
देवगड : मिठमुंबरी-बागवाडी येथील जेटीवर प्रस्तावित कायकिंग पर्यटन प्रकल्पावरून सुरू झालेला वाद आता अधिक चिघळण्याची चिन्हे आहेत. पारंपरिक मच्छीमारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित करत माजी आमदार परशुराम ऊर्फ जीजी उपरकर यांनी पोलिसांना दोन दिवसांची मुदत देत निर्णय न झाल्यास देवगड पोलीस ठाण्यासमोर ‘जेलभरो’ आंदोलन करण्याचा इशारा दिला. “आम्ही सातच गुन्हेगार आहोत का? आम्हा सर्वांनाच अटक करा,” अशी आक्रमक भूमिकाही त्यांनी मांडली. त्यानंतर शिवसेना युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनीही मच्छीमारांची बाजू घेत प्रशासनाला धारेवर धरले.
मिठमुंबरी-बागवाडी येथील जेटीवर कायकिंग पर्यटन प्रकल्पाच्या शुभारंभ कार्यक्रमादरम्यान स्थानिक मच्छीमारांनी विरोध दर्शविल्यानंतर पोलिसांकडून सात स्थानिक मच्छीमारांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याचे ग्रामस्थांच्या निवेदनात नमूद आहे. या कारवाईच्या निषेधार्थ सुमारे ५० मच्छीमार बांधवांच्या सह्यांचे निवेदन देवगड पोलीस निरीक्षक शाम बुवा यांना देण्यात आले. स्थानिकांना धमकावल्याचा आरोप असलेल्या बाहेरील व्यक्तींवरही गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
मिठमुंबरी-बागवाडी येथील मच्छीमारांशी संवाद साधताना परशुराम ऊर्फ जीजी उपरकर यांनी पारंपरिक मच्छीमारांच्या हक्कांचा मुद्दा उपस्थित केला. मच्छीमारी हा येथील कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा पिढीजात व्यवसाय असून, कायकिंग प्रकल्पाला मच्छीमारांचा विरोध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, हा प्रकल्प पारंपरिक मच्छीमारीच्या आड येत असेल, तर त्याला विरोध कायम राहील, अशी भूमिका त्यांनी मांडली.
“स्थानिक मच्छीमारांना धमकावले जात असल्याच्या तक्रारी आहेत. काही मच्छीमार महिला व ग्रामस्थांनाही दमदाटी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. अशा परिस्थितीत पोलिसांनी केवळ स्थानिक मच्छीमारांवरच गुन्हे दाखल करणे योग्य आहे का? धमकी देणाऱ्यांवरही गुन्हे दाखल झाले पाहिजेत,” असा सवाल उपरकर यांनी उपस्थित केला.
पोलिसांनी दोन दिवसांत योग्य निर्णय न घेतल्यास तारामुंबरी, मिठमुंबरी, बागवाडीसह जिल्ह्यातील मच्छीमारांना एकत्र करून जेलभरो आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. मच्छीमारांच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
मिठमुंबरी-बागवाडी समुद्रकिनाऱ्यावर पार्किंग व पर्यटनविकासासाठी मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध असून, तेथे कायकिंगसारखा पर्यटन प्रकल्प उभारण्यास आपला विरोध नसल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले. मात्र, ज्या जेटीचा वापर स्थानिक मच्छीमार अनेक वर्षांपासून पारंपरिक मासेमारीसाठी करतात, त्याच ठिकाणी पर्यटन प्रकल्प राबविण्याचा आग्रह का धरला जात आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
स्थानिकांना विश्वासात घेऊन आणि त्यांच्या व्यवसायाला बाधा येणार नाही, याची काळजी घेऊन विकासकामे केली, तर त्याला ग्रामस्थांचा विरोध राहणार नाही. पर्यायी जागेचा प्रस्ताव देऊनही त्याचा विचार न करता जेटीवरच प्रकल्प राबविण्याचा आग्रह धरणे चुकीचे असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
जेटी सील करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी मिठमुंबरी-बागवाडी येथे भेट देऊन मच्छीमारांशी संवाद साधला. त्यानंतर बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांकडे प्रकल्पाच्या परवानग्या आणि प्रवासी जेटी बंद करण्याच्या आदेशाबाबत विचारणा केली.
कायकिंग प्रकल्पासाठी आवश्यक परवानगीचे पत्र तसेच प्रवासी जेटी बंद करण्याचे लेखी आदेश दाखविण्याची मागणी नाईक यांनी केली. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांकडे कायकिंग प्रकल्पाच्या परवानगीसाठी मागविलेल्या कागदपत्रांबाबतचे पत्रही उपलब्ध नसल्याचे आणि प्रवासी जेटी तोंडी आदेशावर बंद केल्याचे सांगण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
केवळ ग्रामपंचायतीच्या ना-हरकत प्रमाणपत्राच्या (एनओसी) आधारे प्रकल्प सुरू करण्याचा प्रयत्न झाला का? प्रकल्पासाठी आवश्यक विभागीय परवानग्यांची खातरजमा का करण्यात आली नाही? असे प्रश्न नाईक यांनी उपस्थित केले.
डीओटी आणि महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाच्या परवानग्यांबाबतही त्यांनी आक्षेप नोंदविला. हा खासगी कंपनीचा कायकिंग प्रकल्प असून तो सरकारी कार्यक्रम नव्हता, असे सांगत उद्घाटनावेळी स्थानिक मच्छीमारांनी आपली बाजू मांडली असताना त्यांच्यावर गुन्हे का दाखल करण्यात आले, असा सवाल त्यांनी केला.
मच्छीमारांच्या व्यवसायाला आपला विरोध नसून, त्यांच्या पारंपरिक उपजीविकेवर गदा येऊ नये, हीच भूमिका असल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले. स्थानिकांना धमकावल्याचा आरोप असलेल्या व्यक्तींवरही गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी पोलीस निरीक्षक शाम बुवा यांच्याकडे केली. या प्रकरणात पोलिसांनी योग्य भूमिका न घेतल्यास पोलीस अधीक्षकांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या वेळी बंदर निरीक्षक अमोल ताम्हणकर, सहाय्यक बंदर निरीक्षक योगेश चोडणेकर, सहाय्यक बंदर निरीक्षक सुहास गुरव, बंदर विभागाचे चौकीदार प्रकाश खुडे यांच्यासह युवासेना तालुकाप्रमुख गणेश गावकर, शिवसेना तालुकाप्रमुख रवींद्र जोगल, माजी नगरसेवक विकास कोयंडे आणि मिठमुंबरी-बागवाडी येथील मच्छीमार बांधव व महिला उपस्थित होत्या.








