आदिशंकराचार्य जयंती विशेष

Edited by:
Published on: April 21, 2026 12:48 PM
views 54  views

आज वैशाख शुक्ल पंचमी. आदिशंकराचार्यांची जयंती. पण माझ्या सभोवतालच्या फारच थोड्या मंडळींना आदिशंकराचार्य माहीत आहेत. आणि त्यांची जयंती तर हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच मंडळींना. 

मला नक्की आठवत नाही की शाळेत असताना नेमक्या कोणत्या इयत्तेत मला शंकराचार्यांची ओळख झाली. अर्थात ही ओळख करून दिली ती माझ्या बाबांनी. त्याचे कारणही हेच की बाबांनी गुरूदिक्षा शंकराचार्यांच्या परंपरेतील स्वामी विरेश्वरानंदांकडून घेतली होती. (स्वामी विरेश्वरानंद हे रामकृष्ण मिशनचे संन्यासी).

त्यांची गोष्ट ऐकताना सुरवातीलाच मी  प्रभावित झालो ते शंकराचार्यांची अलौकिक प्रतिभा पाहून. हा माणूस फक्त बत्तीस वर्षे जगला, पण या बत्तीस वर्षांत भारतभर फिरून भारताच्या चार दिशांना त्याने चार आश्रम उभे केले, जे आश्रम आज बाराशे वर्षे होऊन गेली तरी सक्रिय आहेत. बत्तीस वर्षांच्या छोट्याशा आयुष्यात त्यांनी प्रस्थानत्रयीवर भाष्य लिहीले. अनेक प्रकरण ग्रंथांची रचना केली. अनेक स्तोत्रे रचली. भारतात त्या काळात उपलब्ध असलेल्या सर्व दर्शनांचा चिकित्सक अभ्यास केला. अनेक विद्वानांशी वादविवाद केले. आणि हे केवळ बत्तीस वर्षांच्या छोट्याशा आयुष्यात !

मी जेव्हा लोकांशी बोलतो तेव्हा 'प्रस्थानत्रयी म्हणजे काय?' इथून सुरुवात करावी लागते. गीता, उपनिषदे आणि ब्रम्हसूत्रे यांना प्रस्थानत्रयी म्हणतात. 

आचार्यांची प्रस्थानत्रयीवरची भाष्ये अद्वैत वेदांताचे प्रतिपादन करतात. शंकराचार्यांची बुद्धी किती प्रखर होती हे एखाद्याला पहायचे असेल तर त्याने शंकराचार्यांचे अद्वैत वेदांताच्या समर्थनार्थ केलेले युक्तिवाद वाचावेत. इंग्रजीत ज्याला 'हेअर स्प्लिटींग' म्हणतात, तसे अतिशय बारकाईने युक्तिवाद केलेले आहेत. इसवीसनाच्या आठव्या शतकातला हा माणूस एकदा म्हणाला होता, 'शंभर शहाण्या माणसांनी मला येऊन सांगितले की अग्नी शीतल असतो म्हणून मी थोडाच अग्नीला शीतल म्हणेन !'

जगातील अध्यात्मवादी दर्शनातील चुडामणी म्हणजे त्यांचे अद्वैत दर्शन म्हणता येईल, इतके ते विकसित आहे. स्वामी विवेकानंद ज्ञानयोगावरील भाषणात याच दर्शनावर बोलतात. जगाचा सार्वजनीन धर्म याच दर्शनावर उभारला जाऊ शकतो असे स्वामीजींचे प्रतिपादन आहे.

'ब्रम्ह सत्य, जगत् मिथ्या, जीवब्रम्हैक्य ना पर।' हे या दर्शनाचे सार आहे. ब्रम्ह हेच एकमेव सत्य (essence) आहे, जग हा त्याचा देखावा (appearance) आहे. आणि प्रत्येक प्राणीमात्रातला जीवंतपणा हा दुसरे तिसरे काही नसून केवळ ब्रम्ह आहे. 

तुकोबाराय जे म्हणतात की 'विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म' हेच आदिशंकराचार्यांचे अद्वैत दर्शन आहे. पण जेव्हा 'विष्णुमय जग' हे सत्य स्विकारले जाते तेव्हा त्याचा व्यवहार कसा व्हायला हवा? 'भेदाभेद भ्रम, अमंगळ' असाच व्हायला हवा.

आदिशंकराचार्यानी आपल्या प्रकांड पांडित्याने 'विष्णुमय जग' हे तर निरपवादपणे सिद्ध केले. पण 'भेदाभेद भ्रम अमंगळ' हा व्यवहार मात्र सुरू केला नव्हता. त्याचेही एक कारण आहे. शंकराचार्यांचा जन्म नंबुद्रीपाद ब्राह्मण जातीतला. देवाच्या खालोखाल आपणच श्रेष्ठ मानणारी ही मंडळी.

