जोर आचरा तालुक्याच्या मागणीचा...कस राजकीय इच्छाशक्तीचा

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: September 24, 2025 12:40 PM
views 668  views

आपल्या सर्वसामान्य जनतेला प्रशासकीय सुविधा अत्यंत चांगल्या पध्दतीने आणि सुलभ रितीने, विनासायास मिळाव्यात, अशी अपेक्षा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी ठेवायला काहीच हरकत नसावी. किंबहुना ते त्यांचे उद्दिष्ट असायला हवे. परंतु त्यासाठी काही प्रयत्न होताना दिसत नसतील तर सामान्य जनतेने या मागणीला जोर द्यायला हवा, कारण तो त्यांचा अधिकार आहे. मालवण आणि देवगड तालुका यांचा भौगोलिकदृष्टया विचार केला तर प्रशासकीय कामासाठी सर्वसामान्य नागरीकांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागतो. सरकारी कामाची पद्धत आणि त्यात अंतर जास्त असल्याने येण्याजाण्याच्या गैरसोयीबरोबर ऊन, वारा, पाऊस याचाही सामना कोकणवासियांना करावा लागतो. यावर उपाय म्हणजे भौगोलिक क्षेत्र आणि लोकसंख्या यानुसार नवीन जिल्हे आणि तालुक्यांची निर्मिती करणे. मालवण आणि देवगड या दोन तालुक्यांवर पडणारा प्रशासकीय भार पाहता, आचरा या नवीन तालुक्याची निर्मिती करणे प्रशासनाला अत्यंत गरजेचे आहे. जनतेचीही गेल्या कित्येक वर्षांपासूनची ती मागणी आहे. 

राज्यात नवीन जिल्हे आणि तालुका निर्मितीचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संकेत दिल्यानंतर आता आचरा तालुका स्वतंत्र व्हावा ही मागणी जोर धरू लागली आहे. काही ग्रामपंचायतींनी आचरा तालुका व्हावा असे ठराव ग्रामसभेत घेतले आहेत. मात्र, अद्याप अधिकृत प्रस्ताव शासनाकडे सादर झालेला नाही. आचरा गावाला तालुक्याचा दर्जा मिळाल्यास आसपासच्या गावातील समस्या दूर होणार आहेत.

आचरा हे मालवण आणि देवगड तालुक्याच्या सीमेवर असलेले गाव. सन 2011 च्या जनगणनेनुसार आचरा गावाची 5 हजार 909 एवढी लोकसंख्या आहे. आता 2021 च्या जनगणनेनुसार निर्णय घेणार घेतला जाणार आहे. आचरा येथे पर्यटकांची संख्या देखील वाढत आहे. बहुचर्चित सी वर्ल्ड प्रकल्प वायंगणी, तोंडवळी माळरानावर प्रस्तावित होता. भविष्यात या प्रकल्पाला चालना मिळाल्यास आचऱ्याच महत्व वाढणार आहे. शासकीय कामासाठी आचरा आणि लगतच्या गावांना मालवणला यावे लागते. गेल्या अनेक वर्षांपासून आचरा स्वतंत्र तालुका व्हावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे. आचरा, चिंदर, वायंगणी, तोंडवळी, पळसंब, त्रिंबक, यासह देवगड तालुक्यातील पोयरे, हिंदळे, मुणगे यांनाही आचरा जवळ आहे. सध्या तरी आचरा आणि लगतच्या गावांनी आचरा तालुका व्हावा अशी मागणी केली आहे. देवगड तालुक्यात असणाऱ्या परंतु आचरे गावच्या जवळ असणाऱ्या गावांची भूमिका सुद्धा महत्वाची आहे. त्या गावांना विश्वासात घेऊन ही मागणी रेटून धरावी लागणार आहे. अद्याप ही फक्त मागणी पुढे आली आहे. ग्रामस्थांनी ग्रामसभेत ठराव देखील घातले आहेत. परिपूर्ण प्रस्ताव अजून शासनाकडे सादर झालेला नाही. लोकांनी मागणी केली म्हणून लगेच तालुक्याची निर्मिती होणार नाही. त्यासाठी लोकसंख्या, क्षेत्रफळ यासह सर्व निकष बसवून शासनाकडे प्रस्ताव प्रस्ताव सादर करावा लागणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी स्तरावरून ग्रामस्थांची मते जाणून घेतली जातात. हरकती, सूचना मागविल्या जातात. अंतिम आराखडा तयार झाल्यानंतर पुन्हा शासनाकडे सादर केला जातो.  

