
प्रिय आनंद,
तुला आमच्यातून जाऊन आज ५ महिने होत आले..पण कधी कधी विश्वासच बसत नाही की तू आमच्यातून निघून गेलायस..तुझ्या मनमिळाऊ स्वभावाची आजही लोक आठवण काढतात..तुझ्यासाठी काही करता नाही आले याची खंत आयुष्यभर आमच्या सर्वांच्या मनात राहील..तू जोडलेली माणसं, तुझा मित्रपरिवार बघून खरच तुझा अभिमान वाटतो..सर्वात महत्वाचं म्हणजे तुझ समाजकार्य..तू गेल्यानंतर भेटायला येणारा प्रत्येक जण तु त्याना कशी मदत केली होतीस हेच सांगत होता. तुला सर्व कुटुंब एकत्र आलेलं आवडायच..आपलं कुटुंब एकत्रित ठेवण्यात तु महत्वाचा दुवा होतास..बहिणींवर,भावांवर तुझा फार जीव होता..कुणी फ़ोन करो किवा ना करो..पण तू मात्र नेहमी स्वतःहून फ़ोन करून सर्वांची खुशाली विचारायचास ..कुणी गावी येणार असेल तर ती व्यक्ती घरी पोचेपर्यंत तुझे फ़ोन चालू असायचे..आता गावी आल्यावर तुझी कमी जास्तच भासते..घर रिकामं वाट्ट..तुझा मनमिळाऊ स्वभाव,माणसं जोडण्याची हातोटी,आणि अडचणीत हाकेला धाऊन जायची सवय कोणी कधीच विसरणार नाही.कित्तेक जणांच्या वाईट वेळेत तु त्यांच्यासोबत होतास हे लोकं स्वतःहून सांगतात.कुणाचा अपघात झालेला असो की कुणी आजारी असो तु कायम असायचास..
आणि हाच तुझा वारसा आम्ही पुढे चालवायचा निर्णय घेतलाय. तू सदैव आमच्यासोबत रहावास ,तुझ्याकडून घडलेली सत्कार्य यापुढेही सुरू रहावीत यासाठीच हा घाट घातलाय..आणि आज तुझ्या वाढदिवशी त्याची घोषणा करतोय..”आनंदराज सेवा चॅरिटेबल ट्रस्ट ” …तू जरी आता नसलास तरी तुझ काम जिवंत ठेवायचा आमचा एक छोटासा प्रयत्न ..माहीत नाही कितपत जमेल आम्हाला..पण जिथे कुठे अडचणी येतील तेव्हा तू सोबत असशीलच याची खात्री आहे..तू निघून गेलास आणि आई वडील,बहिणी,भाऊ,मित्र परिवार यांना पोरकं केलस..पण सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचं तुझ काम आम्ही पुढे चालू ठेऊ..समाजात खूप अशा बहिणी आहेत,आई आहेत,आजी आजोबा आहेत ज्याना मदतीची गरज असेल..त्याना तुझ्या प्रेरणेने मदत मिळेल.जेवढं शक्य होईल त्याही पेक्षा जास्त मदत करायचा आमचा मानस आहे.तुझ्या आवडीच अजून एक क्षेत्र म्हणजे भजन आणि संगीत. आनंदराज संस्थेच्या माध्यमांतून आमचा लोकल टॅलेंट जगासमोर येण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा मानस राहील..जेणेकरून ज्यांच्यामध्ये खरेच क्षमता आहे असे गायक,वादक निर्माण होतील आणि त्यांची कला जगासमोर येईल.या पत्रकाद्वारे आम्ही सर्वांना सांगू इच्छितो की, तुम्हाला कोणत्याही प्रकारचे सहकार्य लागेल किंवा तुम्ही काही संकटात असाल, तेव्हा तुमच्या हक्काचा, तुमचा ‘आनंद ‘ - आनंदराज सेवा संस्थांच्या माध्यमातूण तुम्हाला मदत करेल.
‘सेवा हेच कर्म, आनंद हेच ध्येय ‘
चला आनंद वाटुया..आनंद जगुया..














