LIVE UPDATES

Kidney Transplant : जीवावर उदार होऊन अर्धांगिनीला दिलं जीवदान, वोक्हार्ट रुग्णालयात यशस्वी किडनी प्रत्यारोपण

कठिण परिस्थितीशी केले दोन हात : आता समाजानेही द्यावा मदतीचा हात
Edited by: सुजित धाडवे
Published on: September 07, 2026 19:38 PM
views 193  views
Husband donated kidney to wife

मुंबई : वैद्यकीय क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांचे हजारो किस्से रोज पाहायला मिळतात; पण जेव्हा एखाद्या शस्त्रक्रियेमागे निस्सीम प्रेम, आत्मसमर्पण आणि त्यागाची भावना जोडलेली असते, तेव्हा ती केवळ एक वैद्यकीय घटना न राहता मानवी मूल्यांची अद्वितीय यशोगाथा बनते. नात्यांमधील ओलावा आणि विश्वास कमी होत चालल्याची तक्रार करणाऱ्या आजच्या काळात, रत्नागिरीतील एका पतीने स्वतःचा जीव धोक्यात घालून पत्नीला दिलेले नवजीवन समाजासाठी एक आदर्श वस्तुपाठ ठरले आहे.

“सुख-दुःखात आयुष्यभर साथ देण्याचे वचन” केवळ सप्तपदीच्या शब्दांत न ठेवता ते प्रत्यक्ष कृतीत उतरवत मरणाच्या दारात उभ्या असलेल्या पत्नीला स्वतःच्या शरीराचा भाग देऊन नवजीवन देणाऱ्या एका पतीच्या असीम त्यागाची कथा समोर आली आहे. प्रेम, निष्ठा आणि जिद्दीने भरलेली रत्नागिरी जिल्ह्यातील तळेकांटे (ता. संगमेश्वर) येथील रेवाळे दाम्पत्याची ही प्रेरणादायी जीवनगाथा सध्या सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत आहे. मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट रुग्णालयात ही गुंतागुंतीची किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली.

तळेकांटे येथील रहिवासी प्रज्ञा रेवाळे (२७) यांचे आयुष्य सुरळीत सुरू असतानाच २०२४ मध्ये त्यांच्यावर आजारपणाची छाया पसरली. डॉक्टरांच्या तपासणीअंती त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे गंभीर निदान झाले. आजाराची तीव्रता इतक्या वेगाने वाढली की अवघ्या काही दिवसांतच प्रज्ञा यांची प्रकृती चिंताजनक बनली आणि त्यांना नियमित डायलिसिसवर ठेवणे भाग पडले. या काळात कोपर रुग्णालय, मुंबईतील विविध सरकारी रुग्णालये तसेच रत्नागिरीच्या शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

आठवड्यातून अनेकदा होणाऱ्या डायलिसिसच्या वेदनादायी उपचारांमुळे प्रज्ञा शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खचल्या होत्या. अशा वेळी प्रज्ञा यांच्या आयुष्याची दोर बळकट करण्यासाठी 'किडनी प्रत्यारोपण' (किडनी ट्रान्सप्लांट) हाच एकमेव शाश्वत पर्याय उरला असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले.

कुटुंबावर काळजीचे सावट अधिकच गहिरे झाले होते. अवयवदाता (डोनर) मिळणे ही अत्यंत कठीण आणि प्रदीर्घ प्रक्रिया होती. मात्र, डोळ्यांसमोर कोमेजणारा पत्नीचा चेहरा आणि तिच्या असह्य वेदना पाहून पती प्रविण रेवाळे (३१) यांचे मन हेलावले. त्यांनी एका क्षणाचाही विलंब न करता स्वतःची एक किडनी दान करण्याचा अत्यंत धाडसी निर्णय घेतला. लग्नाच्या वेळी दिलेली वचने केवळ औपचारिक नसून ती आयुष्यभर निभावण्यासाठी असतात, हेच प्रविण यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले.

प्रविण यांचे वडील काशिनाथ रेवाळे आणि आई सरस्वती रेवाळे हे गावात शेतीकाम करून आपला उदरनिर्वाह करतात. अशा अत्यंत सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील प्रविण यांनी बी.कॉम.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले असून ते रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कार्यरत होते, तर प्रज्ञा यांचे शिक्षण १२ वी पर्यंत झाले आहे. सुमारे सात महिन्यांच्या प्रेमप्रकरणांनंतर डिसेंबर २०१७ मध्ये दोघे विवाहबद्ध झाले होते. सर्वसामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या या दाम्पत्याचा संसार अत्यंत आनंदाने सुरू होता आणि या ७ वर्षांच्या सुखी प्रवासात त्यांना 'प्रियांश' नावाचा एक मुलगा झाला. मात्र २०२४ मध्ये आलेल्या या संकटाने संपूर्ण कुटुंबाला हादरवून सोडले होते.

प्रत्यारोपणाच्या प्रक्रियेसाठी ३१ ऑगस्ट रोजी या दाम्पत्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर दात्याच्या आणि रुग्णाच्या शरीराची सुसंगतता तपासून अखेर २ सप्टेंबर २०२६ रोजी मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट रुग्णालयात ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. या संपूर्ण वैद्यकीय लढ्यात मूत्रपिंड विकार तज्ज्ञ डॉ. निखिल बासीन, शल्यचिकित्सक डॉ. मुकुंद आंदणकर आणि डॉ. तरुण जैन, डॉ. प्रकाश पेघणे यांच्यासह वोक्हार्ट रुग्णालयाच्या वैद्यकीय व परिचारिका टीमने देवदूतासारखी महत्त्वाची भूमिका बजावली.