तालुका निर्मितीसाठी त्यासाठी शासकीय कार्यालयांसाठी जागा लागणार आहे. सध्या आचरे गावात पोलीस ठाणे, विद्युत सबस्टेशन, पोस्ट ऑफिस, मोठी बाजारपेठ, महसूल मंडळ अधिकारी, शासकीय धान्य गोडाऊन, शासकीय विश्रामगृह, प्राथमिक आरोग्य केंद्र, बँका या सुविधा उपलब्ध आहेत. तहसील कार्यालय, पंचायत समिती, कृषी कार्यालय, मत्स्य, बंदर विभाग या महत्वाच्या कार्यालयासह शासनाचे इतर विभाग आहेत त्यांच्या इमारतीसाठी जागा लागणार आहे. तेवढी जागा आचरा वासियांना उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. शासकीय कार्यालये म्हटल्यावर अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती होणार. आचरे आणि लगतच्या गावातील ग्रामस्थांची मागणी रास्त आहे. सरकारी कामासाठी त्यांना मालवणला फेऱ्या माराव्या लागतात. एका शहरात आल्यावर पूर्ण दिवस जातो. वेळ आणि खर्चही होतो. तालुका निर्मिती झाल्यास आचरा आणि परिसराचा झपाट्याने विकास होईल. लोकांना शासकीय कामासाठी जात असलेला वेळ वाचेल. 

रत्नागिरी पासून सिंधुदुर्ग वेगळा झाल्यानंतरच जिल्ह्याचा कायापालट झाला. प्रशासकीय सुविधा अधिक जवळ आल्यात. संपुर्ण नवीन यंत्रणा उभी राहिली. सिंधुदुर्गनगरी हे त्याचेच एक अतिशय चांगले उदाहरण आहे. दोडामार्ग तालुकाही माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी स्वतंत्र केला. त्यानंतर तिथे नगरपंचायत अस्तित्वात आली. आडाळीत एमआयडीसी निर्माण झाली. भविष्यात तिथे उद्योग व्यवसाय येतील. त्यामुळे हीच परंपरा कायम ठेवत आचरा हा स्वतंत्र तालुका निर्माण करावा, आणि त्यासाठी आवश्यक त्या सुविधा निर्माण कराव्यात, अशी मागणी आता जोर धरत आहे.


🔘 आचरा स्वतंत्र तालुका व्हावा यासाठी आपण आग्रही आहोत. आचरा गावाला पर्यटनासाठी भव्य असा समुद्रकिनारा लाभला आहे. दशक्रोशीतील लोकांवर अवलंबून असलेले आणि विकसित गाव आहे. तालुक्यात असावे असे काही विषय, कार्यालये आधीच मार्गी लागले आहेत. तालुक्याची मागणी पूर्ण झाल्यास दशक्रोशीतील लोकांची मोठी सोय होईल. स्थानिक आमदार निलेश राणे, पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे यांच्याकडे मागणी केलीच आहे. त्यांच्या पाठपुराव्यातून हा प्रश्न मार्गी लावणार. यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटायची वेळ आली तरी पालकमंत्री नितेश राणे, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावणार.



धोंडी चिंदरकर,

भाजपा तालुकाध्यक्ष, मालवण


🔘 सर्वसामान्य ग्रामस्थ व शेतकऱ्यांचे हित साधले जावे, शासकीय कामे त्वरित पूर्ण व्हावीत याकरिता आचरा तालुका होणे गरजेचे आहे. शासकीय कामासाठी मालवणला फेऱ्या माराव्या लागतात. तालुका निर्माण झाल्यास ग्रामस्थांना सर्व सुविधा गावातच मिळतील. सागरी किनारा सुद्धा लाभला आहे. मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहेत. त्यामुळे विकासनिधी सुद्धा जास्त मिळेल. 

