
सावंतवाडी : (विनायक गांवस) : सावंतवाडी नगरपरिषद नगराध्यक्ष पदासाठीच्या लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून नगराध्यक्ष पदासाठी एकुण ६ उमेदवार रिंगणात आहेत. तसेच ८६ उमेदवार नगरसेवक पदासाठी आपल नशिब आजमावणार आहेत. यात एकुण ७ जण अपक्ष असून २ जण नगराध्यक्षपदासाठी अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. त्यामुळे सावंतवाडी नगरपरिषदेच्या लढतीत विजयी षटकार कोण ठोकणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
नगराध्यक्षपदासाठी एकुण ६ उमेदवार रिंगणात असून भाजपकडून युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, शिवसेना ॲड. निता सावंत-कविटकर, उबाठा शिवसेना सीमा मठकर, कॉग्रेसच्या साक्षी वंजारी तर अपक्ष उमेदवारी दाखल करत अन्नपूर्णा कोरगावकर व निशाद बुराण निवडणूक रिंगणात आहेत. अपक्ष उमेदवार सौ. अन्नपूर्णा कोरगावकर यांच्या बंडखोरीचा फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे. तर अपक्ष निशाद बुराण किती मत पदरी पाडून घेतात ? यावर काहींची राजकीय गणित अवलंबून असणार आहेत.
प्रभाग १ मध्ये 'अ' मध्ये कॉग्रेसच्या शिल्पा कांबळी, शिवसेना हर्षा जाधव, भाजपच्या माजी नगरसेविका दिपाली भालेकर, उबाठा शिवसेनेकडून माजी नगरसेविका अफरोज राजगुरू तर अपक्ष म्हणून फरीद बागवान मैदानात आहेत. 'ब'मध्ये भाजपकडून माजी नगरसेवक राजू बेग, शिवसेना बसीर पडवेकर, कॉग्रेस तौकीर शेख, उबाठा शिवसेनेचे शेखर सुभेदार व अपक्ष समीऊल्ला ख्वाजा रिंगणात आहेत. प्रभाग २ 'अ' मध्ये उबाठा शिवसेना दिप्ती केसरकर, भाजप सुनिता पेडणेकर व शिवसेना संजना पेडणेकर अशी तिरंगी लढत होत आहे. 'ब' मध्ये शिवसेनेचे माजी नगरसेवक खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, भाजपकडून माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, उबाठा शिवसेना गजानन वाडकर, कॉग्रेसचे बाळा नमशी मैदानात उतरले आहेत. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर व माजी नगरसेवक बाबू कुडतरकर यांच्यात तगडी फाईट होणार आहे. प्रभाग ३ 'अ' मध्ये भाजपच्या महिला शहराध्यक्षा मोहीनी मडगावकर, कॉग्रेस स्नेहल मसुरकर, शिवसेनेकडून माजी नगरसेविका दिपाली सावंत, उबाठा शिवसेना गीता सुकी अशी लढत होत असुन 'ब' मध्ये उबाठा शिवसेनेचे संघटक निशांत तोरसकर, भाजपचे माजी नगरसेवक आनंद नेवगी, कॉग्रेसचे शहराध्यक्ष ॲड. राघवेंद्र नार्वेकर, शिवसेना वैभव म्हापसेकर व अपक्ष माजी नगरसेवक सुरेश भोगटे अशी लढत आहे.
