सिंधुदुर्ग : परंपरेतून प्रबोधनाचा लोकाविष्कार पहावा, तो कोकणच्या लाल मातीच्या संस्कृतीत घडलेल्या दशावतारात ! या लोककलेने सातासमुद्रापार झेप घेतलीच, पण बदलत्या डिजिटल सोशल मिडियाच्या जमान्यातही मिणमिणत्या उजेडात होणार्या नाट्यपुष्पांना आजही तेवढाच सुगंध दरवळतोय ! रसिक या लोककलेला कधीच अंतर देऊ शकत नाहीत, जोपर्यंत या रंगदेवतेच्या दरबारात न्यायासाठी लढाई सुरू राहिल. कलाकार भलेही ‘गरीब’ असेल पण या कलेला ‘श्रीमंत’ करण्यासाठी ते झटत राहतील. याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कुडाळ, तालुक्यातील कविलकाटे गावचा दशावतारात स्त्री अभिनय साकारणारा युवा कलाकार यश जळवी ! नवरात्रौत्सवात याच स्त्रीशक्तीला नवचेतना देण्यासाठी आपली कला पणास लावणार्या या कलाकाराची अदाकारी नाट्यरसिकांना नेहमीच प्रेरित करीत राहणार आहे. सावंतवाडी तालुक्यातील निगुडे यावात नवरात्रौत्सवानिमित्त आयोजित नाट्यप्रयोगात ‘तू बुद्धि दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे।’ या गाण्यावर उपस्थित सर्व चिमुकल्या मुलांनी फेर धरला. क्षणभर दशावतारात ‘शाळा’ भरल्याचा प्रत्यानुभव आला. यश जळवीच्या या गाण्याने ‘नवचेतना’ तर मुलांना दिलीच, पण या कलेला पुढे घेऊन जाण्याचा एक ‘विश्वास’ही दिला.
निमित्त होते, निगुडे माऊली मंदिरातील नवरात्रौत्सवाचे ! कै. बाबी कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ, नेरूर यांचा ‘ अनंत चतुर्दशी महिमा’ नाट्यप्रयोग सुरू होता. अत्यंत भावनिक क्षण येतो, राजकन्येच्या मातेचे मृत्यू होतो. सावत्र आईकडून राजकन्येचा छळ, मोलकरणीसारखी वागणूक त्या राजकन्येला दिली जाते. ऐर्श्वयाचा मोह नसलेली राजकन्या विष्णूची परमभक्त. अशावेळी गंजून गेलेल्या आयुष्याला उभारी देतानाचा हा क्षण डोळे पाणावणारा असतो, अन याचवेळी यशच्या मधुर कंठातून सुरू होते, ‘तू बुद्धि दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे।’ या भावगीताने वातावरण इतके भावूक होते, की उपस्थित मुलांच्या कंठातूनही ती चेतना जागृत होते. सर्वत्र भावमय वातावरण! असा अद्भुत प्रसंग पहिल्यांदाच दशावतारात निगुडे याठिकाणी घडला, आणि या गीताचा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
परिस्थिती ‘गरीब’ पण कलेने ‘श्रीमंत’
दशावतार, देश-विदेशात ही कला पोहोचलीय. अमेरिकेमध्येही दशावतारी नाटके होतात. तेथे मराठी माणसांचा मोठा समूह आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातूनही ते या कलेचा आस्वाद घेतात. अत्यंत प्रामाणिक, कष्टाळू आणि भूमिकेचा, स्वत:च्या कलेचा गर्व न बाळगता, स्वर, तालाच्या धुक्यात स्वत:ला झोकून देणार्या या कलावंतांच्या कलेची कदर करावी तेवढी थोडीच. कोकणच्या संस्कृतीचा आधारस्तंभ म्हणजे हि लोककला. कुठेही उभा राहतो रंगमंच, आणि या मंचावर रंगतो दशावतार! देव आणि दानव, न्याय आणि अन्याय यामधील संवादाच्या तलवारी तळपू लागतात. विजय सत्याचा होतो, आणि हे कथानक संगीताच्या प्रवाहातून वलयांकित होते नाट्य रसिकांपर्यंत. प्रत्येक गावातील युवा कलाकार आज या कलेमध्ये वावरत आहेत. असाच हा कलाकार, यश जळवी. घरची परिस्थिती अत्यंत बेताची. आई, वडिल रेल्वेत खाण्याचे पदार्थ विकतात. तळहातावरचे हे पोट, पण कुटुंब आज समाधानी आहे, कारण कोकणच्या रसिकांना तृप्त करण्याची कला यश याच्यात आहे.
उच्चशिक्षीत ‘यश’ने ही कला का निवडली ?
यश जळवी उच्चशिक्षीत आहे. त्याने एम.कॉम पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. घरात कुठलाही नाट्यकलेचा वारसा नाही, विचार केला तर त्याला चांगली नोकरी मिळू शकली असती, पण त्याने या कलेतच स्वत:ला वाहून घेतले. कोकणची ही संस्कृती, परंपरा अधिक समृद्ध करण्यासाठी तो झटत आहे. निरवडे येथील एका कंपनीतून या कलेचा श्रीगणेशा केलेल्या यशने ४ वर्षापूर्वी दोडामार्गच्या सिद्धेश्वर कंपनीमधून खर्या अर्थाने नाटकांस सुरूवात केली. लोक काय म्हणतील, यापेक्षा मला हे पात्र जीवंत करायचे आहे, अमर करायचे आहे असा चंग त्याने बांधला. त्यानंतर खानोलकर दशावतार आणि आता कलेश्वर नाट्य मंडळात यश आपली कला सादर करीत आहे.
ही पात्रे केली जीवंत !
यशने आतापर्यंत केलेल्या भूमिका प्रचंड गाजल्या आहेत. त्यात हरिश्चंद्र तारामती यातील तारामती, पिंगला, वृंदा जलधर मधील वृंदा, कांचनगंगा मधील कांचन या भूमिका त्याने जीवंत केल्या. शापमुक्त नाटकातील डोंबार्याची भूमिका विशेष गाजली आहे. मालवणी भाषेलाही समृद्ध करण्यासाठी भूमिकेच्या माध्यमातून यशने आपले प्रयत्न सुरूच ठेवले आहेत.