
सुदैवाने नाही मनुष्यहानी ; ग्रामस्थ संतप्त
सावंतवाडी : सरकारला माणसांचा असो वा प्राण्यांचा जीव एवढा स्वतः वाटतो का ? असा सवाल आंबोलीतील प्रकारामुळे उपस्थित होत आहे. महावितरणचा हा गलथान कारभार आज आंबोलीच्या जीवावर उठणारा ठरला आहे. नुकत्याच घडलेल्या या घटनेत दोन जनावरांचा बळी गेला असून सुदैवाने मनुष्य हानी टळली. मात्र, यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले असून माणसांचे, जनावरांचे जाणारे बळी बघता आणखीन किती बळी घेतल्यावर सरकारला, उर्जा मंत्र्यांना जाग येणार ? असा सवाल सर्वसामान्यांतून उपस्थित होत आहे.
आंबोली मुळवंदवाडी येथील शेतकरी भिसाजी महादेव सरमळकर यांची गाभण म्हैस व रेडकू यांना वीजेचा धक्का बसल्याने ते जागीच ठार झाले. शेतातून चरायला जात असताना जमिनीवर पडलेल्या विद्युत भारीत तारांचा स्पर्श होऊन ही घटना घडली. सुदैवाने यात मनुष्य हानी झाली नसली तरी महावितरणच्या भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
ग्रामीण भागासह शहरी भागातील महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आहे. या ढिसाळ कारभारामुळे आजवर अनेकांचे बळी गेलेत. मंगळवारी दुपारच्या सुमारास आंबोलीत शेतकऱ्याला आपली गाभण म्हैस व रेडकू यांना गमवावे लागले. चरण्यासाठी जात असताना शेतात पडलेल्या विद्युत भारीत तारांचा स्पर्श होऊन त्या जागीच ठार झाल्या. दैव बलवत्तर म्हणून यात मनुष्यहानी झाली नाही. अन्यथा, मोठा अनर्थ घडला असता. मात्र, दोन जनावर जागीच ठार झाल्याने शेतकरी श्री. सरमळकर यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जवळपास दीड लाखांचे नुकसान यात झाले असून येथील गणपत गावडे यांनी प्रसंगावधान राखल्याने इतर जनावरांना त्यांनी रोखून धरले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. त्यात मंगळवारी उशीरापर्यंत पंचनाम्यासाठी प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही. जोवर पंचनामा होत नाही तोवर मृत गुरांना हलवणार नाही अशी भूमिका शेतकऱ्याने घेतल्यानंतर प्रशासनाला जाग आली. काल बुधवारी सायंकाळी पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन दिले गेले. यानंतर शेतकऱ्यांकडून गुरांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले.
दरम्यान, यासह नांगरतास भागात नव्याने बसविण्यात आलेले विद्युत पोल हे धोकादायक पद्धतीने बसविण्यात आलेत. तिथे देखील अशाच घटना पावसात घडण्याची शक्यता आहे. त्या प्रकारची भिती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. मात्र, लोकांचे जीव म्हणजे खेळ समजणाऱ्या महावितरण आणि सरकारला त्याच काही पडलेलं नाहीय. याबाबत विचारणा करण्यासाठी महावितरणचे उप कार्यकारी अभियंता शैलेश राक्षे यांना फोन केला असता त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद देखील मिळाला नाही. महावितरणच्या या गलथान कारभारामुळे आजवर अनेकांचे बळी गेलेत. केवळ पाच लाखांची मदत देत माणसांची किंमत करण्याचे काम सरकारकडून होते. मनुष्याला ५ लाखांचा तर जनावरांचा रेट जेमतेम नुकसानभरपाईत ठरवला जातो. यापूर्वीच्या अधिवेशनात आमदार निलेश राणेंनी देखील वीज अपघात व बळींकडे सरकारच लक्ष वेधले होते. मात्र, सरकारला त्याच गांभीर्य अद्याप जाणवलेल नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे संबंधित विभागाच्या चुकांमुळे होणारे विद्युत अपघात, जाणारे मनुष्य अन् प्राण्यांचे बळी बघता आणखीन किती बळी घेतल्यावर सरकारला जाग येणार ? राज्याचे मुख्यमंत्रीच उर्जा खात्याचे प्रमुख असल्याने त्यांचे डोळे कधी उघडणार ? असा सवाल आता संतप्त लोकांकडून केला जात आहे.











