मुंबई : कोकण शिक्षक मतदार संघात विधान परिषदेच्या एका जागेसाठी चौरंगी लढत होत आहे. यात विद्यमान आमदार बाळाराम पाटील यांनी महाविकास आघाडी व शेकाप, ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी भाजप व शिंदे गटातून, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्याचे अध्यक्ष वेणूनाथ कडूंनी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेतर्फे तर धनाजी पाटील यांनी शिक्षक भारतीतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. चौरंगी लढत होत असली तरी खरी लढत विद्यमान आमदार बाळाराम पाटील × ज्ञानेश्वर म्हात्रे × वेणूनाथ कडू या तिघांमध्ये होणार आहे. तर शिक्षक भारती आपल्या अस्तित्वाची लढाई लढत आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील यांनी पुरोगामी शिक्षक संघटनेचे शिक्षक सेना व टीडीएफ या दोन संघटनेचे पाठबळ मिळत असल्याने आघाडी पुरस्कृत उमेदवार बाळाराम दत्तात्रय पाटील यांचा जोर मानला जात आहे. यावर आमचे पॉलिटीकल ब्युरो भरत केसरकर यांनी घेतलेला हा आढावा.
कोकण शिक्षक मतदार संघातील निवडणूकीचा बिगुल वाजला आणि चर्चा सुरू झाली ती, हा मतदार संघ कोण काबीज करणार याची! बाळाराम पाटील यांनी दिमाखात उमेदवारी अर्ज दाखल केला. कोकण आयुक्त कार्यालय कोकण भवन सीबीडी, बेलापूर येथे मोठे शक्तिप्रदर्शन करत त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, जितेंद्र आव्हाड, रायगडचे खासदार सुनील तटकरे, शिवसेनेचे सुभाष देसाई, शिवसेना खासदार विनायक राऊत, आमदार भाई जगताप, समाजवादीचे आमदार रईस शेख, शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील, टीडीएफचे ज्ञानेश्वर कानडे, महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, संस्था चालक, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद मोठ्या संखेने उपस्थित होते.
आमदार बाळाराम पाटील यांनी आपण पुन्हा विजयी होऊ!, असा दावा यावेळी केला. या मतदारसंघात गेली सहा वर्षे आपण चांगल्या पद्धतीने काम करत शिक्षकांचे अनेक प्रश्न सोडवले, त्यामुळे शिक्षक बांधव पुन्हा आपल्या गळ्यात विजयाची माळ घालतील, असा दावा त्यांनी यावेळी केला. बाळाराम पाटील हे शेकापचे उमेदवार असून महाविकास आघाडीने त्यांना पाठिंबा दिला आहे. रायगड जिल्हा हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. यावेळी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यातील वेगवेगळ्या संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सिंधुदुर्गातून अनिल राणे, गजानन नानचे, काका मांजरेकर यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकेतर संघटनेने पाठिंबा दिला.
सुनील भुसारा, माजी आमदार धैर्यशील पाटील, मनोहर भोईर, दत्तात्रय सावंत, रुपेश म्हात्रे, ठाणे मनपा माजी विरोधी पक्षनेते नजीब मुल्ला, नवी मुंबई मनपा माजी महापौर विठ्ठल मोरे, टीडीएफ संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर कानडे, बहुजन शिक्षक शिक्षकेतर संसदचे अध्यक्ष अशोक बहिराव सर, ठाकरे शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख बबन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस कल्याण जिल्हाध्यक्ष मंदार पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख,पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, काँग्रेस पनवेल मनपा जिल्हाध्यक्ष आर. सी. घरत, ठाकरे शिवसेना रायगड जिल्हाध्यक्ष शिरीष घरत, शेकापचे ज्येष्ठ नेते नारायण शेठ घरत, नवी मुंबई मनपा नगरसेवक करण मढवी, तसेच महाविकास आघाडीचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाजपने तोडली शिक्षक परिषदेशी असलेली अनेक वर्षांची युती
भाजपने कोकण शिक्षक मतदार संघात पहिल्यांदाच आपला उमेदवार थेट दाखल करत या निवडणुकीत उडी घेतली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेशी थेट युती भाजपने तोडत शिंदे गटाचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांना भाजपमध्ये घेत उमेदवारी दिली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यामुळे अनेक वर्ष कोकण शिक्षक व पदवीधर मतदारसंघात राहिलेली महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद व भाजपची युती यामुळे संपुष्टात आली आहे. ज्ञानेश्वर म्हात्रे हे भाजपचे कोकण शिक्षक मतदार संघाचे अधिकृत उमेदवार असणार आहेत. त्यामुळे अनेक राजकीय खेळी आणि डावपेच पाहायला मिळाले. सर्वप्रथम ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर काही वेळेतच त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री रवींद्र चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. त्यानंतर भाजपच्या उमेदवाराची अधिकृत घोषणा झाली.
