
बंदोबस्त करण्याचं नगराध्यक्षांचं आवाहन
मालवण : पालिका हद्दीतील रेवतळे आणि सागरी महामार्ग परिसरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट प्रचंड वाढला असून यामुळे नागरिक आणि पशुधनाच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी आज रेवतळे भागातील महिलांनी नगराध्यक्षा ममता वराडकर यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे. यावर नगराध्यक्षांनी, आरोग्य विभागाच्यावतीने भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी नवी निविदा काढण्यात आली असून लवकरच पुढील कार्यवाही सुरू होईल, अशी माहिती महिलांना दिली.
महिलांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रेवतळे व सागरी महामार्ग परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हे कुत्रे रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावर धावून जाणे, भुंकणे आणि चावण्याचा प्रयत्न करणे अशा घटना सतत घडत आहेत. शाळेत जाणारी लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सकाळी सागरी महामार्गावर जॉगिंगसाठी जाणाऱ्या नागरिकांनाही धास्ती लागली आहे. सागरी महामार्गावर अचानक कुत्रे आडवे आल्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनांचे अपघात वाढले आहेत. कुत्र्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात वाहनचालकांना अचानक ब्रेक लावावे लागत असल्याने गंभीर जीवितहानीची शक्यता निर्माण झाली आहे. भटक्या कुत्र्यांचे टोळके एकत्र येऊन गाई-गुरांच्या लहान वासरांवर आणि इतर पाळीव जनावरांवर जीवघेणे हल्ले करत आहेत, ज्यामुळे शेतकरी आणि पशुपालकांचे मोठे नुकसान होत आहे.
भविष्यात भटक्या कुत्र्यांमुळे कोणतीही मनुष्यहानी किंवा पशुहानी झाल्यास त्याला सर्वस्वी नगरपालिका प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही महिलांनी पत्राद्वारे दिला आहे. महिलांच्या तक्रारी ऐकून घेतल्यानंतर नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी स्पष्ट केले की, पालिकेच्या वतीने यापूर्वी ८०० भटक्या कुत्र्यांचे यशस्वीरित्या निर्बिजीकरण करण्यात आले आहे. आता वाढत्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी नव्याने ४०० भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण केले जाणार असून, आरोग्य विभागामार्फत याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू करण्यात येत आहे.
यावेळी अमृता फाटक, मीना फाटक, वेदिका गोसावी, मेधा मुरकर, दर्शना चव्हाण, प्राजक्ता हळदणकर, तारका चव्हाण, स्वाती बादेकर, मोहिनी हडकर, राखी हडकर, सीमा गावडे, दीपाली मांजरेकर, पूजा मांजरेकर आणि अपर्णा मडये आदी महिलांचा समावेश होता.












