LIVE UPDATES

महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान नावापुरतेच

प्रशासनाच्या उदासीनतेमुळे पूर्वीचा उत्साह ओसरला
Edited by: Raju Jogale
Published on: September 08, 2026 15:34 PM
views 68  views

राजापूर : गावातील छोटे-मोठे वाद, कौटुंबिक कलह, जमिनीचे प्रश्न अथवा सामाजिक मतभेद यांचे रूपांतर मोठ्या संघर्षात होऊ नये आणि गावातील सलोखा कायम राहावा, या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानाने ग्रामीण समाजजीवनावर एक वेगळी छाप उमटविली होती. मात्र, पूर्वीप्रमाणे बक्षीस आणि प्रोत्साहनाची व्यवस्था राहिलेली नसतानाही अनेक गावांमध्ये तंटामुक्ती समित्या आजही कार्यरत आहेत. असे असले तरी शासन आणि प्रशासनाच्या पातळीवर या अभियानाबाबत पूर्वीसारखा उत्साह दिसून येत नसल्याने एकेकाळी लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झालेले हे अभियान आता मोठ्या प्रमाणात औपचारिकतेपुरतेच मर्यादित राहिल्याचे चित्र आहे.

गाव म्हटले की मतभेद आणि वादविवाद आलेच. मात्र, हे वाद न्यायालय अथवा पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच गावातील ज्येष्ठ नागरिक, प्रतिष्ठित व्यक्ती, ग्रामस्थ आणि तंटामुक्ती समितीच्या माध्यमातून सामोपचाराने मिटविण्याची भूमिका अनेक गावांनी स्वीकारली होती. त्यामुळे ‘तंटा वाढविण्यापेक्षा तो गावातच मिटविणे’ ही मानसिकता ग्रामीण समाजात रुजविण्यास या अभियानाची मोठी मदत झाली.

पूर्वी तंटामुक्त गाव म्हणून मिळणारे आर्थिक बक्षीस हे गावांसाठी मोठे प्रोत्साहन ठरत होते. पुरस्कारासाठी गावागावांत तंटे मिटविण्याची एकप्रकारची सकारात्मक चुरस निर्माण होत असे. दिवाणी, फौजदारी, महसुली तसेच इतर स्वरूपाचे वाद सामोपचाराने मिटविण्यावर विशेष भर दिला जात होता.

आज आर्थिक बक्षिसाची अपेक्षा नसतानाही अनेक गावांमध्ये तंटामुक्ती समित्या गठित करून त्या कार्यरत ठेवण्यात येत आहेत. यावरून आर्थिक लाभापेक्षा गावातील शांतता, सामाजिक एकोपा आणि परस्पर सलोख्याला ग्रामस्थ अधिक महत्त्व देत असल्याचे स्पष्ट होते.

ग्रामसुरक्षा दळांचाही मोठा फायदा

महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानाच्या काळात स्थापन करण्यात आलेल्या ग्रामसुरक्षा दळांमुळे गावागावांत सामाजिक सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण झाली होती. विविध गुन्ह्यांतील आरोपींचा शोध घेणे तसेच गुन्ह्यांची उकल करण्यासाठी ग्रामसुरक्षा दळांची पोलिस प्रशासनाला मदत झाली होती. त्यामुळे तंटामुक्ती अभियान हे केवळ वाद मिटविण्यापुरते मर्यादित न राहता गावातील सामाजिक शांतता आणि सुरक्षिततेचे प्रभावी माध्यम ठरले होते.

यापूर्वी काँग्रेसप्रणीत आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी हे लोकाभिमुख अभियान राज्यभर प्रभावीपणे राबविले. अभियानाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. असंख्य गावांनी तंटामुक्त गावाचा पुरस्कार मिळविला, तर काही गावे विशेष पुरस्कारासाठीही पात्र ठरली. गावातील अनेक वाद सामोपचाराने मिटल्याने न्यायालयीन आणि पोलिस यंत्रणेवरील ताण कमी करण्यासही या अभियानाची मोठी मदत झाली.

मात्र, त्यानंतर सत्तेवर आलेल्या विविध सरकारांकडून या अभियानाला पूर्वीप्रमाणे बळ मिळाले नाही. परिणामी, ग्रामस्थांचा उत्साह काही प्रमाणात कायम असला तरी प्रशासनाचा सक्रिय सहभाग आणि पाठबळ कमी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे एकेकाळी लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झालेले तंटामुक्ती अभियान आता अनेक ठिकाणी केवळ समित्या स्थापन करण्यापुरतेच मर्यादित राहिल्याची खंत व्यक्त होत आहे.

राजापूर तालुक्यात अभियानाला मोठे यश

महात्मा गांधी ग्राम तंटामुक्ती अभियानाचा राजापूर तालुक्यात विशेष प्रभाव राहिला आहे. अभियानाच्या पहिल्याच वर्षी रत्नागिरी जिल्ह्यातून केवळ तीन गावांची विशेष पुरस्कारासाठी निवड झाली होती आणि विशेष म्हणजे ही तिन्ही गावे राजापूर तालुक्यातील होती. त्यानंतरही तालुक्यातील अनेक गावांनी तंटामुक्त गावाचा पुरस्कार मिळविला.

ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक आणि तंटामुक्ती समित्यांच्या माध्यमातून गावातील विविध स्वरूपाचे वाद सामोपचाराने मिटविण्यात राजापूर तालुक्याने उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्यामुळे या अभियानाने तालुक्यातील ग्रामीण भागात सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

संवादाचे व्यासपीठ म्हणून समित्यांची गरज

आजच्या काळात सोशल मीडिया, राजकीय मतभेद, वैयक्तिक प्रतिष्ठेचे प्रश्न आणि वाढती स्पर्धा यामुळे किरकोळ वादही गंभीर स्वरूप धारण करण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत तंटामुक्ती समिती ही केवळ वाद मिटविणारी यंत्रणा न राहता गावातील संवादाचे प्रभावी व्यासपीठ बनण्याची गरज आहे.

दोन कुटुंबांतील गैरसमज दूर करणे, किरकोळ वाद वाढू न देणे, सामाजिक प्रश्नांवर सामूहिक चर्चा घडवून आणणे आणि गावातील वातावरण शांत ठेवण्यासाठी पुढाकार घेणे, अशी व्यापक भूमिका या समित्या बजावू शकतात.

‘गावाचा विकास रस्ते, पाणी आणि इमारतींनी होतो; मात्र गावाची खरी प्रगती शांतता आणि सलोख्याने होते,’ ही भावना तंटामुक्ती अभियानाच्या माध्यमातून पुन्हा एकदा बळकट करण्याची आवश्यकता आहे. शासनाकडून आर्थिक बक्षीस मिळो अथवा न मिळो, दोन व्यक्तींमधील अथवा दोन कुटुंबांमधील तंटा मिटवून त्यांना पुन्हा एकत्र आणण्यात यश मिळाले, तर तेच महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानाचे खरे यश ठरेल.