
रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात दाखल होणाऱ्या चाकरमान्यांच्या माध्यमातून साथरोगांचा जिल्ह्यात फैलाव होऊ नये, यासाठी जिल्हा आरोग्य विभागामार्फत विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. 10 सप्टेंबरपासून जिल्ह्यातील रेल्वे स्थानके, एस.टी. बस स्थानके तसेच विविध चेक पोस्टवर 16 वैद्यकीय पथके कार्यरत करण्यात आली आहेत. या पथकांमार्फत आतापर्यंत एकूण 435 रुग्णांची तपासणी करण्यात आली असून, विविध आजारांची लक्षणे असलेले 435 रुग्ण आढळून आले आहेत.
सर्दी-खोकला, विशेष ताप, कावीळ, अतिसार-हगवण तसेच इतर किरकोळ आजारांचे रुग्ण आढळून आले आहेत. या सर्व रुग्णांना आवश्यकतेनुसार औषधोपचार करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी दिली.
रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने रोजगार व व्यवसायानिमित्त जिल्ह्याबाहेर वास्तव्यास असतात. गणेशोत्सवानिमित्त हे चाकरमानी मोठ्या संख्येने एस.टी. बस तसेच रेल्वेने जिल्ह्यात दाखल होत असतात. ते ज्या ठिकाणी वास्तव्यास असतात, त्या ठिकाणांहून विविध संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव जिल्ह्यात होण्याची शक्यता लक्षात घेऊन आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून विशेष वैद्यकीय पथके नियुक्त केली आहेत.
आरोग्य विभागामार्फत खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर तालुक्यांतील महत्त्वाच्या प्रवेशबिंदूंवर वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली आहेत.










