
सिंधुदुर्गनगरी : दोडामार्ग येथील तेली आळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालय, सिंधुदुर्ग आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीदरम्यान येणाऱ्या अडचणी, नागरिकांच्या प्रतिक्रिया आणि अपेक्षा जाणून घेतल्या.
तसेच सायबर सिक्युरिटी आणि ‘Bappa.org’ पोर्टलबाबत नागरिकांना माहिती देण्यात आली. महसूल विभागामार्फत उपलब्ध विविध शासकीय सेवांची माहिती मंडळ अधिकारी सचिन गोरे यांनी दिली.
तेली आळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना १९९५ मध्ये झाली असून, गेल्या ३२ वर्षांच्या कालावधीत लोकसहभाग आणि देणगीतून मंडळाने विविध भौतिक सुविधा निर्माण केल्या आहेत. सामाजिक बांधिलकी जपत मंडळामार्फत विविध सामाजिक, पारंपरिक आणि सांस्कृतिक उपक्रम सातत्याने राबविले जातात. यामध्ये धनगरी चपई, भजन, फुगडी, दशावतारी नाटक आदी कार्यक्रमांचा समावेश असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष आनंद तांबूळकर यांनी दिली. माहिती कार्यालयाच्या वतीने मंडळास सहभागी झाल्याबद्दल लोकसंवाद सन्मानचिन्ह देण्यात आले.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, ग्रामपंचायती तसेच गर्दीच्या ठिकाणी ‘लोकसंवाद-२०२६’ या विशेष जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. जिल्हा माहिती कार्यालयाच्या समन्वयातून विविध विभागांच्या अधिकाऱ्यांच्या सहभागाने आयोजित या उपक्रमात नागरिकांशी थेट संवाद साधत शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना व उपक्रमांची माहिती देण्यात येत आहे. यावेळी मंडळाचे अध्यक्ष आनंद तांबूळकर इतर सदस्य, मंडळ अधिकारी सचिन गोरे, माहिती कार्यालयाचे सुधीर पाटील, अमित राणे उपस्थित होते.










