
सिंधुदुर्गनगरी : पाण्याचा काटकसरीने वापर करणे ही काळाची गरज बनली असून, जलसंपत्तीचे संवर्धन ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. जिल्ह्यात पावसाचे प्रमाण तुलनेने अधिक असले तरी पाण्याचा योग्य आणि नियोजनबद्ध वापर करणे आवश्यक आहे. प्रत्येक थेंब जपून वापरणे हीच खरी जलसंस्कृती असून ही जलसंस्कृती रुजवणे काळाची असल्याचे जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे म्हणाल्या.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात जलसंवर्धन व शाश्वत जलव्यवस्थापनाच्या दृष्टीने राबविण्यात आलेला “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडा २०२६” उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला. हा समारोप मायनाक भंडारी सभागृहात पार पडला . या समारंभाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे होत्या.
जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे म्हणाल्या की, जलसंपदा विभागाच्या माध्यमातून जलसंस्कृती रुजविण्याचे कार्य सातत्याने सुरू असून, पाणी बचतीबाबत व्यापक जनजागृती होणे आवश्यक आहे. जलसंपदा विभागामार्फत अनेक जलसिंचनाचे प्रकल्प निर्माण केले जातात. हे प्रकल्प उभारताना भुसंपादन तसेच पुनर्वसन असे महत्वाचे काम कमी कालावधीत केले जात असून जलसंपदा विभागाला गती मिळत आहे. भविष्यातही प्रकल्प गतीमान पध्दतीने पूर्ण करावेत. विविध अडचणी सोडविण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन ठेवण्याचे आवाहनही श्रीमती धोडमिसे यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधीक्षक अभियंता पदमाकर पाटील यांनी केले. त्यांनी पंधरवड्यादरम्यान राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेत जलसाक्षरतेचे महत्त्व अधोरेखित केले.
यावेळी कार्यकारी अभियंता गोविद श्रीमंगले यांनी या पंधरवड्यात जलसंवर्धन, पाणी बचत, कालव्यांची स्वच्छता, शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिरे, तसेच प्रत्यक्ष क्षेत्रभेटी यांसारख्या विविध उपक्रमांचे सादरीकरण केले.
यावेळी उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अभियंत्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये श्री हिरेगौडार, उपविभागीय अभियंता, श्री डांबरेकर, उपविभागीय अधिकारी आणि श्री भगवान पवार, उपविभागीय अभियंता यांचा समावेश होता.
कार्यक्रमाच्या अखेरीस कार्यकारी अभियंता अमोल चोपडे यांनी सर्व मान्यवर अधिकारी व उपस्थितांचे आभार मानले. त्यांच्या मनोगतातून या पंधरवड्याच्या यशस्वीतेत सर्वांच्या सहकार्याची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित झाली.











