
ठाणे : ठाण्यातील शिवसेना (उबाठा) चे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर एका महिन्याने ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी गुरुवारी शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा दिला. या हत्याप्रकरणात त्यांचे नाव जोडले जात असल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. एकनाथ शिंदे यांना पत्र लिहीत राजीनामा दिला आहे.
दरम्यान, प्रदीप पूर्णेकर प्रकरणी ठाणे पोलिसांकडून राजेंद्र शिंदे व मीनाक्षी शिंदे यांची यांची चौकशी केली आहे. पूर्णेकर कुटुंबियांकडून शिंदे दाम्पत्याला अटक करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. याच मागणीसाठी आज ठाकरे गटाकडून ठाण्यात आंदोलन केले जात आहे. आमदार आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत हे स्वत: या आंदोलनासाठी ठाण्यात आले आहेत. शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना असे दोन्ही गट आता आमनेसामने आले आहेत. आदित्य ठाकरे यांनी पू्र्णेकर यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मीनाक्षी शिंदे यांच्या राजीनाम्याबाबत आपले मत व्यक्त केले होते. "उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितले की, मिनाक्षी शिंदे या आपल्या पक्षाच्या नेत्या आहेत. त्यांच्यावर जर आरोप होत असेल तर, त्यांनी चौकशी होईपर्यंत पक्षाचे पद बाजूला काढून ठेवले तर ते अतिशय योग्य होईल. असे माझे वैयक्तिक मत आहे, असे सरनाईक यांनी स्पष्ट होते.
प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येमुळे ठाण्यात राजकीय संघर्ष निर्माण झाला असून विरोधी पक्षांनी या प्रकरणात मीनाक्षी शिंदे यांचा कथित संबंध असल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे.
त्यांनी एकनाथ शिंदे यांना पत्र लिहीत राजीनामा दिला आहे. त्यामध्ये त्यांनी असे नमूद केले की, "गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर तसेच पक्षपातळीवर माझ्याबाबत सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप व सर्वपक्षीय एकत्रित येऊन माझ्यावर विविध आरोप करत पक्ष नेतृत्वास अर्थात मुख्य नेते व पालकमंत्री म्हणून आपणास वेठीस धरण्याचे जे षडयंत्र चालू आहे हे पाहून माझ्या मनाला प्रचंड वेदना होत आहेत."
"मी आजवर संपूर्ण निष्ठेने पक्षाचे काम केले. पक्षाला किंवा आपणांस कधीही मान खाली घालावी लागेल, असे कोणतेही कृत्य केले नाही. तरीही, ज्या प्रकरणांशी माझा काहीही संबंध नाही, त्यामध्ये माझे नाव जोडून आपल्यावर आणि पक्षावर दबाव निर्माण केला जात आहे, हे पाहून मन व्यथित होते."
"ज्या नेतृत्वाचा सन्मान जपण्यासाठी मी आजवर काम केले, त्याच नेतृत्वाच्या बदनामीचे कारण माझ्यामुळे व्हावे, ही कल्पनाही मला सहन होत नाही. माझी निष्ठा आणि माझ्या कार्याची पावती आरोपांच्या माध्यमातून दिली जात असल्याची भावना मनाला बोचत आहे."
"म्हणूनच, मी ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख पदाचा राजीनामा आपणाकडे सुपूर्द करीत आहे. हा निर्णय नाराजीतून नव्हे, तर आपल्या नेतृत्वाचा सन्मान आणि पक्षाची प्रतिष्ठा जपण्यासाठी घेतला आहे. माझ्या भावनांची बाजू आपण समजून घ्याल, ही अपेक्षा."
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








