
भूखंडावरील स्थगितीही उठवली
विधान भवनात उद्योगमंत्र्यांसोबत बैठक
दोडामार्ग : तालुक्यातील आडाळी एमआयडीसीमधील उद्योगधंद्यांना गती देण्यासाठी आणि प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन येथे विशेष बैठक पार पडली. सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांच्या आग्रही पाठपुराव्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत आडाळी एमआयडीसीसंदर्भात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
बैठकीतील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे, पूर्वी भूखंड खरेदी केलेल्या उद्योजकांच्या भूखंड ताबा, करार प्रक्रिया आणि बांधकाम परवानगीवरील स्थगिती उठविण्यात आली आहे. त्यामुळे आता संबंधित उद्योजकांना उद्योग उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
याशिवाय, नव्या इच्छुक उद्योजकांसाठी भूखंड वाटपाची ऑनलाइन प्रक्रिया येत्या दोन आठवड्यांत सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच आडाळी एमआयडीसी परिसरात प्रस्तावित असलेला गोल्फ कोर्स प्रकल्प रद्द करण्याचाही निर्णय बैठकीत घेण्यात आला.
उद्योगांना चालना देण्यासाठी आणि गुंतवणूक आकर्षित करण्याच्या उद्देशाने ऑगस्ट महिन्यात गोवा येथे विशेष गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच रत्नागिरी येथील एमआयडीसी कार्यालयात वारंवार जावे लागू नये म्हणून दर गुरुवारी आडाळी येथे एमआयडीसीचे अधिकारी उद्योजकांच्या कामकाजासाठी उपलब्ध राहतील, अशी सुविधाही सुरू करण्यात येणार आहे.
बैठकीत इन्सुली ते आडाळी ३३ केव्ही पर्यायी वीजवाहिनीचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले. तसेच तिलारी पाणीपुरवठा योजनेच्या पाण्याचा वापर करून डेटा सेंटरसारखे उद्योग उभारण्याच्या शक्यतेचा अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे आदेशही देण्यात आले.
आडाळी एमआयडीसीमधील इतर प्रलंबित प्रश्नांवरही सकारात्मक चर्चा करण्यात आली असून परिसरातील औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी प्रशासनाने आवश्यक ती पावले उचलण्याचा निर्णय घेतला.
या बैठकीला उद्योग विभागाचे वरिष्ठ अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे पदाधिकारी, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे (ऑनलाइन), तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत आडाळी एमआयडीसीसंदर्भात सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल आमदार दीपक केसरकर यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांचे आभार मानले असून, या निर्णयांमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात औद्योगिक गुंतवणुकीला मोठी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.













