मराठी भाषाविषयक उपक्रमांच्या अनुदानात दुप्पट वाढ

मंत्री दीपक केसरकर यांची माहिती
Edited by: विनायक गांवस
Published on: January 22, 2023 18:32 PM
views 236  views

सावंतवाडी : मराठी भाषा विश्व संमेलन प्रथमच मुंबई मध्ये घेतले, तेव्हा येणाऱ्या खर्चाचा तपशील समोर आला. हा तपशील पाहून साहित्य संमेलनाना तुटपुंज्या स्वरूपात आर्थिक मदत शासन देते, हे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या लक्षात आणून दिले. त्यामुळे यापुढे मराठी साहित्य संमेलन, किंवा मराठी भाषा चळवळ उपक्रम घेणाऱ्यांना कुणाकडे हात पसरावे लागू नये म्हणून अनुदानात दुप्पट वाढ करण्यात आली आहे, असे प्रतिपादन शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी केले.


श्रीराम वाचन मंदिर मध्ये देशभक्त प्रभाकरपंत कोरगावकर व्याख्यानमालेच्या समारोप प्रसंगी मंत्री केसरकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. श्रीराम पवार, अध्यक्ष पत्रकार शिवप्रसाद देसाई, वाचन मंदिर अध्यक्ष प्रसाद पावसकर, डॉ जी ए बुवा, लेखक प्रवीण बांदेकर, कार्यवाह रमेश बोंद्रे, अँड संदीप निंबाळकर आदी उपस्थित होते.


यावेळी लेखक प्रवीण बांदेकर यांचा श्रीराम वाचन मंदिर, आरती मासिक व केसरकर यांनी सत्कार केला. तसेच रमेश बोंद्रे यांना पत्रकार संघाचा पुरस्कार जाहीर झाला म्हणून अँड अरुण पणदूरकर यांनी सत्कार केला. केसरकर यांचा पावसकर यांनी सत्कार केला. यावेळी कवयित्री उषा परब, भरत गावडे, डॉ देवदत्त परुळेकर, डॉ सुमेधा नाईक धुरी व अन्य मान्यवर उपस्थित होते.


मराठी साहित्यात शासन हस्तक्षेप करत नाही, पण केंद्र व राज्य सरकारने नक्षलवादी चळवळीवर बंदी आणली असताना शासनाचा साहित्य पुरस्कार नक्षलवादी साहित्याला जाहीर झाला त्यामुळे मी विरोध केला, असे मंत्री दिपक केसरकर यां सांगितले ते म्हणाले, प्रवीण बांदेकर लिखाण करताना परिणामांना घाबरले नाहीत. लेखक कसा असतो हे त्यांनी दाखवून दिले. सिंधुदुर्ग जिल्ह्याला लेखकांची थोर परंपरा आहे वि स खांडेकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला. ते सावंतवाडी मध्ये राहून शिरोडा येथे ज्ञानदान करत त्यांनी भारतवर्षात या भागाला गौरविले. समाजातील नितीमुल्ले ढासळताहेत, झुंडशाहीचा दबाव येत असतो त्याचे चित्रीकरण कादंबरीत मांडले.

श्रीराम वाचन मंदिर ची थोर परंपरा माजी आमदार जयानंद मठकर यांनी सांभाळली ती तुम्ही पुढे नेत असताना देशभक्त प्रभाकरपंत कोरगावकर व्याख्यानमालेच्या रुपाने विचार मंथ सुरू आहे. प्रभाकरपंत कोरगावकर हे देशभक्त होते. त्यांनी समाजासाठी प्रेरणादायी योगदान दिले.

केसरकर म्हणाले, शालेय जीवनात शिवाजी सावंत यांच्या व्याख्यानाला मोठी गर्दी झाल्याचे पाहीले होते. पण सध्या बदलत्या माध्यमांमुळे गर्दी होत नाही मात्र श्रीराम वाचन मंदि मध्ये वाचक व व्याख्यान स्वरूपामध्ये परंपरा कायम ठेवली आहे. यासाठी निश्चित पणे मदत करण्यासाठी पुढाकार घेईन. मराठी साहित्य संमेलन, मराठी भाषा वाचक चळवळ निर्माण करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्यांना शासकीय अनुदान दिले जाईल. त्यांना यासाठी कुणाकडे हात पसरावे लागू नये म्हणून शासन कटिबद्ध आहे.