निसर्गरम्य कोकणातला निसर्गच गायब

सुधाकर राणे यांचा खास लेख
Edited by:
Published on: March 16, 2026 19:03 PM
views 19  views

ग्रामीण भागातील माणसांची शहरी जीवनशैली शी (लाईफ स्टाईल) बरोबरी करण्याची मानसिकता आणि लोकशाहीची विटंबना करून गैरमार्गाने राजकीय नेत्यांची सत्ता मिळवण्यासाठी किंवा सत्ता टिकवण्यासाठी वरिष्ठांच्या कोकणा बाबतीत चुकीच्या धोरणाला सुद्धा विरोध न करण्याची  जीवघेणी स्पर्धा यामुळे सुंदर असा निसर्गाने नटलेला कोकण ओसाड वाळवंट होण्याची भीती निर्माण झाली आहे. मोठ्या प्रमाणात जंगल तोडीमुळे जंगली प्राणी लोकवस्तीमध्ये घुसून फळबागा व पिकांची नासधूस करत आहेत. जंगली प्राण्यांचे माणसांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे.

सरकार कडून विनामूल्य किंवा अत्यल्प दरात दरमहा मिळणारे धान्य यामुळे जवळ जवळ सर्वच शेतकऱ्यांनी शेती व्यवसाय बंद केल्याचे बहुतेक खेड्यात दिसून येते. पूर्वी शेतकरी शेती बरोबर लहान सहान पूरक जोडधंदा करत असत. शेती साठी लागणारी बैलजोडी ,गायी म्हशी , शेळी तसेच कोंबड्या पाळणे ही सधन शेतकऱ्यांना गरज वाटत होती. सर्व घरात गरजे पुरते अन्न धान्य व दुधदुभत्या ची तसेच अंडी, मांसाहार व भाजीपालाची सोय होती. साहजिकच शेती करणे बंद झाल्याने या सर्व गोष्टी साठी बाजारावर अवलंबून रहावे लागले. शेतात मिळणारे मासे ,खेकडे नाहीसे झाले.शेती न करण्याचे गंभीर परिणाम पुढच्या पिढीला भोगावे लागणार आहेत. पिकतच नाही तर विकत कुठून मिळणार हा न सुटणारा प्रश्न आणि हेच अंतिम सत्य आहे. प्रगत शेती साठी बऱ्याच वर्षा पूर्वी काढलेला सावंतवाडी तालुक्यातील कालवा सिंचन घोटाळा म्हणून राजकीय पटलावर जिवंत असून प्रत्येक्षात मात्र पूर्णपणे दुर्लक्षित व कार्यान्वित नसल्याने कित्येक गावं भकास झाली आहेत.हा भकास परिसर पाहून मन हेलावून जाते.

दुसऱ्या राज्यात धोकादायक व असुरक्षित म्हणून तेथील जनतेने विरोध केलेले उद्योगधंदे कोकणच्या माथी मारण्यासाठी मदत करणारे आणि त्यांना वरदहस्त असणारे राजकीय पुढारी तसेच दगड उत्खनन, बेसुमार जंगल तोड, जमीन विक्रीचे व्यवहार व परप्रांतीयांचा विळखा यामुळे कोकणचे सौंदर्य व सुरक्षितता धोक्यात आली आहे.

प्रांतवाद, धार्मिक दंगली, कोविड सारखी भयंकर रोगराई तसेच आखाती देशातील युद्ध अशा कठीण परिस्थितीत प्रत्येक व्यक्ती ला आठवतो तो स्वतःचा गाव .शहरवासीयांचा निसर्गाच्या सानिध्यात मिळणारा आनंद, घरगुती व चुलीवरचे जेवण याकडे वाढलेला कल यातूनच अलीकडच्या काळात हॉलिडे होम किंवा सेकंड होम ही कल्पना वाढीस लागली आहे.खेड्या मधले घर कौलारू हे फक्त कविते पुरतं मर्यादित नसुन ही बाब लोकांच्या पसंतीस पडली आहे.निसर्गाच्या सानिध्यात गावखेड्यात मिळणारा आनंद पैशांनी विकत घेता येत नाही .तो कोकणात वास्तव्य करूनच अनुभवावा लागतो.साठाव्या व सत्तरव्या दशकात जन्माला आलेल्या लोकांना हा काळ किती सुंदर होता हे सांगण्यासाठी शब्द अपुरे पडतील.आर्थिक श्रीमंती परंतु अनेक समस्यांनी ग्रासलेली पिढी निर्माण करणारी प्रगती नको पण मानवी जन्माचा आनंद मिळणारी पूर्वीचीच सुख हेच संपत्ती मानणारी पिढी पुन्हा यावी असे वाटते.खेड्यातील सुंदर, शाश्वत व सुशेगात जीवन नवीन पिढीला कळावे म्हणून श्री. प्रसाद गावडे हा निसर्ग प्रेमी रानमाणुस जीवाचे रान करत आहे .त्याच्या कार्याला सलाम.

फुकट मिळत असणाऱ्या मदतीने होणारे नुकसान व भविष्यातील दुष्परिणाम लक्षात घेऊन काही दिवसांपूर्वी तामिळनाडू सरकार ला सुप्रीम कोर्टाने लोकांना फुकटात देण्यात येणाऱ्या सरकारी योजना बंद करण्याचे आदेश दिले आहेत .त्याप्रमाणे आपल्या सरकारने अशा अनेक योजना बंद करून शेती करण्यास प्रोत्साहन पर मदत , वृक्ष लागवड , निसर्गनिर्मित झऱ्याचे सुशोभीकरण, पाळीव  जनावरे  असे उद्योग सुरू करण्या संबंधित मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करणे गरजेचे आहे.हे फक्त सरकारचेच काम नसुन कोकणातील प्रत्येकाने शहरातील केवळ पांढरेशुभ्र कपडे परिधान केलेल्या माणसाच्या सुखाच्या मृगजळा मागे न धावता खरे सुखी व आनंदी जीवन हे निसर्गाच्या कुशीतील आपल्या गावातच आहे ही मानसिकता आत्मसात करणे आवश्यक आहे.