
सावंतवाडी : उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी येथील ट्रामा केअर युनिट, सी-आर्म मशीन आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्याबाबत आरोग्य विभागाने दिलेल्या हमीपत्राच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचसमोर जनहित याचिकेवर सुनावणी पार पडली. या प्रकरणी पुढील सुनावणी १९ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
न्यायमूर्ती शर्मिला देशमुख आणि न्यायमूर्ती नीरज धोते यांच्या खंडपीठासमोर 'अभिनव फाउंडेशन'ने दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी झाली. आज वेळेअभावी पूर्ण सुनावणी होऊ शकली नाही, अशी विनंती याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयाला केली. त्यानुसार न्यायालयाने पुढील तारीख निश्चित केली आहे.
पुढील सुनावणीदरम्यान आरोग्य संचालकांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहावे, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. आरोग्य विभागाने यापूर्वी दिलेल्या हमीपत्रानुसार ट्रामा केअर युनिटची मशिनरी चार आठवड्यात उपलब्ध करून देणे, रुग्णालयातील डॉक्टरांची रिक्त पदे भरणे, सी-आर्म मशिनरीबाबत झालेली प्रत्यक्ष कार्यवाही, या सर्व बाबींचा आढावा घेऊन आरोग्य विभागाला न्यायालयात वस्तुस्थितीदर्शक माहिती सादर करावी लागणार आहे.
या सुनावणीस अभिनव फाउंडेशनच्या वतीने ॲड. महेश राऊळ आणि ॲड. नीरज लवटे उपस्थित होते. तसेच सामाजिक बांधिलकीचे लक्ष्मण कदम, मिलिंद म्हापसेकर (कोलगाव) आणि जिल्हा शल्यचिकित्सक (सिंधुदुर्ग) कार्यालयाचे प्रशासकीय अधिकारी अमित आवळे न्यायालयात उपस्थित होते.