तुमचा विचार आणि आचार जेव्हा पूर्णपणे विरोधी दिसतो, तेव्हा तुम्हाला आव्हान मिळणे साहजिकच असते. तसे आव्हान मिळण्याचा प्रसंग आचार्यांच्या जीवनात आलाच. एकदा ते काशी क्षेत्री निवास करत असताना दुपारच्यावेळी आपल्या शिष्यांसमवेत गंगेच्या घाटावर निघाले होते. तेथल्या अरुंद बोळातून ते सर्वजण जात असताना समोरून एक चांडाळ येत असलेला त्यांना दिसला. चांडाळ ही अस्पृश्य मानली गेलेली जात. त्या चांडाळाला पहाताच, आचार्य त्याला 'गच्छ, गच्छ' (बाजूला हो) म्हणाले. पण तो चांडाळ बाजूला न होता, त्याने आचार्यानाच प्रश्न केला, "विप्रवर, कोणी कोणापासून दूर व्हावे? अन्नमयाने अन्नमयापासून? की चैतन्याने चैतन्यापासून? तुमचे शरीर आणि माझे शरीर यात फरक काय आहे? दोन्हीही मलमूत्राचे गटार आहेत. आणि चैतन्याने चैतन्यापासून दूर व्हावे म्हणाल तर सर्वत्र एकच चैतन्य भरलेले आहे. ब्रम्हदेवापासून मुंगीपर्यत एकाच चैतन्याची अभिव्यक्ती नव्हे काय? गंगेच्या पाण्यातील सूर्याचे प्रतिबिंब आणि गटाराच्या पाण्यातील सूर्याचे प्रतिबिंब ही एकाच सूर्याची नव्हेत काय?"

अस्पृश्यता मानणाऱ्या आचार्यांना चांडाळाने त्यांच्याच दर्शनशास्त्राची व्यावहारिक परिणीती शिकवली. त्याही पुढचे आश्चर्य म्हणजे आचार्यानी त्या चांडाळाला वंदन करीत त्याचे शिष्यत्व पत्करले. भारतातील सर्व विद्वानांना वादविवादात हरवून दिग्विजय मिळवणाऱ्या आदिशंकराचार्यांनी एका अस्पृश्याला गुरू म्हणून स्विकरले. हे आज वाटते तितके त्या काळात सोपे नव्हते. आचार्यांनी पाच श्लोक रचून त्या चांडाळ गुरूची स्तुती गायली. ही स्तुती 'मनीषा पंचक' म्हणून आजही उपलब्ध आहे. हे मनिषा पंचक आचार्यांच्या तत्वज्ञानातील उरलीसुरली कमतरता संपुष्टात आणते. 'भेदाभेद भ्रम, अमंगळ' हे शिकवते. मला या गोष्टीचे अधिक कौतुक वाटते की बाराशे वर्षापूर्वी आपल्याला आव्हान देणाऱ्या एका अस्पृश्याला त्यांनी मारले नाही, अनुल्लेखाने संपवण्याचा प्रयत्न केला नाही. त्याला गुरू मानून श्लोक रचले.

जग हे विष्णुमय आहे, याची अनुभूती येणं हेच जीवनाचं ध्येय आहे असा आचार्यांचा उपदेश आहे. तो ते किती रोखठोक शब्दात सांगतात पहा. ते म्हणतात, 'मूर्ख माणसा, जेव्हा तुझा मृत्यू तुझ्यासमोर येऊन उभा राहील, तेव्हा व्याकरणाचे नियम उपयोगी पडणार नाहीत. तेव्हा फालतू वादविवादात वेळ घालवू नकोस. आतापासूनच गोविंदाला भज. तोच तुझ्या अंतिम समयी येईल.'

त्यासाठीची साधना म्हणजे प्रस्थानत्रयीचे श्रवण, मनन, निदिध्यासन. हे विश्व ईश्वराने भरलेले आहे, हे पहाण्याची मनाला सवय करणे. ईशोपनिषदाचा पहिला मंत्र हेच तर सांगतो, 'ईशावास्यं इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत्। तेन त्यक्तेन भुंजिथाः मा घृत् कस्यस्वीद धनम्।।' या मंत्राची दुसरी ओळ सांगते की ईश्वराच्या नावाने त्यागून यथाप्राप्त भोगीत जा. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे 'दुसर्‍याच्या धनाबाबत गिधाडी वृत्ती' ठेवू नकोस.'

आज आदिशंकराचार्यांच्या जयंतीच्या निमित्ताने सर्वत्र भरलेल्या ईश्वराला पहाण्याची आपल्या सर्वांना प्रेरणा मिळो ही सदिच्छा ! 

डाॅ. रूपेश पाटकर

मनोविकारतज्ज्ञ