वेणूनाथ कडू व बाळाराम पाटील थेट लढत
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्याचे अध्यक्ष वेणूनाथ कडू आणि विद्यमान आमदार शेकापचे बाळाराम पाटील यांची थेट लढत असणार आहे. भाजप आणि शिक्षक परिषदेची महाराष्ट्रात अनेक वर्षापासून युती पाहायला मिळत होती. मात्र युती ही युती या निवडणुकीत संपुष्टात आली. कोकण शिक्षक मतदार संघात भाजप महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेला अनेक वर्षे पाठिंबा देत होती. आणि शिक्षक परिषद आपला उमेदवार उभा करत होती. तर कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये भाजप उमेदवार उभे करत होती. तर शिक्षक परिषद त्याला आतापर्यंत पाठिंबा देत होती. मात्र यावेळी ही युती जवळजवळ संपुष्टात आली आहे. मागच्या शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत शिक्षक परिषदेचे रामनाथ मोते यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. तर वेणूनाथ कडू यांनी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने उमेदवारी दिली होती. वेणूनाथ कडू यांना भक्कम पाठिंबा देत भाजप त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला होता. त्यावेळेस आमदार रवींद्र चव्हाण स्वतः जातीनिशी मैदानात उतरले होते. मात्र मोते यांची बंडखोरी व शिक्षक सेनेतून लढलेले ज्ञानेश्वर म्हात्रे यामुळे मत विभाजनाचा फायदा होत पंचरंगी लढतीमध्ये शेकाप-काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार बाळाराम पाटील हे विजयी झाले होते.
ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे पारडे जड
गेले काही दिवस कोकण मतदारसंघ पिंजून काढत ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी मोठे आव्हान निर्माण केले होते. म्हात्रे यांनी थेट भाजपकडे जात उमेदवारी अर्जची माळ आपल्या गळ्यात पाडण्यात यशस्वी झाले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे पारडे जड मानले जाते. मुख्याध्यापक असलेले ज्ञानेश्वर म्हात्रे यांना कोकण शिक्षक मतदार संघात तूर्तास तरी मोठा पाठिंबा पाहायला मिळत आहे. कोकणातील सिंधुदुर्गातून केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे यांचा मोठा पाठिंबा असणार आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यात उद्योगमंत्री उदय सामंत, किरण सामंत, आमदार योगेश कदम यांचा भक्कम पाठिंबा मिळणार आहे. तर रायगड जिल्ह्यात आमदार भरत गोगावले यासह शिवसेना-भाजप युतीचा मोठा पाठिंबा असणार आहे. ठाण्यामध्ये भाजपचे वर्चस्व असून हाही भाजप गड अबाधित राखण्याची शक्यता आहे. मात्र कोकण मतदारसंघ आज महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा बालेकिल्ला असल्याने शिक्षक परिषद व भाजपच्या या लढाईत चा फायदा बाळाराम पाटील उठवतात का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. शिक्षक परिषदेचा मतदार मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर या पाचही जिल्ह्यामध्ये आहे. त्यामुळे भाजप आणि शिक्षक परिषदेचे अंतर्गत कुरघोडी ही कोणाच्या पत्थ्यावर पडते? हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.
शिक्षक परिषद मजबूत - वेणूनाथ कडूंचा दावा
महाराष्ट्र शिक्षक परिषदेचा कोकण हा बालेकिल्ला आहे. आजपर्यंतच्या सर्व निवडणुका परिषदेने एक हाती जिंकलेल्या आहेत. फक्त मागच्या निवडणुकीत अपवाद वगळता बाळाराम पाटील हे शेकापचे उमेदवार विजयी झाले. यात शिक्षक परिषदेला पहिल्यांदाच हार पत्करावी लागली. पण रामनाथ मोत्यांची बंडखोरी ही त्यांच्या पत्थ्यावर पडली. तत्कालीन विद्यमान आमदार रामनाथ मोते यांनी बंडखोरी केली आणि थेट शिक्षक परिषदेचे उमेदवार वेणूनाथ कडू यांच्या विरोधात ते उभे राहिले. तब्बल साडेआठ हजार मते मोते यांनी घेतल्याने मोते आणि कडू यांच्या विवादाचा फटका बसला आणि बाळाराम पाटील मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. यात शिक्षक सेनेचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी तब्बल साडेनऊ हजार मतं घेत या विभाजनात मोठी भर टाकली, अन्यथा निकाल वेगळ्या दिसला असता.