जेरॉन फर्नांडीस

सरपंच, आचरा ग्रामपंचायत


🔘 आचरा तालुका झाल्यास चांगलेच आहे. दळवळणाच्या दृष्टीने आचरा सोयीस्कर आहे. लोकसंख्या वाढली आहे. शहरीकरण वाढत आहे. पर्यटक सुद्धा येत आहेत. कोस्टल रोडची आम्ही मागणी केली आहे. पर्यटन दृष्टया विकसित होईल. 


संजय केळूसकर

तळाशील ग्रामविकास मंडळ अध्यक्ष


🔘 मालवण आचरा बघितलं तर आम्हाला आचरा जवळ आहे. मालवण 12 ते 15 किलोमीटर आहे.  सर्वच बाजूने मोक्याचे ठिकाण हे आचरा आहे. बाजार पण मोठ्या प्रमाणात भरतो. आचरा तालुक्याचे ठिकाण झालं तर दशक्रोशीला फायदा होईल. 

हनुमंत प्रभू

वायंगणी ग्रामस्थ


आचरा तालुका झाला तर चांगलंच आहे. पण त्यासाठी लागणारी जागा कुठे आहे ? किमान दोन एकर जागा आवश्यक आहे. आचरा येथे जागाच नाही. डम्पिंग ग्राउंड साठी आम्ही जागेची मागणी करत आहोत. मात्र, ती जागा उपलब्ध करून देऊ शकत नाही तर तालुका कार्यालयासाठी कुठून जागा देणार ? ग्रामसभेत घातले मागणी केली होती. आचरा येथे जागा उपलब्ध झाली तर ठीक आहे. पण जागा उपलब्ध न झाल्यास गावाच्या बाहेर चिंदर, त्रिंबक येथे जागा मिळत असेल तर त्याठिकाणी तालुका कार्यालय करावं लागेल.


मंगेश टेमकर

आचरा, माजी सरपंच, मालवण 


🔘 आचरा हे महत्वाचे व्यापारी केंद्र आहे. तालुका स्तरासारखी बाजारपेठ आहे. सर्व प्रकारची दुकाने आहेत. आठवड्यातून रविवार, गुरुवार असे दिवस बाजार भरणारा जिल्ह्यातील आचरा हे एकमेव गाव आहे.  दशक्रोशीसह आजूबाजूच्या गावातील लोक मोठ्या संख्येने खरेदीसाठी येतात. बँक, पतसंस्था, शासकीय कार्यालये आहेतच. आचऱ्याच्या बाजूचे गाव आहेत तिथी वाहतुकीच्या सुविधा नाहीत. त्यांना पहाटे उठून मालवणला जावं लागतं. त्यांना आचरा जवळ आहे. त्यामुळे तालुक्याचा दर्जा मिळाल्यास लोकांना फायदा होईल. 

अर्जुन बापर्डेकर

आचरा, आदर्श व्यापारी संघटना


🔘 कणकवली, मालवण, देवगड यांच्या मध्ये आचरा गाव आहे. तालुका दर्जासाठी बहुतेक सुविधा आहेत. त्यावेळीही मागणी होती, मात्र त्यावेळी सरकारकडून प्रतिसाद मिळाला नाही. आता आमच्या आशा वाढल्या आहेत. इथल्या लोकांची मागणी वाढू लागली आहे. दोडामार्गला तालुका निर्माण करताना त्याठिकाणी कोणत्याच सुविधा नव्हत्या. इकडे तर बहुतेक शासकीय कार्यालये आहेत. दोडामार्ग तालुका निर्मिती समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर गावकर यांनीही आचरा तालुका व्हावा यासाठी आचऱ्यात येऊन मार्गदर्शन केले होते. त्यामुळे आता मागे हटणार नाही.


राजन गांवकर

चेअरमन

खरेदी विक्री संघ, मालवण


कृष्णा ढोलम, चीफ रिपोर्टर, कोकणसाद LIVE