
दोडामार्ग : नियतीच्या कठोर फेऱ्यात सापडलेल्या एका तरुण विधवा आईला आणि तिच्या तीन निरागस लेकरांना अखेर आधाराची उबदार सावली मिळाली. पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपटे आणि नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्या संवेदनशील पुढाकारामुळे या कुटुंबासाठी नव्या आयुष्याची दारे उघडली गेली आहेत.
काही महिन्यांपूर्वी पतीच्या अकाली निधनाने ही तरुण माता अक्षरशः उघड्यावर आली. पंधरा वर्षांची मुलगी, अकरा वर्षांचा मुलगा आणि अजूनही लहानगं असं तिसरं अपत्य – या तीन जीवांची जबाबदारी तिच्या एकट्या खांद्यावर कोसळली. दुःख, आर्थिक संकट आणि मानसिक वेदना यांच्या गर्तेत तिचं जीवन हरवून बसलं होतं. निराधारपणाच्या या वेदनादायी छायेत लहानग्यांचे बालपणही विझू लागले होते. तिच्या मनावर झालेला खोल परिणाम आणि मानसिक स्वास्थ हरपल्याने ती माऊलीही स्वतःला हरवून बसण्याच्या उंबरठ्यावर आली होती.
अशातच परवा शहरातील वडापाव गाड्यांवर झालेल्या किरकोळ चोरीत अकरा वर्षांचा मुलगा आढळून आल्याने पोलिसांच्या नजरेस या कुटुंबाचं भयावह वास्तव आलं. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक खोपटे यांनी या विधवा मातेची आणि तिच्या मुलांची अवस्था जागरूक नागरिकांच्या माहितीद्वारे समजून घेतली. तिच्या डोळ्यांतील निःशब्द वेदना आणि मुलांच्या भविष्यातील अंधार पाहून त्यांचे हृदय पिळवटले. “अल्पवयातच चोरी करण्याची वेळ का आली? बहुदा पोटाची आग विजवण्यासाठी त्याने उचलेल हे पाऊल, त्या लहानग्याला यावेळी पनिशमेंट द्यायची की या चुकीच्या मार्गातून योग्य मार्ग दाखवायचा?” असा प्रश्न होता.
अखेर, या भयाण वास्तवाने खऱ्या अर्थाने “खाकीतील माणुसकी” जागी झाली. नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनीही खोपटे यांच्यासोबत तातडीने मदतीसाठी पुढाकार घेतला. कुडाळ अणाव येथील संविता आश्रमाशी संपर्क साधून या विधवा महिला आणि तिच्या तीन मुलांचे पुनर्वसन करण्यात आले. आश्रमाच्या सुरक्षित वातावरणात आता या लहानग्यांना शिक्षणाची संधी, सुरक्षित छत्रछाया आणि आईला नव्या आयुष्याची नवी दिशा मिळणार आहे.
या कार्यतत्परतेचं आणि मानवतेचं दोडामार्ग तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे. समाजातील संवेदनशीलतेचा खरा आदर्श ठरलेले पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपटे आणि नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्या या समय सूचकतेच स्वागतचं होतं आहे.
एका कुटुंबाच्या डोळ्यात पुन्हा आशेचा प्रकाश फुलवणाऱ्या या खऱ्या हिरोंचं दोडामार्गवासीय मनापासून कौतुक करत आहेत. १५ वर्षांच्या मुलीवर समाजातील काही विघातक नजरा रोखल्या जाव्यात आणि ११ वर्षांचा मुलगा चुकीच्या मार्गाला लागू नये, यासाठी मिळालेल्या या सुरक्षित आधारामुळे या तिघांच्या आयुष्याला आता योग्य दिशा मिळाली आहे.