुने, मोजणी नकाशे आणि अन्य महसुली कागदपत्रांची सखोल पडताळणी करावी. जमीन व्यवहारांमध्ये कागदपत्रांची बनावटगिरी, नोंदींमधील तफावत किंवा अन्य अनियमितता आढळल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कारवाई करावी, अशी ठाम मागणी मौदे ग्रामस्थांनी केली आहे.