
दोडामार्ग : आडाळी MIDCमध्ये उद्योगाऐवजी गोल्फ कोर्स प्रकल्प सुरु करण्याचा कोणताही प्रयत्न होत असेल, तर तो तालुक्यातील युवा वर्गाच्या रोजगारावर थेट गदा आणणारा आहे. “युवा वर्गाचा तोंडचा घास हिरावण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही.तर संघर्ष अटळ आहे,” असा इशारा दोडामार्ग तालुका हेल्पलाईन ग्रुपचे अध्यक्ष वैभव इनामदार यांनी दिला.
इनामदार म्हणाले, “दोडामार्ग तालुक्यातील MIDCमुळे स्थानिक युवकांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होऊ शकते. परंतु उद्योगाऐवजी गोल्फ कोर्सचा घाट घालून तालुक्यातील रोजगार नष्ट करण्याचा प्रयत्न झाला, तर आम्ही युवकांना एकत्र करून त्या विरोधात तीव्र आंदोलन उभारू.”
“माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी उद्योगमंत्री असताना आडाळी MIDCला मान्यता दिली. त्या निर्णयामुळे उद्योगहीन तालुक्यातील युवा वर्गामध्ये रोजगाराची नवीन आशा निर्माण झाली होती. पण आजही 90 टक्के युवक रोजगारासाठी गोव्याला किंवा बाहेरच्या राज्यात जावे लागते आहे.”
गोवा–दोडामार्ग मार्गावरील अपघातांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले, “दररोज ये-जा करताना असंख्य अपघात झाले आहेत; अनेक युवकांचा बळी गेला आहे. स्थानिक रोजगार उपलब्ध होणे ही वेळेची गरज आहे. अशावेळी आडाळी MIDCच अस्तित्व धोक्यात येईल, असे निर्णय कुणी घेतले तर युवा वर्ग शांत बसणार नाही.”
आमची “MIDC वाचवण्यासाठी आणि आगामी पिढीच्या भवितव्यासाठी तालुक्यातील युवकांनी आता एकसंघ होणे आवश्यक आहे. वेळ पडल्यास हक्कासाठी रस्त्यावर उतरून लढाई लढण्यास आम्ही तयार आहोत, काही झाले तरी आता माघार नसेल. असही त्यांनी म्हटलं आहे.
   
                    
   


 
      
   
   
  
 
  
  
  
  
  	
   
   



               



