
मुंबई : राज्यातील सहकार क्षेत्राशी संबंधित अनेक संस्थांच्या निवडणुकांबाबत राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आगामी दोन महिन्यांत होणाऱ्या तसेच पुढील वर्षासाठी नियोजित असलेल्या अनेक सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, साखर कारखाने आणि सूत गिरण्यांसारख्या संस्थांचा समावेश असल्याचे वृत्त आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि प्रशासकीय यंत्रणेवरील वाढता ताण लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
दुष्काळ निवारणाच्या कामांना प्राधान्य
राज्यातील अनेक तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, पाणीटंचाईसह विविध समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी महसूल आणि प्रशासकीय यंत्रणा कार्यरत आहे. अशा परिस्थितीत सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ आणि प्रशासकीय यंत्रणा उपलब्ध करून दिल्यास दुष्काळ निवारणाच्या कामांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कामांना प्राधान्य देण्यासाठी निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.
कोणत्या संस्थांना मिळाली स्थगितीतून सूट?
निवडणुका स्थगित करण्याच्या निर्णयातून काही सहकारी संस्थांना वगळण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यामध्ये सहकारी गृहनिर्माण संस्था, मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील सहकारी बँका, न्यायालयाने निवडणुका घेण्याचे आदेश दिलेल्या संस्था तसेच २७ ऑक्टोबर २०२६ पूर्वीच निवडणूक प्रक्रिया सुरू झालेल्या सहकारी संस्थांचा समावेश असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