प्रभाग ४ 'अ' मध्ये उबाठा शिवसेना समीरा खलील, शिवसेना ॲड. सायली दुभाषी, कॉग्रेस निशातअंजुम शेख, भाजप मेहशर शेख अशी लढत आहे. 'ब' मध्ये उबाठा शिवसेना माजी नगरसेवक देवेंद्र टेमकर, भाजप गोपाळ नाईक, शिवसेना प्रसाद नाईक, कॉग्रेस सुनिल पेडणेकर नशिब आजमावत आहेत. प्रभाग ५ 'अ' मध्ये उबाठा शिवसेनेकडून कृतिका कोरगावकर, कॉग्रेस रितू परब, भाजप दुराली रांगणेकर, शिवसेना माजी नगरसेविका उत्कर्षा सासोलकर मैदानात असून 'ब' मधून भाजपचे माजी नगरसेवक सुधीर आडिवरेकर, उबाठा शिवसेना माजी नगरसेवक उमेश कोरगावकर, शिवसेनेचे बंड्या कोरगावकर, कॉग्रेसचे समीर वंजारी व अपक्ष बबलू मिशाळ यांच्यात तगडी फाईट होणार आहे. शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या श्री. मिशाळ यांच्यामुळे फटका बसण्याची शक्यता आहे. प्रभाग ६ 'अ' मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिशा कामत, उबाठा शिवसेना तेजल कोरगावकर, भाजप मेघा डुबळे, शिवसेना माजी नगरसेविका शर्वरी धारगळकर, कॉग्रेसकडून महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी मैदानात आहेत. तर 'ब' मधून उबाठा शिवसेनेचे शहरप्रमुख शैलेश गवंडळकर, शिवसेनेचे देव्या सूर्याजी, भाजप अमित गवंडळकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष उदय भोसले, कॉग्रेसचे अरूण भिसे मैदानात उतरलेत. प्रभाग ७ 'अ' मध्ये कॉग्रेसच्या प्रज्ञा चौगुले, शिवसेना स्नेहा नाईक, भाजप माजी नगरसेविका समृद्धी विर्नोडकर, उबाठा शिवसेना आर्या सुभेदार, अपक्ष लतिका सिंग निवडणूक रिंगणात आहेत. तर 'ब' मध्ये शिवसेनेकडून माजी नगराध्यक्ष संजू परब, भाजप माजी नगरसेवक उदय नाईक, उबाठा शिवसेना संदीप राणे, कॉग्रेसचे संतोष जोईल रिंगणात आहेत. माजी नगराध्यक्ष संजू परब व उदय नाईक यांच्यात थेट लढत होत आहे.
प्रभाग ८ 'अ' मध्ये भाजपच्या सुकन्या टोपले, राष्ट्रवादी काँग्रेस रंजना निर्मळ, शिवसेनेकडून माजी नगराध्यक्षा अनारोजिन लोबो, कॉग्रेसच्या सुमेधा सावंत, उबाठा शिवसेना माजी नगरसेविका क्षिप्रा सावंत नशिब आजमावणार आहेत. तर 'ब' मध्ये भाजपचे प्रतिक बांदेकर, शिवसेना माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, उबाठा शिवसेना संदीप वेंगुर्लेकर यांच्यात तिरंगी लढत होणार असून काका विरुद्ध पुतण्या असा हा सामना रंगणार आहे. प्रभाग ९ 'अ' मध्ये शिवसेनेच्या पुजा अरवारी, भाजप निलम नाईक, उबाठा शिवसेना क्षिप्रा सावंत रिंगणात असून 'ब' मधून शिवसेनेकडून अजय गोंदावळे, कॉग्रेस प्रणाली नाईक, भाजप ॲड. रूजूल पाटणकर, राष्ट्रवादी आगोस्तीन फर्नांडिस, उबाठा शिवसेना नियाज शेख निवडणूक लढवत आहेत. अखेरच्या प्रभाग १० 'अ' मध्ये भाजपच्या वीणा जाधव, शिवसेना वेदिका सावंत व उबाठा शिवसेना श्रुतिका दळवी रिंगणात आहेत. 'ब' मधून उबाठा शिवसेनेचे प्रदिप कांबळे, भाजपचे ॲड. अनिल निरवडेकर, शिवसेनेचे माजी नगरसेवक गोविंद वाडकर, राष्ट्रवादीचे सत्यवान चेंदवणकर तर कॉग्रेसकडून श्याम वाडकर निवडणूक रिंगणात आहेत. भाजप, शिवसेना, उबाठा शिवसेना यांच्याकडून २० तर कॉग्रेसकडून १७ उमेदवार निवडून रिंगणात उभे राहिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस ५ व अपक्ष ५ उमेदवार मैदानात आहेत. मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार उबाठा सेनेच्या चिन्हावर लढत आहेत. बंडखोरी टाळण्यासाठी आटीपीटा करूनही नेत्यांची डोकेदुखी कमी झालेली नाही. बंडखोरांचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.