शस्त्रक्रियेनंतर पती प्रविण रेवाळे यांची प्रकृती वेगाने सुधारल्याने त्यांना शनिवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर पत्नी प्रज्ञा यांच्यावर रुग्णालयात अद्याप पुढील उपचार आणि डॉक्टरांच्या देखरेखीखाली वैद्यकीय सोयी-सुविधा सुरू आहेत.

हा संपूर्ण प्रवास दिसतो तितका सोपा नक्कीच नव्हता. वैद्यकीय आव्हानांपेक्षाही रेवाळे कुटुंबासमोर आर्थिक आणि मानसिक संकटाचा मोठा डोंगर उभा होता. आई-वडील शेती करत असल्याने आणि प्रविण हे स्वतः सर्वसामान्य घरातील असल्याने ऐनवेळी लागणारा प्रचंड वैद्यकीय खर्च भागवणे त्यांच्या अवाक्याबाहेरचे होते. सध्या हे कुटुंब नालासोपारा (पूर्व) येथील दत्तकृपा अपार्टमेंट येथे वास्तव्यास असून, या कठीण काळात प्रविण यांचे भाऊ ज्ञानेश्वर रेवाळे यांनी एका मोठ्या भावाची कर्तव्यनिष्ठ जबाबदारी पार पाडत संपूर्ण कुटुंबाला खंबीर आधार दिला.

त्याचप्रमाणे मित्र, नातेवाईक, सामाजिक संस्था, हितचिंतक आणि अनेक दानशूर व्यक्ती या कुटुंबाच्या मदतीला धावून आल्या. कुणी आर्थिक बळ दिले, तर कुणी प्रार्थनांचा आधार दिला. या सर्व मदतीच्या हातांमुळेच प्रत्यारोपणाची ही प्रक्रिया वेळेत पूर्ण होऊ शकली. “मदतीला धावून आलेला प्रत्येक हात आमच्यासाठी देवदूत ठरला,” अशी अत्यंत भावुक प्रतिक्रिया यावेळी रेवाळे परिवाराने व्यक्त केली.

आज प्रज्ञा आणि प्रविण यांच्या आयुष्यातील संघर्षाचा तो कठीण टप्पा मागे पडत आहे. दोघेही नव्या आशेने आणि जिद्दीने आयुष्याची नवीन पहाट पाहत आहेत. रेवाळे परिवाराने या कठीण काळात पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेल्या प्रत्येकाचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. मात्र, प्रज्ञा यांच्या पुढील वैद्यकीय उपचार, महागडी औषधे आणि पुनर्वसनासाठी अद्याप मोठ्या प्रमाणावर आर्थिक खर्चाची गरज आहे. त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील या दाम्पत्याला पुढील उपचारांसाठी मदतीची मोठी गरज असून, समाजबांधवांनी व दानशूर व्यक्तींनी सढळ हस्ते मदतीचा हात पुढे करावा, असे आग्रही आवाहन त्यांच्या मित्रपरिवाराकडून करण्यात येत आहे. तळेकांटेच्या या दाम्पत्याची ही कहाणी केवळ एका वैद्यकीय शस्त्रक्रियेचा अहवाल नसून, आधुनिक युगात प्रेम, त्याग, विश्वास आणि मानवी मूल्यांच्या विजयाचा एक जिवंत दस्तऐज ठरली आहे.

मदत करा, जीव वाचवा

पती प्रविण यांनी स्वतःची एक किडनी देऊन पत्नी प्रज्ञा यांचे प्राण वाचवले असून १० लाख रुपयांच्या या शस्त्रक्रियेसाठी कुटूंब, संस्था व मित्रांकडून पाच लाख रुपये जमा झाले आहेत, मात्र प्रज्ञा यांच्या पुढील वैद्यकीय उपचार, महागडी औषधे आणि पुनर्वसनासाठी उर्वरित पाच लाख रुपयांची या कुटुंबाला अद्याप नितांत गरज आहे; तरी मदत करू इच्छिणाऱ्यांनी MRS. PRADNYA PRAVIN REWALE, सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि., खाते क्र. 225203100006368, IFSC: SRCB0000225, शाखा: रत्नागिरी या खात्यावर सढळ हस्ते आर्थिक सहकार्य करावे किंवा प्रविण रेवाळे (९८८१२३०७०२) यांच्याशी संपर्क साधावा.

“लग्नाच्या वेळी एकमेकांना सुख-दुःखात आयुष्यभर खंबीरपणे साथ देण्याचे पवित्र वचन दिले होते. आज संकटसमयी त्या वचनाला केवळ शब्दांत न ठेवता प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याची वेळ आली होती. पत्नीला वेदनांमध्ये पाहून शांत बसणे शक्य नव्हते, म्हणूनच स्वतःची किडनी देऊन तिला नवजीवन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केला. हा माझा त्याग नसून आमच्या प्रेमावर आणि नात्यावर असणारा अढळ विश्वास आहे.”

— प्रविण रेवाळे (पती)