LIVE UPDATES

कुडाळ कचरा प्रश्नावर तोडगा

नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांच्या मध्यस्थीने दोन महिन्यांची मुदतवाढ
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 08, 2026 10:39 AM
views 96  views
#kokansadlive#news update#konkan update#

कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्या ऐरणीवर आलेल्या कचरा व्यवस्थापनाच्या गंभीर प्रश्नावर अखेर सकारात्मक तोडगा निघाला आहे. कुडाळच्या नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांनी केलेल्या यशस्वी मध्यस्थीमुळे कचरा प्रक्रियेसाठी लागणाऱ्या जागेसाठी दोन महिन्यांची वाढीव मुदत मिळवण्यात यश आले आहे.  

एम.आय.डी.सी. मधील मुख्य घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू होईपर्यंत पर्यायी आणि तात्पुरती व्यवस्था म्हणून उत्कर्ष नगर येथील जागेचा वापर केला जात होता. या जागेवर ओला व सुका कचरा वर्गीकरण करून त्यावर प्रक्रिया करणे आणि तात्पुरत्या स्वरूपात कचरा साठवणे यासाठी जागेची परवानगी मागण्यात आली होती.  

नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांच्या मध्यस्थीनंतर, जागा मालक नारायण वसंत राऊळ यांनी सार्वजनिक आरोग्याचा आणि नगरपंचायतीच्या पत्राचा सहानभूतीपूर्वक विचार केला. यावेळी Ceo खंडू पवळ व नगरसेविका नयना मांजरेकर यांची उपस्थिती होती. या कार्यात प्रसाद कुंटे यांनी विशेष सहकार्य केले. मुख्य घनकचरा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू होईपर्यंत, ०७/१०/२०२६ पासून पुढील २ महिन्यांसाठी आपल्या मालकीची ही जागा घनकचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी वापरण्यास मुदतवाढ देण्याचे पत्र त्यांनी नगरपंचायतीला दिले आहे.  

नगरपंचायतीने या पत्राची आवक नोंद (क्रमांक ४४०८, दिनांक ०७/१०/२०२६) केली असून, या निर्णयामुळे कुडाळ शहरातील कचऱ्याचा बिकट प्रश्न तात्पुरता सुटला असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.