मुंबई- सिंधुदुर्ग कोकण ग्रीनफिल्ड महामार्गाला मंजुरी

असा होणार फायदा ?
Edited by: संदीप देसाई
Published on: July 10, 2023 12:20 PM
views 2983  views

सिंधुदुर्ग : मुंबई-गोवा महामार्गाचे काम अनेक वर्षांपासून रखडले असल्याने मुंबईत कोकणात येणाऱ्यांना मोठी कसरत करावी लागते. ही कसरत थांबवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर मुंबई- सिंधुदुर्ग कोकण ग्रीनफिल्ड द्रुतगती महामार्ग बांधण्याच्या आराखड्याला मंजुरी दिली आहे. त्यानुसार पेणमधील बलवली ते गोव्यातील पत्रादेवीपर्यंत ३८८.४५ किमी लांबीचा हा महामार्ग उभारण्यासाठी भूसंपादन सुरू करण्यात येणार आहे.

मुंबई-गोवा महामार्ग गेल्या काही वर्षांपासून रखडलेला आहे. हा महामार्ग पूर्णत्वास जात नसल्याने या मार्गावरील प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन एमएसआरडीसीने समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर मुंबई- सिंधुदुर्ग कोकण ग्रीनफिल्ड द्रुतगती महामार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार २०२१ मध्ये या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. आराखड्याचे काम पूर्ण करून तो राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. या आराखड्यास नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. मंजुरी मिळाल्याने आता या प्रकल्पासाठी भूसंपादनास सुरुवात करण्यात येणार आहे. अंतिम मंजूर आराखडय़ानुसार पेणमधील बलवली ते सिंधुदुर्गमधील पत्रादेवीदरम्यान हा महामार्ग उभारण्यात येणार आहे. हा महामार्ग एकूण ३८८.४५ किमी लांबीचा असणार आहे.

आराखड्यास मंजुरी मिळाल्याने आता लवकरच एमएसआरडीसी या महामार्गासाठी भूसंपादनास सुरुवात करेल, अशी माहिती एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक संजय यादव यांनी दिली आहे. भूसंपादन आणि निधी उपलब्ध झाल्यास भविष्यात महामार्गाच्या बांधकामासाठी निविदा मागवून कामास सुरुवात करण्यात येईल. ही प्रक्रिया बरीच मोठी असल्याने प्रत्यक्ष काम सुरू होण्यास आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. मात्र हा महामार्ग तयार झाल्यास मुंबई-कोकण प्रवास सुकर आणि वेगवान होणार आहे.

एकूण ३८८.४५ किमी लांबीच्या या महामार्गाचे चार टप्प्यांत काम करण्यात येणार आहे. त्यानुसार पहिला टप्पा पेण, बलवली गाव ते रायगड (रत्नागिरी जिल्ह्याची सीमा) असा ९५.४० किमीचा असणार आहे. तर ६९.३९ किमीचा रायगड (रत्नागिरी सीमा) ते गुहागर, चिपळूण असा दुसरा टप्पा असेल. तिसऱ्या टप्प्यात गुहागर ते रत्नागिरी (सिंधुदुर्ग सीमा) असा १२२.८१ किमी लांबीचा महामार्ग बांधण्यात येणार आहे. तर शेवटचा टप्पा हा १००.८४ किमीचा असणार असून तो रत्नागिरी (सिंधुदुर्ग सीमा ) ते पत्रादेवी (महाराष्ट्र आणि गोवा सीमा) असा असणार आहे.

महामार्गची वैशिष्ट्ये...

* प्रवेश नियंत्रित असा हा सहा पदरी मार्ग असेल.
* या महामार्गाची रचना ताशी १०० किमी वेग अशी असणार आहे.
* कोकण ग्रीनफिल्ड महामार्ग पेणपासून सुरू होणार आहे.
* मुंबई पारबंदर प्रकल्पावरून (शिवडी-न्हावाशेवामार्गे) या महामार्गावर पोहोचता येणार आहे.
* या प्रकल्पामुळे मुंबई-पत्रादेवी प्रवास काही तासांत करता येणार आहे.