पत्रकारितेद्वारे ठाम मत मांडण्याची परंपरा 'दर्पण' ने सुरू केली : मंत्री रवींद्र चव्हाण

‘महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी’ तर्फे देण्यात येणार्‍या राज्यपातळीवरील ३० व्या ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण
Edited by: प्रतिनिधी
Published on: January 06, 2023 19:10 PM
views 261  views
हायलाइट
आमदार नितेश राणे व पद्मश्री परशुराम गंगावणे यांची उपस्थिती
'दर्पण' स्मरणिकेचे शानदार प्रकाशन
स्मारक व गावाच्या विकासासाठी स्वतः पाठपुरावा करु : आमदार नितेश राणे

फलटण : ''पत्रकारितेद्वारे ठाम मत मांडण्याची परंपरा 'दर्पण' ने सुरू केली. बाळशास्त्रींनी 'दर्पण' च्या माध्यमातून ब्रिटिश राजवटीला आरसा दाखवला; तेच काम पत्रकारितेत आजही सुरू आहे. पत्रकार आपल्या लेखणीतून क्रांती घडवत असतात. भौतिक प्रगतीच्या, विकासाच्या मागे पत्रकारिताही दडलेली असते'', असे मत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले.


‘महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी’ तर्फे देण्यात येणार्‍या राज्यपातळीवरील प्रतिष्ठित ३० व्या ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे व कुडाळ (जि.सिंधुदुर्ग) येथील ज्येष्ठ राष्ट्रीय कलावंत, पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या हस्ते पोंभुर्ले (जि. सिंधुदुर्ग) येथील 'दर्पण' सभागृहात संपन्न झाले. त्यावेळी मंत्री चव्हाण बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ होते. व्यासपीठावर माजी आमदार अजित गोगटे, जेष्ठ पत्रकार राजाभाऊ लिमये, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, पोंभुर्लेच्या सरपंच प्रियांका धावडे, माजी सरपंच सादिक डोंगरकर, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे उपाध्यक्ष बापूसाहेब जाधव व कृष्णा शेवडीकर, कार्यकारी विश्वस्त विजय मांडके, सुधाकर जांभेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.


मंत्री चव्हाण पुढे म्हणाले, ''प्रत्येक कामात अडचणी, मर्यादा असतात. पण सकारात्मक मानसिकतेने काम केले तरच 'समृद्धी' येत असते; त्यानुसार पोंभुर्ले व महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे सर्व प्रश्न आपण मार्गी लावू'', असे सांगून, ''जाभेकरांच्या रूपाने पत्रकारीतेची व्यवस्था आज उभी आहे. पूर्वी पत्रकारांच्या स्तंभ लेखनाचा परिणाम राजकारणावर होत असे. मात्र आज हे लेखन लुप्त पावत चालले आहे'', अशी खंत ही मंत्री चव्हाण यांनी व्यक्त केली.


''पत्रकारिता आणि राजकारण यांचा जवळचा संबंध आहे. राजकारण करताना नेहमीच पत्रकारांकडून दिशा मिळते. आज मराठी पत्रकारितेने मोठा नावलौकिक मिळवला आहे.  बाळशास्त्रींचे नाव जगभरात जावे, आपल्या राज्यासह देशभरातील पत्रकार पोंभुर्ले  येथे यावेत, या दृष्टीने येथील स्मारकाचा व गावाचा विकास करण्यासाठी आपण स्वतः शासनामध्ये पाठपुरावा करु'', असे आमदार नितेश राणे यांनी  स्पष्ट केले.


पद्मश्री परशुराम गंगावणे म्हणाले, ''पत्रकार नेहमीच अन्यायाला वाचा फोडण्याचे काम करीत असतात. पत्रकारांनी मागे वळून न पाहता असेच पुढे चालत रहावे. पत्रकारांच्या कार्याचा गौरव करणारा आजचा पुरस्कार समारंभ अभिमानास्पद आहे.''


अध्यक्षीय भाषणात रविंद्र बेडकिहाळ यांनी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या स्थापनेची व बाळशास्त्रींच्या स्मारक कार्याची माहिती देऊन, "शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागाकडून शासनाभिमुख, लोकाभिमुख कार्याबरोबरच पत्रकाराभिमुख काम व्हावे, शासनाकडून कर्मभूमी मुंबईत बाळशास्त्रींचे स्मारक व्हावे, पोंभुर्ले गाव व स्मारकाच्या विकासासाठी मंत्री रवींद्र चव्हाण व आ.नितेश राणे यांनी सहकार्य करावे, पोंभुर्ले गावाला 'क' वर्ग पर्यटनाचा दर्जा मिळावा", आदी अपेक्षा व्यक्त केल्या.


प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पालखीचे स्वागत, 'दर्पण' स्मारकातील बाळशास्त्रींच्या अर्धपुतळ्यास अभिवादन व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. 


समारंभाच्या निमित्ताने 'दर्पण' स्मरणिकेचे प्रकाशन संपन्न झाले. त्यानंतर सन २०२२ च्या प्रतिष्ठेच्या ‘दर्पण पुरस्कारां’चे वितरण झाले. यामध्ये ज्येष्ठ पत्रकार शंकरराव पाटील (कराड) पुरस्कृत राज्यस्तरीय ‘धाडसी पत्रकार’ पुरस्कार - सौ.शीतल करदेकर (मुंबई), राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कार कोकण विभाग - शैलेश पालकर (पोलादपूर) व सुरेश कौलगेकर (वेंगुर्ला), उत्तर महाराष्ट्र विभाग - जयप्रकाश पवार (नाशिक), विदर्भ विभाग - डॉ.राजेंद्र मुंढे (वर्धा), पश्‍चिम महाराष्ट्र विभाग - अनुराधा कदम (कोल्हापूर), मराठवाडा विभाग - प्रल्हाद उमाटे (नांदेड), विशेष ‘दर्पण’ पुरस्कार - सदाशिव मोहिते (फलटण) व किरण बोळे (फलटण) यांचा समावेश होता.


पुरस्कार प्राप्त पत्रकारांच्या वतीने बोलताना सौ.शीतल करदेकर म्हणाल्या, "आज अनेकदा खरा पत्रकार कोण? असा प्रश्न निर्माण होत आहे. यासाठी नियमावली तयार व्हावी. पत्रकारांसाठी स्वतंत्र महामंडळाची निर्मिती व्हावी." शैलेश पालकर म्हणाले, " बाळशास्त्रींचे विस्मरण मराठी भाषिकांकडूनच होत आहे. पत्रकार हा रोजचा साहित्यिक असतो. त्यामुळे विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या उपक्रमातून  बाळशास्त्रींचे  नाव जागतिक स्तरावर न्यावे." स.रा.मोहिते यांनी," जांभेकरांच्या जन्मभूमीत मिळालेला पुरस्कार सर्व पत्रकारांना स्फूर्तिदायी ठरेल", असे सांगितले. यावेळी सरपंच सौ.प्रियांका धावडे यांनीही मनोगत व्यक्त केले. 


कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय मांडके यांनी केले. आभार व सूत्रसंचालन संस्थेचे विश्वस्त अमर शेंडे यांनी केले.