सिंधुदुर्ग : सद्यस्थितीत वातावरणामध्ये वाढत चाललेल्या उन्हामुळे शरीरावर अनेक दुष्परिणाम दिसून येतात तर काहीवेळेस मृत्यूही ओढवला जावू शकतो. यावर भीती न बाळगता दक्षता घेण्याचे आवाहन प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी केले आहे.
डॉ. श्रीपाद पाटील यांनी याबाबत पुढीलप्रमाणे माहिती दिली. आपल्या शरीराचे तापमान नेहमी ३७ अंश सेल्सिअस असते. या तापमानातच शरीरातले सर्व अवयव नीट काम करु शकतात. घामाच्या रुपाने पाणी बाहेर काढून शरीर ३७ अंश सेल्सिअस तापमान कायम राखते. सतत घाम निघत असताना पाणी पीत राहणे अत्यंत गरजेचे आहे. पाणी शरीरात इतरही अधिक महत्त्वाची कामे करते. त्यामुळे शरीरातला पाण्याचा साठा कमी झाला तरी शरीर घामाच्या रुपाने पाणी बाहेर टाकणे टाळते. जेव्हा वातावरणातील तापमान ४५ अंशाच्या पुढे जाते आणि शरीरातील कुलिंग व्यवस्था पाण्याच्या अभावाने ठप्प होते. तेव्हा शरीराचे तापमान ३७ अंशांच्या पुढे जाऊ लागते. शरीराचे तापमान जेन्हा ४२ अंशाला पोहचते तेव्हा रक्त तापू लागते आणि रक्तातले प्रोटिन अक्षरश: शिजू लागतात. परिणामता रक्त घट्ट होते. ब्लडप्रेशर कमी होते. मेंदूचा रक्तपुरवठा थांबतो. यामुळे माणूस कोमात जावून एक एक अवयव क्षणात बंद पडतात आणि मुत्त्यू ओढवतो.
उष्णतेमुळे होणारा त्रास आणि त्या अनुषंगाने करावयाची कार्यवाही खालीलप्रमाणे नमूद केलेली आहे.
उष्णता विकार- सनबर्न लक्षणे- कातडी लालसर होणे, सूज येणे, वेदना, ताप आणि डोके दुखी. प्रथमोपचार- साधा साबण वापरुन आंघोळ करावी. घामास अडथळा करणारा कातडीवरील तेलकटपणा दूर करावा. कातडीवर फोड असतील तर वैद्यकीय सल्ला घ्यावा.
उष्णता विकार- उष्णतेमुळे स्नायुमुळे गोळे येणे (हिट क्रॅम्प्स) लक्षणे- हाता पायाला गोळे, पोटाच्या स्नायुत मुरडा खूप घाम येणे. प्रथमोपचार- रुग्णाला सावलीत आणि थंड जागेत हलवा, दुखणाऱ्या स्नायुला हलका मसाज द्या, थोडे-थोडे पाणी प्यायला द्या. उलटी झाली तर पाणी देवू नका.
उष्णता विकार- उष्णतेमुळे प्रचंड थकवा (हिटएक्झॉस्टेशन) लक्षणे- खूप घाम, थकवा, कातडी थंडगार, नाडीचे ठोके मंद, डोकेदुखी, चक्कर उलटी. प्रथमोपचार- रुग्णाला थंडजागी शक्यतो एसीमध्ये झोपवा. अंगावरील कपडे सैल करा, ओल्या थंड फडक्याने अंग पुसून घ्या, थोडे-थोडे पाणी पाजत रहा. उलटी होत असेल तर पाणी देवू नका. दवाखान्यात हलवा.
उष्णता विकार- उष्माघात (हिट्स् स्ट्रोक)- ताप (१०६ डिग्री) कातडी-गरम आणि कोरडी, नाडीचे ठोके वेगात आणि जोरात , घाम नाही, अर्धवट शुध्दित. प्रथमोपचार- या रुग्णाला तात्काळ दवाखान्यात भरती करणे आवश्यक आहे. थंड जागी / एसीमध्ये न्या. कपडे काढा. थंड पाण्याने आंघोळ किंवा स्पोन्जिंग, तोंडाने पाणी देवू नका.
उष्णेतेपासून बचाव करण्यासाठी खालील बाबीमध्ये काय करा आणि काय करु नका हे पहा.
हे करा - पुरेसे पाणी प्या प्रवासात पाणी सोबत ठेवा, हलक्या वजनाचे फिकट रंगाचे सैलसर कपडे वापरा. उन्हात गाॕगल, छत्री व पादत्राणे वापरा उन्हात जाताना टोपी किंवा हॅटखाली ओलसर कपडा ठेवा, पाळीव प्राण्यांना सावलीत थंड ठिकाणी ठेवा, ओलसर पडदे, पंखा, कुलर यांच्या मदतीने घर थंड ठेवा.
हे करु नका- शक्यतो उन्हाच्या वेळेत घराबाहेर जाणे टाळा, कष्टाची कामे उन्हात करु नका. पार्क केलेल्या वाहनात लहान मुलांना ठेवू नका, गडद रंगाचे तंग कपडे वापरु नका, उन्हाच्या काळात स्वयंपाक करणे टाळा स्वयंपाक हवेशीर ठेवा, मद्य, चहा, कॉफी, सॉफ्टड्रिंग टाळा. खूप प्रथिनेयुक्त अन्न आणि शिळे अन्न खाऊ नका.