
सावंतवाडी : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण हे ५ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून त्यांच्या दौऱ्याचे अधिकृत वेळापत्रक जाहीर झाले आहे. सायंकाळी ४ वा. सावंतवाडी शिरोडा नाका येथे विशाल परब यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या भाजप जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. या उद्घाटन सोहळ्याला जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती श्री. परब यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चव्हाण यांचा हा दौरा विशेष महत्त्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यात ते जिल्ह्यातील संघटनात्मक तयारीचा विस्तृत आढावा घेणार आहेत. जिल्ह्यातील ५० जिल्हा परिषद, १०० पंचायत समिती गण तसेच कणकवली, मालवण, वेंगुर्ले आणि सावंतवाडी या नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुकांसंदर्भात तयारीचा आढावा घेतला जाणार आहे. या आढावा बैठकीस भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी आमदार प्रमोद जठार, संघटनमंत्री शैलेंद्र दळवी, तसेच जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष आणि निवडणूक प्रभारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीदरम्यान युतीबाबत महत्वपूर्ण चर्चा होण्याची शक्यता असून काही पक्ष प्रवेशाचे धमाके देखील अपेक्षित आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष आणि पालकमंत्री यांच्या उपस्थितीत होणारी ही बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.










