
सिंधुदुर्गनगरी : पशु विभागाच्या योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात तालुकास्तरावरील अधिकारी कमी पडत असल्याची खंत व्यक्त करत तालुका पशुधन अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांनी नजीकच्या प्रत्येक गावातील ग्रामसभेला उपस्थित राहून योजनांची माहिती द्यावी असे निर्देश उपाध्यक्ष दादा साईल यांनी आजच्या सभेत दिले.
जिल्हा परिषद पशुसंवर्धन व दुग्धविकास समितीची सभा जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांच्या अख्यक्षतेतखाली बुधवारी (९ सप्टेंबर) येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडली. यावेळी समिती सचिव तथा पशुधन उपायुक्त डॉ. समीर बिलोलीकर, सदस्य रामा गवस, गंगाराम सडवेलकर, गणेश राणे, प्रज्ञा चव्हाण, शीतल दळवी, तालुका पशुधन अधिकारी आदी उपस्थित होते.
जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. याशिवाय राज्य शासनामार्फतही काही नवीन योजना राबविण्यात येत असून त्यांचे प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. मात्र या योजनांची माहितीच शेतकऱ्यांपर्यंत अद्याप पोहोचलेली नाही.
योजनांची माहिती देण्यास आपले अधिकारी कमी पडत असल्याची खंत खुद्द उपाध्यक्ष दादा साईल यांनी सभेत व्यक्त केली. तसेच आतापासून ज्या गावात ग्रामसभा असेल त्या ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांना योजनांची माहिती देण्यात यावी. केवळ ज्या गावात दवाखाना आहे त्याच गावातील ग्रामसभेला उपस्थित न राहता दवाखाना क्षेत्रातील प्रत्येक ग्रामसभेला उपस्थित राहून अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना माहिती द्यावी असे निर्देश उपाध्यक्ष दादा साईल यांनी सभेत दिले.
दोडामार्ग तालुक्यातील मोरगाव पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी विंधन विहिरीसाठी आमदार फंडातून २ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सभेत आमदार दीपक केसरकर यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला.
आंबेरी, पडेल येथे दूध संकलन केंद्र व्हावे
देवगड तालुक्यातील पडेल येथे दूध संकलन केंद्र नसल्याने येथील शेतकरी राजापूर येथे दूध विक्री करत आहेत. त्यांना आपल्या जिल्ह्यातच दूध संकलन केंद्र मिळावे आणि येथे गोकुळ ने आपले दूध संकलन केंद्र सुरू करावे अशी मागणी सदस्य गणेश राणे यांनी सभेत केली. यावर उपाध्यक्ष यांनी लेखी मागणी द्या तसे पत्र गोकुळ ला देऊ असे सांगत देवगड तालुक्यात पडेल आणि कुडाळ तालुक्यात आंबेरी येथे गोकुळचे दूध संकलन केंद्र व्हावे यासाठी पाठपुरावा केला जाणार असल्याचे उपाध्यक्ष दादा साईल यांनी स्पष्ट केले.