शिक्षक परिषदेचा बालेकिल्ला अभेद असून मतदार आपल्याला विजयी करतील, शिक्षकांच्या आणि संघटनेच्या जोरावर आपण विजयी होऊ, असा दावा कडू यांनी केला आहे. ठाण्यामध्ये शिक्षक परिषदेचा मोठा धबधबा आहे. ठाण्यातील याच धबधब्यावर शिक्षक परिषदेचा आमदार कोकण पदवीधर मतदारसंघातून विजयी होत असतो. त्यामुळे वेनुनाथ कडू यांच्या पाठीशी शिक्षक परिषद संघटना पुन्हा उभी राहते का? आणि मागच्या निवडणुकीतील पराभवाचा वचपा वेणूनाथ कडू यांच्या रूपाने शिक्षक परिषदेचे कार्यकर्ते पेटून उठून काम करतात का? हेही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
शिक्षक भारती आजमावतेय नशीब
या निवडणुकीत शिक्षक भारतीचे धनाजी पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मागच्यावेळी अशोक बेलसरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत बऱ्यापैकी मतं आपल्याकडे खेचण्यात यश मिळवले होते. यावेळी शिक्षक भारतीकडून रत्नागिरीतील धनाजी पाटील यांना उमेदवारी मिळाली आहे. शिक्षक भारतीचे सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चांगले प्राबल्य मानले जाते. आमदार कपिल पाटील या संघटनेचे सर्वेसर्वा असून 'कोणत्याही परिस्थितीत कोकणातील हा गड काबीज करायचा!' असा चंग कपिल पाटील यांच्या शिलेदारांनी बांधला आहे. यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात संजय वेतुरेकर यांच्या नेतृत्वाखाली चंद्रकांत चव्हाण, प्रशांत आडेलकर, गिरीश गोसावी, दीपक तारी, सुनील जाधव, बाळा कडव यांसारखे पदाधिकारी व कार्यकर्ते मैदानात उतरले आहेत. त्यामुळे शिक्षक भरती काय करिष्मा करते? हे पाहणं महत्वपूर्ण ठरणार आहे.
'शिक्षक क्रांती'ची भूमिका निर्णायक
२०१७ च्या निवडणुकीत रामनाथ मोते यांनी बंड केल्यानंतर शिक्षक परिषदेमध्ये उभी फूट पडली. रामनाथ मोते यांना मानणारा गट परिषदेमध्ये दोन बाजूला जात, त्यांनी मोतेंना थेट पाठिंबा दिला आणि मोतेंनी साडेआठ हजारपेक्षा जास्त मते घेतली. यानंतर मोतेंचा जरी पराभव झाला असला तरी सुधीर घागरे यांच्या सैनिक नेतृत्वाखाली 'शिक्षक क्रांती' नावाची संघटना तळ कोकणात उभारण्यात आली. सुधीर घागरे या संघटनेचे राज्याचे अध्यक्ष झाले. महाराष्ट्र राज्य परिषदेला या फुटीचा मोठा फटका बसला. ठाण्याची निवडणूक शिक्षक क्रांती संघटनेने ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा पाठिंबा घेत जिंकली. त्यामुळे या निवडणुकीत ज्ञानेश्वर म्हात्रे यांना पाठिंबा देऊन त्यांच्या कामाचे उतराई होण्याचा चंग शिक्षक क्रांती संघटनेने बांधल्याचे समजते. शिक्षक क्रांती संघटना ही म्हात्रेना पाठिंबा देत असल्याने त्यांचे पारडे जड मानले जात आहे.
कास्ट्राईब शिक्षक संघटनेचा म्हात्रे यांना पाठिंबा
महाराष्ट्र कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्याचे सरचिटणीस आकाश तांबे यांनी ज्ञानेश्वर म्हात्रे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे यामुळे पाठबळ वाढण्याचे पाहायला मिळत आहे. या मतदारसंघात किमान ५००० मते कास्ट्राईब संघटनेचे असून आपण ही मते म्हात्रे यांच्या पारड्यात घालणार असल्याची भूमिका या संघटनेचे सरचिटणीस आकाश तांबे यांनी स्पष्ट केले आहे.
'टीडीएफ'चा बाळाराम पाटील यांना पाठींबा
अध्यापक संघ अर्थात टीडीएफ ही निवडणूक दरवर्षी लढवत असते. मात्र या निवडणुकीत टीडीएफने आपला उमेदवार उभा न करता बाळाराम पाटील यांना पाठिंबा दिला आहे. टीडीए ची साडेतीन ते चार हजार मते या मतदारसंघात आहेत. त्यामुळे ही सगळी मते एक गट्टा बाळाराम पाटील यांच्या पदरात तजाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाटील यांचे पारडं जड मानलं जात आहे.
सिंधुदुर्गात शिक्षकेत्तर संघटनेचाही पाटील यांना पाठींबा
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकेतर संघटनेने बाळाराम पाटील यांना पाठिंबा दिला आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल राणे, गजानन नानचे यांनी या संघटनेमध्ये असलेल्या सभासदाने पाटलांना मतदान करावे, असे आवाहन केले आहे. या भूमिकेमुळेही बाळाराम पाटलांचे पारडे जड मानले जात आहे.
एकूणच महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद व भाजप हे स्वतंत्र लढत असल्याने या मतविभाजनाचा फटका म्हात्रे व कडू या दोघांना बसणार असून महाविकास आघाडीचे बाळाराम पाटील यांना फायदा होणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. मात्र निश्चितच ही निवडणूक रंगतदार होणार यात शंका नाही.