
संगमेश्वर: सुवर्णसूर्य फाउंडेशन आयोजित ‘व्हिजन २०४७ – माझा धामापूर गाव’ गणेशोत्सव देखावा स्पर्धेत सुमारे २९ देखावे साकारण्यात आले. या देखाव्यांमधून २०४७ मध्ये आपले धामापूर गाव कसे असावे, गावाचा विकास कोणत्या दिशेने व्हावा आणि ग्रामीण भागात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आर्थिक समृद्धी कशी साधता येईल, याचे कल्पक चित्रण ग्रामस्थांनी केले.
तालुक्यातील धामापूरमधील धनावडेवाडी, पड्येवाडी, ढोपरखोलवाडी, तांबडवाडी, गुरववाडी, रामानेवाडी, भडवळेवाडी , गोवळवाडी , वरची राऊळवाडी, घारेवाडी, भेलेवाडी आणि भुसेवाडी येथील विविध वाड्यांतील ग्रामस्थ आणि गणेशभक्तांनी देखावे साकारले.
ड्रोन, रोबोटद्वारे आधुनिक शेती, मत्स्यशेती, इलेक्ट्रिक वाहनांसाठी ईव्ही चार्जिंग स्टेशन, बोरवेल रिचार्ज पॉइंट, भूजल पातळी वाढविण्यासाठी चारस्तरीय भूजल अडवणूक व्यवस्था, हरितगृहे, धामापूरमधील धबधब्यांचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास, सुसज्ज क्रीडांगण, अत्याधुनिक सोयी-सुविधांनी युक्त हॉस्पिटल आणि विद्यार्थ्यांनी गजबजलेल्या मराठी शाळा अशा अनेक संकल्पना या देखाव्यांमधून मांडण्यात आल्या.
‘शेती करता करता अर्थार्जनाचे प्रमुख केंद्र असलेले धामापूर’ ही संकल्पनाही काही देखाव्यांमधून प्रभावीपणे मांडण्यात आली. संगमेश्वर तालुक्यातील धामापूर परिसरातील प्रसिद्ध पर्यटनस्थळांना जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याची आणि भविष्यात मोठ्या संख्येने पर्यटक येथे भेट देतील, असा आशावादही काही गणेशभक्तांनी देखाव्यांमधून व्यक्त केला.
सुवर्णसूर्य फाउंडेशनचे संचालक प्रसाद देवस्थळी यांच्या संकल्पनेतून ही गणेशोत्सव देखावा स्पर्धा आयोजित करण्यात आली. स्पर्धेच्या आयोजनासाठी सचिन जयसिंग गुरव, लवू महाकाळ, मुकेश पड्ये, कीर्तिराज सागवेकर, सागर गिजये, दीपक बेंडके, निलेश गुरव तसेच सर्व मानकरी आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.
माजी सरपंच शांताराम भायजे, मानकरी अनिल मिंडे, दत्ताराम भायजे, किशोर धनावडे, शंकर बोल्ये, यशवंत पड्ये, सुरेश शिगवण, दीपक शिगवण, प्रकाश रामाणे, प्रमोद रामाणे आणि सुरेश रामाणे यांचेही या उपक्रमासाठी विशेष प्रोत्साहनपर सहकार्य लाभले.
या सर्व देखाव्यांचे परीक्षण गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या प्राध्यापिका सौ. आदिती कोकजे यांनी केले. सुमारे २९ देखावे अत्यंत कल्पकतेने आणि मेहनतीने साकारण्यात आल्याने त्यामधून क्रमांक निश्चित करणे हीच खरी कसोटी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. स्पर्धेचा निकाल आगामी काही दिवसांत जाहीर करण्यात येणार असून, विजेत्या गणेशभक्तांना एका विशेष कार्यक्रमात सुमारे ५१ हजार रुपयांची रोख पारितोषिके वितरित करण्यात येणार आहेत.
“कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनच्या माध्यमातून सुवर्णसूर्य फाउंडेशनचे नाव जागतिक पातळीवर पोहोचले आहे. मात्र कोकणातील माणूस कोकणातच राहावा, त्याची आर्थिक उन्नती व्हावी आणि ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात, हा सुवर्णसूर्य फाउंडेशनच्या कार्याचा मूलभूत विचार आहे. धामापूर गाव ही त्यासाठीची एक कार्यशाळा आहे,”
-प्रसाद देवस्थळी, सुवर्णसूर्य फाउंडेशनचे संचालक










