रक्तपेढ्यांमध्ये अॅलिकॉट मशीन उपलब्ध करा, आरोग्यमंत्र्यांचं वेधलं लक्ष

आरोग्यमंत्र्यांच्या यंत्रणेला सूचना
Edited by: विनायक गावस
Published on: December 13, 2023 18:06 PM
views 180  views

सिंधुदुर्ग : राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये अॅलिकॉट मशीन उपलब्ध करण्याबाबतचा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. याप्रसंगी राज्य मानवाधिकार आयोग यांच्यासमोर केलेल्या प्रतिज्ञापत्राप्रमाणे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्त्याखालील ज्या शासकीय रक्तकेंद्रामध्ये Sterile Connceting Device मशीन उपलब्ध नाही अशा ठिकाणी हे मशीन व त्यासाठी लागणारे कन्झुमेबल्स येत्या एक वर्षाच्या कालावधीमध्ये निधीच्या उपलब्धतेनुसार व आवश्यक ती खरेदीची प्रक्रिया अवलंबून खरेदी करण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जिल्हा शल्य चिकित्सक व वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या वैद्यकीय अधिक्षक यांना राज्य रक्त संक्रमण परिषदेमार्फत देण्यात आल्या आहेत अशी लेखी माहिती आरोग्यमंत्री डॉ तानाजी सावंत यांनी दिली. तसेच या मशीनसाठी स्वतंत्र तंत्रज्ञ नेमण्याची गरज नाही असंही ते म्हणाले. 


अॅलिकॉट मशीनचे तंत्रज्ञान हे नवीन नाही. ॲलिकॉट मशीन हे लहान यंत्र असून रक्ताची ३५० मि.ली. ची पूर्ण बॅग गरजेप्रमाणे विभाजन करुन बालरुग्णांना अचूक तेवढेच रक्त देण्यासाठी या मशीनचा उपयोग होतो. यासाठी विशेष प्रशिक्षणाची गरज नाही. सध्या कार्यरत असलेले रक्तकेंद्र तंत्रज्ञ ही मशीन वापरु शकतात असं डॉ. तानाजी सावंत म्हणाले. विधानसभेत सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री यांनी लेखी उत्तर देत भुमिका स्पष्ट केली आहे. रक्ताशी संबंधित विविध प्रकारचे आजार असलेल्या लहान मुलांमध्ये प्रौढ रुग्णांइतकी रक्ताची गरज लागत नसल्यामुळे रक्त वाया जाऊ नये यासाठी रक्तपेढ्यांमध्ये ॲलिकॉट मशीन म्हणजे रक्ताच्या लहान पिशव्या तयार करणारे यंत्र उपलब्ध असणे गरजेचे आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या ३१ रक्तपेढ्यांपैकी केवळ ८ रक्तपेढ्याध्ये तसेच वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील १४ रुग्णालयांपैकी केवळ ३ ठिकाणी ॲलिकॉट मशीन ही सुविधा उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितलं.