
देवगड : देवगड-नांदगाव मार्गावरील वळीवंडे येथे विनापरवाना चिरे वाहतूक करणारे तीन ट्रक देवगड महसूल विभागाच्या पथकाने पकडले. या कारवाईत संबंधित तीन ट्रकवर मिळून तब्बल ७ लाख ७६ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. २७ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
देवगड-नांदगाव मार्गावर वळीवंडे येथे विनापरवाना चिरे वाहतूक सुरू असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे महसूल विभागाच्या पथकाने सापळा रचून तपासणी केली. यावेळी आवश्यक परवान्यांशिवाय चिरे वाहतूक करणारे तीन ट्रक आढळून आले. त्यानंतर पथकाने तिन्ही ट्रक पकडून संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली.
या कारवाईत पांडुरंग शामराव बारड (रा. राधानगरी, जि. कोल्हापूर) यांच्या ट्रकवर २ लाख ८० हजार रुपये, शिवाजी विठ्ठल बेडगे (रा. कोल्हापूर) यांच्या ट्रकवर २ लाख ६४ हजार रुपये, तर केशव बापू शिंगाडे (रा. चांदोशी, ता. देवगड) यांच्या ट्रकवर २ लाख ३२ हजार रुपये दंड आकारण्यात आला. अशा प्रकारे तिन्ही ट्रकवर मिळून ७ लाख ७६ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.
निवासी नायब तहसीलदार विवेक शेठ, मंडळ अधिकारी आर. आर. कडुलकर, संदीप सरोदे, एन. यू. पाटील, सुदर्शन पाटील आणि के. आर. बोथीकर यांनी ही कारवाई केली. महसूल विभागाच्या या कारवाईमुळे विनापरवाना गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. गौण खनिजाची वाहतूक करताना आवश्यक परवाने घेऊन शासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन महसूल विभागाकडून करण्यात आले आहे.
ताजी बातमी
View all












