जिल्हा न्यायालयासमोर उभी स्विफ्ट कार पेटली

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: April 30, 2026 21:07 PM
views 50  views

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा न्यायालयासमोर तसेच जिल्हा परिषद नजीकच्या मोकळ्या जागेत पार्किंग करून ठेवलेल्या स्विफ्ट कारला दुपारी अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. कारच्या आत आग लागल्यामुळे धूर निघू लागल्याने हा प्रकार उघडकीस आला.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील कर्मचारी आणि नागरिकांनी तत्काळ धावाधाव केली. इमारतीत उपलब्ध असलेल्या अग्निशमन यंत्राच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. मात्र, तोपर्यंत कारमधील सीटसह अन्य साहित्य जळून खाक झाले होते.

ही कार एका वकिलाची असल्याचे समजते. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, संबंधित कार चालकाने या घटनेची तक्रार सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात दिली असून पुढील तपास सुरू आहे.