
सावंतवाडी : गणेशोत्सवाचे वेध लागल्याने सर्वत्र जय्यत तयारी सुरू झाली असून डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगातही "गणपती भिंत" रंगविण्याची पूर्वापार चालत आलेली पारंपरिक कला आपली वेगळी ओळख टिकवून आहे. आधुनिक संगणक, डिजिटल प्रिंटिंग आणि विविध सजावटीच्या साधनांचा वापर वाढला असला, तरी हाताने भिंतीवर सुंदर चित्रे साकारण्याच्या कलेला आजही नागरिकांची पसंती मिळत आहे.
पूर्वी गावोगावी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक कलाकारांकडून भिंतींवर विविध धार्मिक प्रसंग, देव-देवता तसेच निसर्गचित्रे रंगविली जात असत. या चित्रांमुळे गणेशोत्सवाचा उत्साह अधिकच खुलून दिसतो. आजच्या डिजिटल माध्यमांच्या वाढत्या प्रभावातही या कलेतील हातोटी, कल्पकता आणि पारंपरिक शैलीचे महत्त्व अजिबात कमी झालेले नाही. त्यामुळे आधुनिकतेसोबतच या पारंपरिक कलेचा वारसा आजही जपला जात असल्याचे चित्र आहे.
गणेश चतुर्थीचा सण अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपल्याने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या तयारीला कमालीचा वेग आला आहे. लाडक्या गणरायाचे उत्साहात स्वागत करण्यासाठी घरोघरी स्वच्छता आणि रंगरंगोटीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. ज्या भिंतीसमोर श्री गणेश मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना केली जाणार आहे, त्या भिंतीवर निसर्गचित्रे आणि देव-देवतांची आकर्षक चित्रे रेखाटण्यात स्थानिक कलाकार व तरुण वर्ग व्यस्त झाला आहे.
गणेशोत्सवाची ही उत्सुकता दोन महिन्यांपूर्वीच सुरू होते. चतुर्थीच्या दोन महिने आधीच चित्रशाळेत पाट नेऊन देत, कुटुंबातील सदस्यांशी मोकळी चर्चा करून मूर्तीचे स्वरूप निश्चित केले जाते. त्यानंतर नागरिक चित्रशाळांमध्ये जाऊन मूर्तींचे काम पाहण्याचा आनंद घेतात. आता अवघे चार दिवस शिल्लक राहिल्याने सर्वत्र सजावट व पूर्वतयारीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.










