
पात्र यादी लवकरच प्रसिद्ध होणार
सिंधुदुर्गनगरी : शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तब्बल ६ हजार ७१० शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले असून, त्यांना ५३ कोटी ८३ लाख २० हजार ७९९ रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची माहिती शासनाच्या विशेष पोर्टलवर अपलोड करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, ही प्रक्रिया पूर्ण होताच पात्र लाभार्थ्यांची अधिकृत यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
याशिवाय, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याची प्रक्रियाही पुढील टप्प्यात राबविण्यात येणार असून, त्यासाठी स्वतंत्र पात्र यादी तयार केली जाणार आहे.
जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ४,००८ शेतकऱ्यांचा समावेश असून, त्यांची २० कोटी ६९ लाख ५७ हजार रुपयांची कर्जमाफी होणार आहे. यापैकी ३,९५६ शेतकऱ्यांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली असून, उर्वरित ५२ कर्जखात्यांची माहिती अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
तर, जिल्ह्यातील विविध राष्ट्रीयीकृत, व्यापारी व ग्रामीण बँकांमधील २,७०२ शेतकऱ्यांना मिळून ३३ कोटी १३ लाख ६३ हजार ७९९ रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. जिल्ह्यातील एकूण १९ बँकांपैकी ५,९९४ शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे.
दरम्यान, काही शेतकरी योजनेसाठी अपात्र ठरले आहेत. शासनाने निश्चित केलेल्या कालावधीपूर्वीची कर्जे असणे, तसेच काही कर्जदार विविध शासकीय किंवा इतर पदांवर कार्यरत असणे आदी कारणांमुळे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
योजनेच्या अंमलबजावणीसाठी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील थकीत कर्जखात्यांची माहिती शासकीय लेखापरीक्षकांकडून तपासण्यात आली आहे. पात्र ठरलेल्या कर्जखात्यांची माहिती शासनाच्या विशेष पोर्टलवर अपलोड करण्यात येत असून, राष्ट्रीयीकृत व इतर बँकांकडूनही ही प्रक्रिया स्वतंत्रपणे सुरू आहे.
सर्व माहिती अपलोड झाल्यानंतर शासनाकडून संगणकीय पडताळणी केली जाईल. त्यानंतर आधार प्रमाणीकरणासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. ही यादी निबंधक कार्यालय, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था आणि स्थानिक स्तरावर उपलब्ध करून दिली जाणार आहे.
प्रशासनाने पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, यादी प्रसिद्ध झाल्यानंतर सेवा सुविधा केंद्रामार्फत ऑनलाइन आधार प्रमाणीकरण वेळेत पूर्ण करावे. आधार प्रमाणीकरणानंतरच कर्जमाफीची पुढील कार्यवाही होणार असल्याने शेतकऱ्यांनी शासनाच्या सूचनांकडे लक्ष देऊन आवश्यक प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी.
ठळक मुद्दे
६,७१० शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र
५३.८३ कोटी रुपयांची कर्जमाफी मंजूर
जिल्हा बँकेच्या ४,००८ शेतकऱ्यांना २०.६९ कोटींचा लाभ
इतर बँकांच्या २,७०२ शेतकऱ्यांना ३३.१३ कोटींची कर्जमाफी
पात्र लाभार्थ्यांची यादी लवकरच प्रसिद्ध होणार
नियमित कर्जफेड करणाऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान मिळणार













