मुंबई : राज्यातील गोरगरीब जनतेची दिवाळी गोड करण्यासाठी 100 रुपयात देण्यात येणारा आनंदाचा शिधा ऑफलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याची माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांनी रविवारी दिली. सर्व लाभार्थी शिधापत्रिकाधारकांनी या ऑफलाईन वितरणाचा लाभ आपापल्या जवळच्या रेशनिंग दुकानात जाऊन घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
\राज्य मंत्रिमंडळाच्या 4 ऑक्टोबरच्या बैठकीत शिधापत्रिकाधारकांना दिवाळीसाठी प्रत्येकी एक किलो रवा, साखर, चणाडाळ आणि एक लिटर पामतेल 100 रुपयात देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दिवाळीच्या या शिध्याचे ऑनलाईन पद्धतीने म्हणजेच पॉझ मशीनच्या माध्यमातून वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु इंटरनेटच्या माध्यमातून सुरु असलेली ही व्यवस्था संथ असल्यामुळे शिधा वाटपात विलंब झाला होता. यावरून सरकारवर टीका सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर शिधा ऑफलाईन देण्याचा निर्णय आज चव्हाण यांनी घोषित केला.
राज्यातील प्राधान्य कुटुंब आणि अंत्योदय अन्न योजनेतील पात्र सुमारे 1 कोटी 62 लाख शिधावाटप पत्रिका लाभार्थींमधील सुमारे 7 कोटी नागरिकांना दिवाळीनिमित्त वाटप करण्यात येणा-या आनंदाचा शिधा या शिधासंचाचे वितरण आजपासून ऑफलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.
ज्या ठिकाणी ऑनलाईन सुविधा सुरळीत सुरु आहे त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने वाटप करावे. तसेच ज्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीमुळे वेळ लागत आहे असे निदर्शनास येते तेथे आजपासून आनंदाची शिधा ही दिवाळी भेट ऑफलाईन पद्धतीने सुरु करण्यात येणार आहे, असे चव्हाण यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत स्पष्ट केले.
ऑफलाईन पध्दतीने केलेल्या शिधा जिन्नस वाटपाची माहिती सेल रजिस्टरमध्ये प्रत्येक रास्त भाव दुकानदाराने नोंदवायची आहे. तसेच नोंद घेताना लाभधारकाचे नाव, शिधापत्रिकेचे शेवटचे चार अंक, मोबाईल क्रमांक, दिलेल्या शिधा जीन्नासचा तपशील, प्राप्त रक्कम (100 रुपये) आणि लाभधाराकाची सही ह्या बाबी नमूद करावयाच्या आहेत. काही जिल्ह्यात सगळे शिधाजिन्नस पुरवठाधारकाकडून उपलब्ध झाले नसल्याचे निदर्शनास आले. मात्र काही जिन्नस लाभधारकाला दुकानात उपलब्ध आहे असे दिसून आल्यावर जे उपलब्ध जिन्नस आहेत ते देण्यात यावे अशी मागणी होत आहे. या परिस्थितीत उपलब्ध जिन्नस लाभधारकाला देता येणार आहे. मात्र पुरवठादाराकडून सगळेच जिन्नस त्वरेने प्राप्त करवून घ्यावे अशा सूचनाही चव्हाण यांनी दिल्या आहेत.
ऑफलाईन पद्धतीचा वापर होत असल्याने लाभधारकास त्याचे जोडून दिलेल्या दुकानातूनच शिधा जिन्नस वितरित करणे गरजेचे आहे. जिन्नस वाटप हा दुकानदाराकडून त्याच्या नेहमीच्या ओळख असणाऱ्या शिधाधारकाला होणार आहे. त्यामुळे लाभधारकाकडून मिळणारी 100 रुपये ही सवलत रक्कम प्रथम टप्प्यात जमा करवून घ्यावी कि संपूर्ण जिन्नस दिल्यावर, याबाबत दुकानस्तरावर निर्णय घेण्यात येईल. या वितरणाचा लेखाजोखा व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी दुकानदाराची असेल. तसेच उर्वरित जिन्नस प्राप्त झाल्यावर त्याची लाभधारकाकडून पोच घेण्याची जबाबदारी दुकानदाराची असेल, या अटीवर उपलब्ध जिन्नस वितरीत करता येतील.
ऑफलाईन पद्धत केवळ दिवाळी भेट शिधाजिन्नस वाटपासाठी लागू आहे. दिवाळी भेट वाटपासाठी ऑफलाईन पद्धत अस्तित्वात असली तरी गोदामात येणारी जिन्नस आवक तसेच रास्त भाव दुकानात पाठवण्यात येणारे जिन्नस यांची नोंद ऑनलाईन पद्धतीनेच ठेवणे आवश्यक आहे. त्याबाबत दक्षता घेण्याच्या आणि कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती रवींद्र चव्हाण यांनी दिली.