
वेंगुर्ला : महाराष्ट्राला अंतराळ क्षेत्रातील उद्योग, संशोधन आणि नवकल्पनांचे केंद्र बनविण्याच्या दिशेने राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल टाकले असून देशातील पहिला स्पेस पार्क महाराष्ट्रात उभारण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राज्याचे स्वतःचे पाच उपग्रह विकसित करून पुढील १८ महिन्यांत ते प्रक्षेपित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी वेंगुर्ले येथे दिली. पॅरिस येथे झालेल्या "वर्ल्ड स्पेस बिझनेस विक २०२६" मध्ये यासंदर्भात विविध कंपन्यांशी चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले.
पॅरिस दौऱ्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी वेंगुर्ले येथील त्यांच्या मूळ निवासस्थानी विराजमान श्री गणेशाचे आज शुक्रवारी दर्शन घेतले यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार किरण सामंत, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, शहरप्रमुख अजित राऊळ आदी उपस्थित होते. महाराष्ट्राच्या प्रस्तावित स्पेस पॉलिसीच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने पॅरिसमधील परिषद आणि प्रदर्शनाच्या निमित्ताने महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.
शेतीपासून आपत्ती व्यवस्थापनापर्यंत उपग्रहांचा वापर
महाराष्ट्राचे स्वतःचे पाच उपग्रह विकसित करण्याच्या प्रस्तावावर पॅरिसमध्ये चर्चा झाल्याचे सामंत यांनी सांगितले. या उपग्रहांचा उपयोग कृषी, पर्यावरण, आपत्ती व्यवस्थापन, शहरी नियोजन, आरोग्य नियोजन आणि उद्योग क्षेत्रासाठी करण्याची संकल्पना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उपग्रह निर्मिती आणि प्रक्षेपणासाठी संबंधित कंपनीसोबत चर्चा झाली असून, सुरुवातीला सुमारे २०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची आणि पुढील काळात त्यातून सुमारे हजार कोटी महसूल निर्माण करण्याची शक्यता कंपनीने व्यक्त केल्याचे सामंत म्हणाले. मात्र, या प्रस्तावाचा सविस्तर अभ्यास आणि व्यवहार्यता तपासली जाणार असल्याचेही त्यांनी संगीतले.
फेब्रुवारीत ‘स्पेस फेस्ट’; जागतिक कंपन्यांना महाराष्ट्रात आणणार
महाराष्ट्रात फेब्रुवारीमध्ये ‘स्पेस फेस्ट’ आयोजित करण्यात येणार असल्याची माहितीही सामंत यांनी दिली. या महोत्सवात विज्ञान, अंतराळ संशोधन, नवकल्पना आणि स्पेस टेक्नॉलॉजीशी संबंधित विविध उपक्रम असतील. जागतिक स्तरावरील कंपन्यांनाही या महोत्सवात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
रॉकेट, ड्रोन, अंतराळयान आणि स्पेस टेक्नॉलॉजी क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांना महाराष्ट्रात आणून त्यांच्यासाठी स्पेस पार्कमध्ये संधी उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यामुळे या क्षेत्रात नवीन उद्योग आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असा दावा सामंत यांनी केला.
प्रकल्पासाठी माथेरान किंवा माचाळचा विचार
उपग्रहाशी संबंधित प्रकल्पासाठी उंच आणि तुलनेने थंड वातावरण असलेल्या ठिकाणांचा विचार करण्यात येत असल्याचे सामंत यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर माथेरान आणि रत्नागिरी - माचाळ या दोन ठिकाणांची प्राथमिक पाहणी करण्यात आली आहे. मात्र, यापैकी कोणतेही ठिकाण अद्याप अंतिम झालेले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“महाराष्ट्रात पहिल्यांदा एखाद्या राज्याचे स्वतःचे पाच उपग्रह असावेत, यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे,” असे सामंत यांनी सांगितले. पॅरिसमधील चर्चेदरम्यान फ्रान्समधील अंतराळ क्षेत्रातील कंपन्यांना महाराष्ट्रातील आगामी स्पेस फेस्टमध्ये सहभागी करून घेण्याबाबतही चर्चा झाल्याचे सामंत यांनी सांगितले. भारत आणि फ्रान्समधील औद्योगिक संबंध अधिक मजबूत करण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्यासाठी सरकार सकारात्मक असून, त्याचवेळी ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाचा संदर्भ देत सामंत यांनी आंदोलन थांबविल्याबद्दल त्यांचे आभार मानले. मराठा आरक्षणाबाबत सरकारकडून घेतलेल्या निर्णयांचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, मराठा समाजाच्या मागण्यांवर निर्णय घेत असताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाचे संरक्षण करण्याचीही सरकारची भूमिका आहे.
महाराष्ट्रात सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गासाठी २०२४ मध्ये स्वतंत्र आरक्षण कायदा करण्यात आला आहे. “मराठा समाजाच्या मागण्या नक्की मान्य करण्याचा प्रयत्न केला जाईल; मात्र ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही,” अशी भूमिका सामंत यांनी पत्रकार परिषदेत मांडली.










